रघुनाथ भागवत
महाड : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (रजि.) दिल्ली, शाखा-महाड व रावतळी आयोजित श्री विरेश्वर मंदिर सभागृह येथील रक्तदान शिबीरामध्ये तब्बल 105 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामध्ये 23 स्त्री रक्तदात्यांचाही समावेश होता. उल्लेखनीय आहे, की निरंकारी भक्तांच्या सेवा भावनेने प्रेरित होवून इतर रक्त दात्यांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. तर उदघाट्न प्रसंगी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक गोसावी यांनी बोलताना रायगड जिल्ह्यात रक्तदानाच्या महान कार्यात संत निरंकारी मिशनचे प्रथम स्थानी नंबर आहे.
सदर शिबिराला महाड विधानसभा आमदार भरतशेठ गोगावले, युवा नेते श्रीयश माणिकराव जगताप, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, पत्रकार चंद्रहास नगरकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद माने यांनी सदिच्छा भेट दिली. महाड नगरपरिषद माजी बांधकाम सभापती प्रमोद महाडिक यांनी संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून स्वच्छता अभियानामध्ये महाड नगर परिषदेला मिळालेल्या यशामध्ये संत निरंकारी मिशनचे मोठे योगदान असल्याचे सांगून पूरपरिस्थितीच्या दरम्यान स्वच्छता अभियानामध्ये संत निरंकारी मिशनचे योगदान आहे असे यावेळी अधोरेखित केले. तर राजिप माजी सदस्य जितेंद्र सावंत यांनी देखील मनोगतात संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
महाड युनिट सेवादल संचालक नथुराम निंबरे यांनी सांगितले कि, संत निरंकारी मिशन हे निराकार ईश्वराचे ज्ञान देणारे मिशन आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, फ्री मेडिकल कँप, वननेस वन सारखे सामाजिक उपक्रम राबवणे एवढीच संत निरंकारी मिशनची ओळख नाही. तर, समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्याकडून निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यावर मनुष्य जीवनात ईश्वराची भक्ती सुरू होते व ती मोक्ष मुक्तीसाठी साधन बनते या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला.
मानवमात्राच्या सेवेसाठी रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे. संत निरंकारी मिशन अध्यात्मिक जनजागृती बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य अविरतपणे करत आहे असे प्रास्ताविक मध्ये महाड सेवादल शिक्षक अनिल सकपाळ यांनी व्यक्त केले.
रायगड 40-अ झोनचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे, संयोजक दयाळ पारधी, रावतळी शाखा मुखी प्रविण करबेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रक्तदान शिबिरमध्ये सेवादल युनिट नं. 357 महाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी रक्तसंकलन जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांनी केले. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र व संत निरंकारी मिशनकडून निरंकारी साहित्य, पुष्प देऊन आभार मानण्यात आले.
