मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे केंद्रात सलग तीन वेळा केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवत आहेत. तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर रामदास आठवले यांचे मुंबईत आगमन झाले. त्यावेळी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे आठवलेंचे जोरदार स्वागत केले.
मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. रिपाइं कार्यकर्त्यांनी भव्य रथातून मिरवणूक काढून वाजत-गाजत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आठवले चैत्यभूमी येथे रवाना झाले. चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रामदास आठवले यांनी विनम्र अभिवादन केले. कार्यकर्त्यापासून मंत्रिपदापर्यंत जे आहे ते सर्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला लाभले असल्याची कृतज्ञ भावना आठवलेंनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
यावेळी रामदास आठवलेंवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पवर्षाव केला. यावेळी सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे उपस्थित होते.
००००००
