मिरा भाईंदर : वसई विरार पोलिस आयुक्तालयात २३१ पोलीस शिपाई रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. सुरुवातीला १९ जून ते २५ जुन दरम्यान भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात ही प्रक्रिया घेण्याचे वेळापत्रक आखण्यात आले होते. यात शारीरिक चाचणी, गोळा फेक, धावणे अशा विविध चाचण्या घेतल्या जाणार आहेत. मात्र भरतीच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्याने मैदानात सर्वत्र पाणी साचले. म्हणून उमेदवारांची केवळ कागदपत्रे तपासणी, बायोमेट्रिक तपासणी आणि शारीरिक मोजमाप प्रक्रिया करून घेण्यात आली. तर मैदान चाचणीसाठी २६ जुन ची तारीख देण्यात आली होती.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यातील बहुतांश उमेदवारांनी सरसकट ही भरती प्रक्रिया रद्द करून ती पावसानंतर घेण्यासाठी आंदोलन देखील केले. परंतु मैदानात उपाय-योजना उभारून नियमित प्रक्रिया पूर्ण करून घेणार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी देखील सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यानंतर भरती प्रक्रिया घेणे शक्य नव्हते. त्यामुळे २० आणि २१ जुन रोजी होणारी दोन दिवसीय भरती प्रक्रिया स्थगित करून ती २७ व २८ जुन पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती उमेदवारांना ऐन वेळी देण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या उमेदवारांचा यामुळे हिरमोड झाला आहे.
कोट
पावसाची हजेरी लागताच पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश शासनाकडून यापूर्वीच देण्यात आले आहेत.त्यानुसार सध्या २० व २१ जुन रोजी होणारी प्रक्रिया ही २७ व २८ जुन रोजी होणार आहे. – श्रीकांत पाठक,अतिरिक्त आयुक्त ,मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *