जालना : मुख्यमंत्री शिवरायांच्या रयतेचे नाही तर केवळ मराठ्यांचे आहेत अशी टीका ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी यांचे अमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
दरम्यान या आंदोलनाची गरज नसल्याचं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडेंनी व्यक्त केलं आहे. त्यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तायवाडे यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, ५४ लाख नोंदी खाडाखोड करून केल्या जात आहेत. ८० टक्के मराठा कुणब्यामध्ये घातलेला आहे याची उत्तरे तायवडे यांनी द्यावीत तर मी उपोषण मागे घेईल. मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत. कारण ते फक्त मराठा समाजाच्या आंदोलनाला वेळ देतात ओबीसीकडे डुंकूनही पाहत नाहीत.
मुख्यमंत्री फक्त मराठ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत : लक्ष्मण हाके
ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासन पुरस्कृत घाट आहे. मराठा मागासलेला असेल तर पुढारलेला समाज महाराष्ट्रात कोणता आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. मुख्यमंत्री फक्त मराठ्यांच्या हिताची काळजी घेत आहेत. राज्य सरकारकडून घटनाद्रोह आहेत, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
मागासवर्गाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचे काम जरांगे आणि मराठ्यांचा मुख्यमंत्री करत आहे : लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके म्हणाले, ज्याची लायकी नाही ज्याला संविधान माहिती नाही. ज्याला मागास म्हणजे काय माहिती नाही त्या माणसाच्या बेहकाव्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि अख्ख मंत्रिमंडळ काम करत असेल तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायला लाज वाटते. तुमचे ४८ पैकी ३२ खासदार निवडून येत असतील तर तुम्ही मागास कसे? जरांगे मॅनेज आंदोलन करतो १०० कोटीची भाषा बोलतो. मागासवर्गाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचे काम जरांगे आणि मराठ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. सकाळपासून मी पाण्याचा त्याग केला आहे, असेही ते म्हणाले.
सरकार ओबीसी बाबत गंभीर नसून, सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आज पासून आपण पाणीदेखील घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलय.
