४८वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा

ठाणे : अश्विन शेळकेचा अष्टपैलू खळे आणि त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या  अरमान पठाणच्या मोलाच्या योगदानामुळे युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने बिनेट कम्युनिकेशन संघाचा चार विकेट्सनी पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील की गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. बिनेट कम्युनिकेशन संघाने दिलेले १७५ धावांचे आव्हान युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने ३५ षटकात १७७ धावा करत विजय निश्चित केला.

युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने टॉस जिकंत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. भूषण शिंदेने आक्रमक फलंदाजी करत ४३ धावांसह बिनेट कम्युनिकेशन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. दीपक भोगलेने ३१, सिद्धार्थ घुलेने २५ आणि सागर मुळयेने २४ धावा बनवत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. अश्विन शेळके आणि पार्थ चंदनने प्रत्येकी तीन गडी बाद केले. अरमान पठाण आणि ओमर पटनीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही छाप पाडताना अश्विनने २५ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी करत युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. अर्धशतकापासून वंचीत राहिलेल्या अश्विनने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार ठोकले. अरमान पठाणने ३२ धावा केल्या. सिद्धार्थ घुलेने दोन गडी बाद केले. तर सिद्धार्थ नरसिम्हा, प्रथमेश बेलछेडा आणि दिपक भोगलेने  प्रत्येकी एक विकेट मिळवली.

संक्षिप्त धावफलक : बिनेट कम्युनिकेशन : ३४ षटकात सर्वबाद १७५ ( भूषण शिंदे ४३, दिपक भोगले ३१, सिद्धार्थ घुले २५, सागर मुळये २४, अश्विन शेळके ७-३१-३, पार्थ चंदन ७-४२-३, अरमान पठाण ७-२४-२, ओमर पटनी ६-२७-२) पराभूत विरुद्ध  युनायटेड पटनी इंडस्ट्रीज : ३३.४ षटकात ६ बाद १७७ ( अश्विन शेळके नाबाद ४७ , अरमान पठाण ३२, सिद्धार्थ घुले ७-१-३०-२, सिद्धार्थ नरसिम्हा २.४- २४-१, प्रथमेश बेलछेडा ७-३०-१, दिपक भोगले ७-३२-१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *