अनिल ठाणेकर
ठाणे : जगाला पारदर्शी कारभाराचे बौद्धीक देणा-या भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आता हळूहळू समोर येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, इंडिया आघाडीचे प्रवक्ते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे.
‘इलेक्ट्रोल बॉन्ड’च्या माध्यमातून धनधांडग्यांच्या मानेवर सुरी ठेवल्यानंतर भाजपने सामान्य-गोरगरीब जनतेच्या नकळत त्यांच्या खात्यातून सरकारी योजनांसाठी पैसे वळते केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सरकारी बँक कर्मचा-यांना हाताशी घेऊन हा घोटाळा करण्यात आला आहे. लोकांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांना सरकारी योजनांचा भाग केले गेले आणि लोकांच्याच टॅक्सचा पैसा वापरून भाजपची प्रतिमा उजळवण्यासाठी सरकारी जाहीरातींवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत एप्रिल २०२३ पर्यंत अनुक्रमे १६.२३ कोटी आणि ३४.१८ कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची आकडेवारी सांगितली जात असली तरी यातील बहुतांश लोकांच्या नकळत त्यांच्या खात्यातून योजनांसाठी पैस काढले गेले आहेत. लोकांच्या खात्यातून सरकारी योजनांकडे हे पैसे वळते करण्याचे आदेश वरून देण्यात आले असल्याची कबुली स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकांच्या कर्मचा-यांनी दिली आहे. ‘Article 14’ या पोर्टलच्या @HemantGairola25 यांनी लिहिलेल्या रिपोर्टमध्ये, कशाप्रकारे खुलेआमपणे लोकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला याची इत्यंभूत माहिती आकडेवारी सहित देण्यात आली आहे. article-14.com/post/banks-wan...मुख्य धारेतील मीडियाच्या रडारवरून भाजप विरोधी बातम्या केव्हाच गायब झाल्या आहेत. पण भाजपवाले आणि गोदी मीडियावाले एक गोष्ट विसरतात ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर ट्विट करताना म्हटले आहे.