नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी मिळविलेल्या ४८ मतांच्या वादग्रस्त विजयावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हल्लाबोल केला आहे. व्टिटरचे मालक एलॉन मस्क यांनीही ईव्हिएम हॅक होऊ शकते असा आरोप केला होता. या पार्श्वभुमीवर राहुल गांधी यांनी ही आता आक्रमक भुमिका घेतली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून व्टिट कराताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित एक बातमीही शेअर केली आहे. त्यांच्यावर ईव्हीएममध्ये छेडछाड करुन विजयी झाल्याचा आरोप आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “ईव्हीएम हा भारतातील ‘ब्लॅक बॉक्स’ आहे. त्यांची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही. देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते,” अशी प्रतिक्रिया राहुल यांनी दिली आहे.
एलन मस्क यांनी फुकटचा सल्ला देऊ नये- प्रुफुल पटेल
एलन मस्क यांनी ट्विट करत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत ईव्हीएम बंद करायला पाहिजे असे वक्तव्य केले होते. यावर खा. प्रफुल्ल पटेल यांनी एलन मस्क यांनी फुकटचा सल्ला देऊ नये. त्यांनी तिथे बसून गाड्या बनवायला पाहिजे फुकटचा सल्ला देऊ नये असे खा. प्रुफुल पटेल म्हणाले.
हा तर रडीचा डाव – रवींद्र वायकर
वायकर म्हणाले, हजारो पोलीस, 20 कँडिडेटचे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकटा तिथे रवींद्र वायकर जाऊन काय करणार आहे. रडीचा डाव चाललेला आहे. ही हार त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांच्या या रडीच्या डावाला मी काही महत्त्व देत नाही. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे, तो योग्य घेतलेला आहे.
