क्षयरोग दिनानिमित्त विविध उपक्रमांतून
नवी मुंबई : भारतामधून सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे. हे ध्येय साध्य करण्याकरिता सन 2015 च्या तुलनेत क्षयरोगाच्या प्रमाणात 80% घट, क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 90% घट तसेच क्षयरोगाचा नि:शुल्क उपचार असे आहे. त्या अनुषंगाने नमुंमपामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. नमुंमपा कार्यक्षेत्रात केंद्र शासन व राज्य शासनाच्या मागदर्शक सुचनांनुसार 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 3 सार्वजनिक रुग्णालये व माताबाल रुग्णालयामार्फत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रुग्णास मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येतो.
दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटना, क्षयरोगसंदर्भात लक्ष वेधून घेण्यासाठी क्षयरोग निर्मुलनासंदर्भातल्या महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजी घोषवाक्य प्रसारित करते. यावर्षीचे घोषवाक्य “Yes!, We Can End TB” – “होय, आपण टीबीचा अंत करू शकतो” हे असून यावर्षी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोगविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
यामध्ये नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच नमुंमपा रुग्णालयांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वस्ती पातळीवर विशेषत: झोपडपट्टी व अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात पथनाटय घेण्यात आले. या व्यतिरिक्त जनसमुदाय सभा, रुग्ण सभा कर्मचारी प्रशिक्षण, इ. जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले.
जागतिक क्षयरोग दिनाच्या अनुषंगाने तेरणा वैदयकिय महाविदयालय व डी.वाय.पाटील वैदयकिय महाविदयालय अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा, कॉन्फरन्स, पथनाटय, रुग्णांचे आरोग्य शिक्षण इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘निक्षय पोषण योजना’ अंतर्गत दरमहा रु. 500 उपचार पूर्ण होईपर्यंत क्षयरुग्णांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. नागरिकांनी शासकीय रुग्णालयास संशयित क्षयरुग्ण संदर्भित केल्यानंतर रुग्णाचे क्षयरोगाचे निदान झाल्यास माहिती देणाऱ्या नागरिकांस रु. 500 चा लाभ देण्यात येतो. जे नागरिक क्षयरुग्णांचा यशस्वी उपचार पूर्ण करण्यास मदत करतात त्यांना रु.1000 चा लाभ देण्यात येतो.
क्षयरोगाचे निर्मूलन करणेकरीता शासकिय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स इ. नी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नमुंमपास कळविणे आवश्यक आहे.
नमुंमपा, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरिता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.