अनिल ठाणेकर

ठाणे: ठाणे खारलॅण्ड चे मैदान वैयक्तिक जहागीर आहे, अशा प्रकारचा वापर डॉ जितेंद्र आव्हाड करीत आहेत. अजितदादा यांचा या प्रकरणाशी सुतराम संबंध नसताना ते जोडणे ही कला जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या धमकीनंतर पोलीस खात्याने दिनेश पैठणकर यांना देखील पोलीस संरक्षण द्यावे. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून लगावला तर सरकारी जागेवर बेकायदेशीर अनधिकृत टर्फ क्लब, पारसिक ६० फूट डीपी रोडवरील अनधिकृत कार्यालय, कळवा स्टेशनवरील बेकायदेशीर पार्किंग, आतकोनेश्वर नगर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी घेतले जाणारे बेकायदेशीर पैसे, ७२ एकरवर चाळी बांधणारे कोण ? असे प्रश्न उपस्थित करुन जितेंद्र आव्हाड यांना, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व अल्पसंख्याक विभाग निरिक्षक नजीब मुल्ला यांनी लक्ष्य केले.

२४ मार्च २०२४ रोजी राष्ट्रवादीचे माजी मंत्री, कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी खारलॅण्ड येथील मैदानाबद्दल अनेक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केले. जसे स्वप्नामध्ये ओरंगजेबाला संताजी-धनाजी दिसायचे तसे बहुतेक जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नामध्ये कायम आमचे नेते अजितदादा दिसत असावेत आणि त्यांना अजितदादांची भीती वाटते की काय की कुठलाही विषय कुठेही त्यांच्यापर्यंत कसा नेता येईल याचा सातत्याने त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्राचा विचार करतील, महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा विचार करतील का या मैदानाचा विचार करतील ? या मैदानाची लेखी तक्रार मी स्वतः तहसिलदार युवराज बांगर यांच्याकडे केली होती की या मैदानासाठी आमच्याकडून ३४ हजार रुपये घेतले गेले तर  मग जितेंद्र आव्हाड  यांना मैदान फुकट वापरायला कोणी परवानगी दिली आहे ? आणि तो शासनस्तरावर निर्णय झाला. माननीय अजितदादा यांचा या प्रकरणाशी सुतराम संबंध नसताना ते जोडणे ही कला जितेंद्र आव्हाड यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. कळवा येथील खारलॅण्डचे मैदान आहे या मैदानाची संयुक्त मालकी जिल्हा परिषद, पाटबंधारे खाते व क्रीडा विभाग यांची आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून खारलॅण्डचे मैदान हे आपली वैयक्तिक जहागीर आहे, अशा प्रकारचा वापर जितेंद्र आव्हाड व त्यांचे सहकारी करीत होते. ज्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होम मिनिस्टर चा कार्यक्रम करायचा होता त्याची लेखी परवानगी आम्ही तहसिलदार साहेबांकडून मागितली आणि संपूर्ण प्रक्रिया करुन म्हणजे जिल्हा परिषद, पाटबंधारे खाते व क्रीडा विभाग यांच्या परवानग्या घेतल्यानंतर जवळपास ३४ हजार रुपयाचे दोन दिवसाचे शुल्क खारलॅण्ड मैदानाचे भरल्यानंतर देखील ज्यावेळी कामाची सुरुवात करण्यासाठी त्या मैदानावर मी स्वतः तिथे गेलो त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या गुंडांकडून मला अडविण्यात आले. त्यावेळी मी सांगितले की मला जर मैदानावर येऊ दिले नाही तर मी पोलीस स्टेशनला फोन लावेन, त्यानंतर त्यांची पांगापांग सुरु झाली. म्हणजे ते मैदान आपली मालकीचे आहे. आपली जहागीर आहे अशापद्धतीने वापरण्यात येत होते. गेल्या सात ते आठ वर्षे या मैदानावर कुठल्याच राजकीय पक्षाला, कुठल्याच संस्थेला तिथे कार्यक्रम करु द्यायचा नाही. आपण मात्र क्रिकेटच्या नावावर लाखो रुपये कमवायचे, क्रिकेटच्या नावावर तिथल्या तरुण मुलांचे भविष्य खराब होईल अशाप्रकारचे भावनिक आवाहन करायचे. खरतर ती जागा शासनाची आहे, शासनामध्ये शुल्क भरुन ती जागा कोणीही वापरु शकतो पण ज्यांना ती जागा फुकट वापरायची सवय झालीय आणि कोणालाच ती जागा वापरुच द्यायची नाही, अशी वस्तुस्थिती असताना खोटे आरोप  केले जात आहेत पण क्रिकेट तिथे बंद व्हावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अजिबात भूमिका नाही, पण जागा हडपणे, त्यावर आपला कब्जा करणे ही त्यांची नेहमीची सवय आहे.जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय अधिकारी दिनेश पैठणकर यांचे नाव घेऊन त्यांना धमकावण्याचा देखील प्रयत्न सुरु केला आहे. मला भिती वाटते की ज्या पद्धतीने ठाणे महापालिका अधिकारी महेश आहेर यांच्यावर हल्ला झाला त्यापद्धतीने दिनेश पैठणकर यांच्यावर हल्ला होऊ नये कारण आव्हाड यांची संस्कृती, संस्कार, विचार करमुसे पासून, महेश आहेर पासून दिनेश पैठणकर पर्यंत पोहोचू नये अशाप्रकारची मला भिती आहे. त्यामुळे पोलीस खात्याने दिनेश पैठणकर यांना देखिल पोलीस संरक्षण द्यावे. शासकीय अधिकारी आपले शासकीय कर्तव्य बजावत होता. ते पुढे जाऊन हे देखील म्हणाले की सकाळी ६.३० वाजता बैठक झाली. माननीय अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री या नात्याने राज्यातील कुठल्याही प्रशासकीय अधिकार्‍याकडून ब्रिफींग घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे ती मिटींग एवढ्याश्या छोट्या कारणासाठी नव्हती. पण खोट बोल पण रेटून बोल ही ज्यांची संस्कृती आहे. त्यांना ते लखलाभ. शासनाच्या मालमत्तेवर कब्जा करायचा, जागा बळकावयाची,  स्वतःच्या ताब्यात ठेवायची आणि टाहो फोडायचा की मी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात गेली अनेक वर्षे विधीमंडळात आवाज उठवतो म्हणून. तुम्ही मंत्री होतात तेव्हा तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाहीत. माझे त्यांना उघड चॅलेंज आहे या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी २४ तासात पत्रकार परिषद घ्यावी आणि माझे आरोप खोडून काढावेत. मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करीत आहे, असे सांगून त्यांचे प्रेम उचंबळून आले आहे. विधीमंडळात मुख्यमंत्र्यांच्याविरोधात भाषण करायचे आणि त्याच मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी मागे फिरायचे ही दुटप्पी भूमिका कायम जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा, आणि जो नाही झाला कार्यकर्त्यांचा तो काय होणार पक्षाचा, असा जाहीर टोला प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे.

