काहीतरी नवीन…
श्याम तारे
नैराश्य ज्यांना सतावते त्याचे जीवन कठीण होते आणि त्यातून मार्ग म्हणजे मनोविकार तज्ञ यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधे घेत राहणे हा एकच असतो. नैराश्य कोणत्याही कारणाने येत असले तरी ते जीवनाचा समतोल धराशायी करीत असतात. नैराश्या हा प्रकार १९८० च्या दशकात सुरु झाला असे मानले जाते. आधुनिक संशोधनात असे आढळले आहे की निराश व्यक्तींच्या शरीराचे तापमान साधारण लोकांपेक्षा अधिक असते. निराशा जितकी अधिक तितके तापमान अधिक असते.
याचा उपयोग करून शास्त्रज्ञांनी अशा शरीरांना अधिक तापमानाचाच ताण द्यायचा या हेतूने त्यांना रोज काही काळ “सौना” स्नानघरात ठेवले. येथील तापमान वाढले तसे या रोग्यांना काहीसा आराम पडू लागला आहे. औषधांच्या ऐवजी असा उपाय कुणालाही आवडेल आणि निराश माणसांच्या भोवती असलेल्या लोकांची निराशादेखील कमी होणार आहे. यावर अधिक संशोधन सुरु आहे.
सुरुवातीच्या संशोधनात असे आढळले आहे की निराशेचे प्रमाण कमी झाले तर व्यक्तीच्या शरीराचे तापमान आपोआप नियंत्रित होते. मग ही निराशा कोणत्याही कारणाने कमी झाली असेल तरीही ही बाब सिद्ध होते. विद्युत उपचार, मनोविज्ञान उपचार, निराशा कमी करणारी औषधे किंवा इतर कोणत्याही उपचारांचा निराशा कमी करण्यासाठी उपयोग होत असेल तर तापमान तपासून घ्यावे असे अमेरिकेच्या सानफ्रान्सिस्को मधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एकात्मिक आरोग्य केंद्राच्या मनोवैज्ञानिक अॅशले मेसन यांनी म्हटले आहे.
निराशा आणि शरीराचे तापमान यांचा संबंध असेल तर शरीराचे तापमानच मुद्दाम वाढवता आले तर निराशा कमी होऊ शकेल का? या प्रश्नावर विचार सुरु झाला आणि “सौना” स्नानघराचा मुद्दा समोर आला. “सौना” हा शब्द मूळ फिनलंडमधील आहे आणि ही पद्धत तेथे दोन हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. जमिनीत उतार असलेला बोगदाच खोदला जात असे आणि त्याचा उपयोग करताना त्यात एका शेगडीवर दगड उच्च तापमान होईपर्यंत गरम केले जात असत. साहजिकच घाम येई. केवळ ५५ लाखांची लोकसंख्या असलेल्या फिनलंडमध्ये ३० लाख “सौना” स्नानघरे आहेत आणि त्यांची संख्या येथील मोटार वाहनांपेक्षा अधिक आहे. जुन्या काळी दगड गरम करण्यासाठी ज्या शेगड्या उपयोगात आणल्या जात त्यामधून बाहेर पडणारा धूर खोलीला निर्जंतुक देखील करीत असे.
लाकडे जाळून उष्णतामान वाढवलेली खोली आणि धुरामुळे निर्जंतुक “सौना” स्नानघरे अस्सल मानली जात असली तरी आजच्या आधुनिक काळात तापमान वाढवण्याची विजेवर आधारित पद्धत आली आहे आणि “सौना” स्नानघरे ही उच्चभ्रू लोकांची आरोग्य रक्षणाची एक जागा ठरली आहे. सामान्य लोकांसाठी मात्र कोणत्याही पद्धतीने खोलीचे तापमान वाढवता आले आणि त्यातून शरीराचे तापमान वाढत असेल तर निराशा दूर होईल असे मानता येईल.
लक्षात असेही आले की महाराष्ट्रात पूर्वी बाळंतिणीची वेगळी खोली असे आणि त्यात तिच्या खाटेखाली एका घमेल्यात गोवऱ्या जाळून खोलीचे तापमान वाढवले जात असावे का? याच वेळी बाळंतिणीच्या कमरेलाही शेक मिळत असे.
या दृष्टीने सध्या वाढत असलेल्या तापमानात नैराश्य असणाऱ्या व्यक्तींना काही आशेचा किरण नकीच दिसेल. यावर अधिक संशोधन सुरु आहे.
प्रसन्न फीचर्स
