लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीची अनपेक्षितरित्या पीछेहाट झाली. या पीछेहाटीची जी विविध कारणे सांगितली जात आहेत. त्यात महायुतीचे दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका सुरात सांगत आहेत, की विरोधकांनी खोटे नॅरेटिव पसरवले आणि त्यामुळे आमची मते कमी झाली.

विरोधकांनी खोटे नॅरेटिव पसरवले हा आरोप मान्य करता येईल. मात्र हे तुम्हाला लक्षात का आले नाही? आणि तुम्ही वेळीच त्या चुकीच्या खोट्या नॅरेटिवंना उत्तरे देऊन तुमची बाजू स्पष्ट का केली नाही? हा प्रश्न निर्माण होतोच. निवडणुकीच्या राजकारणात तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला नामोहरम करण्यासाठी खरे खोटे मुद्दे मांडणारच. तुमची छोटीशी जरी चूक असली तरी ती जास्त मोठी करून एक मोठा महाघोटाळा म्हणून विकृत स्वरूपात लोकांसमोर कशी नेता येईल हे तुमचा प्रतिस्पर्धी बघणारच. जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात उतरला आहात, तेव्हा तुम्ही सावध राहून तात्काळ त्याचा खुलासा करायला हवा होता, आणि जशी तुमची छोटीशी छिद्रे मोठी करून तुम्हाला बदनाम केले जात होते, तशीच तुमच्या विरोधकांचीही अनेक छिद्रे होतीच ना. ती छिद्रे मोठी करून तुम्ही त्यांना प्रत्युत्तर का दिले नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनता तुम्हाला विचारणारच.
इथे एक गोष्ट विशेषतः एकनाथ शिंदे यांनी लक्षात घ्यायला हवी होती. त्यांनी २० जून २०२२ रोजी सरळ सरळ सापाच्या शेपटीवर पाय ठेवून बंड केले होते. त्यामुळे तो साप त्यांना वारंवार डंख मारण्याचा प्रयत्न करणार ही लक्षात घ्यायला हवे होते आणि वेळीच त्याला ठेचायची तयारी करायला हवी होती. अपेक्षेनुसार यांच्या बंडाच्या अगदी दुसऱ्याच दिवशीपासून शिंदे ज्या पक्षातून बाहेर निघाले त्या शिवसेनेचे प्रमुख नेते अगदी पातळी सोडून शिंदेवर टीका करीत होते. अशावेळी तितक्याच प्रखरतेने त्यांना उत्तरे देणारे प्रवक्ते तुम्ही दोन वर्षात उभे करायला हवे होते. शिंदे गटाजवळ त्यांची बाजू आक्रमक पद्धतीने मांडणारा एकही प्रवक्ता गेल्या दोन वर्षांत समोर आलेला दिसला नाही. सकाळी नऊच्या संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी दुपारी बारा वाजता नितेश राणे येत होते. ते आक्रमक असले तरी अभ्यासात कमी पडत होते.
पक्षातून फुटून वेगळे व्हायला त्यांची जी काही खरी खोटी कारणे झाली असतील ती बाजूला ठेवत भाजपबरोबर सरकार बनवताच आक्रमकपणे या शिवसेना नेत्यांचा प्रतिकार करायला हवा होता. मात्र ते तुमच्यावर आरोप करत राहिले. तुम्ही जिथे जाल तिथे पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत तुम्हाला घटनाबाह्य मुख्यमंत्री मिंधे सरकार अशी दुषणे देत बदनाम करीत राहिले. मात्र या काळात ना भारतीय जनता पक्ष ना शिंदे यांची शिवसेना कधीही जितक्या आक्रमकपणे समोर येणे अपेक्षित होते, तितक्या आक्रमकपणे कधीच समोर आले नाहीत. या निवडणुकीतही त्यांनी तुम्ही ४०० पार करून घटना बदलणार असा खोटा आरोप करून तुम्हाला बदनाम करत होते. मात्र हे खोटे आहे हे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा होता. तुम्ही घटना बदलणार आणि एनआरसी लागू करून देशात मुस्लिमांना बेदखल करणार, दलितांचे आरक्षण काढणार अशा अनेक खोट्या बातम्या ते पसरवत होते. त्याच्याबाबत प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे मुद्द्यांची काहीही कमी नव्हती. मात्र तुम्ही त्यांच्या या चुकीच्या प्रचाराकडे कायम दुर्लक्ष केले आणि आमच्या विकासाच्या जोरावर आम्ही पुढे जाऊ या भ्रमात तुम्ही राहिलात.