खारलॅण्ड मैदानावर जितेंद्र आव्हाड यांची अनिरुद्ध क्रिकेट ॲकॅडमी ही क्रिकेटचे प्रशिक्षण हे पैसे घेऊन देत आहेत.. म्हणजे उघडपणे तिथे व्यवसाय सुरु होता. सर्वसामान्य विद्यार्थी युवक तेथे क्रिकेट,  फूटबॉल सारखे खेळ खेळू शकत नाही.जितेंद्र आव्हाड यांना आवाहन आहे की त्यांनी खारलॅण्ड मैदानावर मोफत प्रशिक्षण द्यावे. पण ते करणार नाहीत. सरकारी जागेवर बेकायदेशीर अनधिकृत मोठा टर्फ क्लब बांधण्यात आला आहे. ७२ एकर शासकीय जागेवरील पारसिक ६० फूट डीपी रोडवरील श्रीसमर्थ सोसायटीच्या कोप-यावर अनधिकृत मोठे कार्यालय उभारण्यात आले आहे. येथे चोरीच्या स्टीलचा माल कोण उतरवत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी येथे नुकतीच कारवाई देखिल केली आहे. कळवा स्टेशनवरील बेकायदेशीर पार्किंग कोणाची आहे ? कळव्यातील आतकोनेश्वर नगर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बेकायदेशीर पैसे कोण घेतात ? व्हाईट पेपर महापालिका अधिकारी पोलीस यांच्यामार्फत सादर करा की ७२ एकरवर चाळी बांधणारे कोण आहेत? एका बाजुला अजितदादांना सांगायचे तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता तर दुसरीकडे त्यांची मिमिक्री करायची. एकीकडे पत्रकार परिषदा घेऊन विरोध करायचा दुसरीकडे निधी मागायचा नागरिकांसमोर संत व्हायचे पण बेकायदेशीर कामे करायची ही जितेंद्र आव्हाड यांची संस्कृती आहे असा हल्ला प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी चढविला.

या खारलॅण्ड मैदानाचा सर्वे नंबर आहे : ३१/१, ३१/२ व ३१/३, ३२/१ व ३२/२. जवळ-जवळ १३ हजार ६१० स्क्वेअर मिटरचे हे मैदान आहे. जिल्हा परिषद, पाटबंधारे व क्रीडा या तीन खात्यांची या मैदानावर मालकी आहे. जर इतर संस्थाना पैसे भरुन खारलॅण्ड मैदान वापरता येऊ शकते तर यानीही पैसे भरुन मैदान वापरायला हवे शासनाच्या मालमत्तेवर कब्जा करायचा, जागा बळकावयाची,  स्वतःच्या ताब्यात ठेवायची. खारलॅण्ड मैदान हे कळवेकरांना वापरायला मिळायला हवे अशीच राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. पण जितेंद्र आव्हाड यांना फुकटच मैदान वापरायची सवय लागेलेली आहे. तसेच कावेरी सेतु इथे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे असलेले कार्यालय हे सर्वे नंबर १११ हा सामाजिक न्याय विभाग व मध्य रेल्वेच्या नावावर आहे. या कार्यालयाच्या बाजुला कुठल्याही महापालिकेच्या परवानग्या न घेता ७५ लाख रुपये खर्चून एक अनधिकृत लायब्ररी बांधण्यात आलेली आहे. कोणी त्यांना ७५ लाखाचा निधी खर्च करण्याची परवानगी दिली, महापालिकेच्या अधिकार्‍यावरही कारवाई व्हायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *