नवी दिल्ली : दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज ईडीला दणका देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये नियमित जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर पुन्हा त्यांना तुरूंगात जावं लागलं होतं. केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने ४८ तासांचा वेळ मागितला होता. परंतु ही मागणी फेटाळत न्यायाधीशांनी हा जामीन मंजुर केला.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक संपताच २ जून रोजी त्यांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले होते. आता त्याला नियमित जामीन मिळाला आहे.
विशेष न्यायाधीश बिंदू यांनी ईडीची सुनावणी घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. बचाव पक्षाने दावा केला होता की आप नेत्याला दोषी ठरवण्यासाठी फिर्यादीकडे कोणतेही पुरावे नाहीत. यावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी सुरू असताना अतिरिक्त महाधिवक्ता एसव्ही राजू यांनी ईडीतर्फे बाजू मांडली. त्यांनी जामीन देण्यास विरोध केला. आम आदमी पक्षाने गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत जे पैसे खर्च केले, ते हवालामार्फत पक्षाला प्राप्त झाले होते. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात थेट पुरावे असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आप कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद साजरा केला. केजरीवाल यांच्या सुटकेमुळे लोकशाहीला बळकटी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय सिंह यांनी दिली.