तुम्ही महाराष्ट्रातील उद्योग पळवून लावले आणि ते गुजरातला पाठवले असा आरोपही तुमचे प्रतिस्पर्धी वारंवार करत होते. मात्र ते उद्योग त्यांच्याच काळात इथून जायला सुरुवात झाली होती. त्यासाठी तुम्ही श्वेतपत्रिका काढणार असेही जाहीर केले होते. मात्र ती श्वेतपत्रिका कधीच निघाली नाही. खरे तर शिंदे फडणवीस सरकारच्या काळात  राज्यात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक  आली. मात्र या तुमच्या विरोधकांनी अशी गुंतवणूक येण्याला विरोधच केला. स्थानिकांना हाताशी धरून त्यांना भडकवत आंदोलने पेटवली. नाणारचे उदाहरण तर ताजेच आहे. दरवेळी  कोकणात कोणताही नवीन उद्योग येणार म्हटले की कोकणचे सौंदर्य नष्ट होणार आणि मासेमारीचा धंदा संपणार ही ओरड केली जाते. तशीच ओरड त्यावेळीही केली गेली. त्यावेळी ठोस उत्तरे का दिली गेली नाही? आताही कालच कोकणात वाढवणचे बंदर उभारण्याबाबत केंद्र सरकारने मंजुरी जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हे बंदर पूर्णत्वास आल्यावर बारा लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. मात्र तरीही आज तिथे बंदर झाले तर मच्छीमारांचे काय असा मुद्दा करून स्थानिकांचा विरोध सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत हा मुद्दाही पेटवला जाईल आणि सामान्य नागरिकांना भडकवले जाईल. इथे तरी महायुतीचे नेते नेमके आणि स्पष्ट उत्तर देणार का आणि जनसामान्यांच्या मनातला संभ्रम दूर करणार का हा प्रश्न आज सामान्य माणसाला भेडसावतोच आहे.
शेवटी लोकशाही व्यवस्थेत निवडणूक हे देखील एक युद्धच आहे. इथे तुम्हाला प्रतिपक्षावर सतत हल्ला करून त्याला उघडे पाडायचे असते आणि त्यांचे होणारे हल्ले तितक्याच जोरकसपणे परतायचे असतात.तुमचे विरोधक जेव्हा नितीनियम सोडतात तेव्हा तुम्ही धर्मयुद्धाच्या गोष्टी करणे हे चुकीचेच ठरते. तुम्ही तुमच्या विरोधकांना जोखण्यात कमी पडलात आणि त्यांच्या आक्रमक प्रचाराला उत्तर देण्यातही अपुरे पडलात हे वास्तव तुम्हाला स्वीकारावे लागेलच. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे तुमच्या विरोधात अपप्रचार केला. चुकीचे खोटे नॅरेटिव बनवले आणि ते तुम्हाला एक दोन दिवस नाही तर तब्बल पाच वर्ष बदनाम करत राहिले. तुम्ही मात्र धर्मयुद्धाचा विचार करत त्यांच्याशी आम्ही केलेल्या विकासाच्या जोरावर आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि निवडणूक लढवू असे म्हणून लढायची तयारी करत राहिलात, इथेच तुम्ही चुकला आहात.

अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रात तुमची पिछेहाट झाली खरी, मात्र देशात परिस्थिती सावरली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आलेले आहे. त्यालाही तुमच्या विरोधकांचा विरोध चालूच आहे. संजय राऊत दररोज कंठशोष करून मोदी पराभूत झालेत हेच जनसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तरी तुम्ही जागे व्हा, आणि पुढल्या तीन महिन्यात तुमच्या विरोधकांचा खरा चेहरा लोकांसमोर आणा. त्यांच्या चेहऱ्यावरचा नकाब ओढून काढा आणि वास्तव जनतेसमोर आणा. तरच येत्या निवडणुकीत तुम्हाला भवितव्य आहे. अन्यथा पुढील पाच वर्ष तुम्हाला विरोधी पक्षातच बसायचे आहे हे नक्की. पुढील पाच वर्ष तुम्ही विरोधक म्हणून काम करत राहाल आणि इतिहासात “शिंदे फडणवीस तुम्ही चुकलात” म्हणून नोंद केली जाईल हे लक्षात ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *