मुंबई : भाईंदर (पूर्व) येथील शिवशंभो मर्दानी आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद सुधीर गणपत कांबळे यांना लाठी व दांडपट्टा या क्षेत्रात चार दशकांपेक्षा जास्त वर्षे योगदान दिल्याबद्दल उस्मानाबाद येथील प्युपिल्स ऑलम्पिक असोसिएशन इंडिया यांच्यातर्फे २०२४ चा राज्य क्रीडारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी कांबळे यांनी मर्दानी खेळाचा श्रीगणेशा केला. आतापर्यंत या मर्दानी खेळाचे कांबळे यांनी ५०० पेक्षा जास्त मुला-मुलींना यशस्वी मार्गदर्शन केले. शिवशंभो मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून लाठी-काठी, बनाटी, बाणा, ढाल-तलवार, दांडपट्टा, चौकट, भाला, खंजीर, तोफ, तलवार, डबल बनाटी, डबल पट्टा, सांबरशिंग, सिलंबटम्, अष्ट्रोडो आखाडा आदी विविध मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके अनेक ठिकाणी सादर केली आहेत. शिवशंभो मर्दानी आखाडा, भाईंदर (पूर्व) आणि वायएमसीए मुंबई सेंट्रल येथे गेली अनेक वर्षे कांबळे या मर्दानी खेळाचे प्रशिक्षण मुला-मुलींना देत आहेत. त्यांच्या अनेक खेळाडूंनी या मर्दानी खेळात बरीच पारितोषिके मिळवली आहेत. सध्या कांबळे लाठी इंडिया महाराष्ट्र राज्य, मीरा-भाईंदर जिल्हा अध्यक्ष आणि लाठी-काठी सिलंबटम् महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात कांबळे यांना राज्य क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
00000
