ठाणे, मीरा भाईंदर हद्दीवरील ‘फाउंटन हॉटेल ते गायमुख’ पर्यंत भविष्याचा विचार करून रस्ता दुप्पट रुंद होणार आहे. हा रस्ता ६० मीटर रुंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती व ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्य केली आहे. त्यानुसार काल या रस्त्याच्या साईट वर जाऊन आमदार सरनाईक , मीरा भाईंदर आयुक्त व एम एम आर डी ए अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. एम. एम. आर. डी. ए. च्या माध्यमातून हा रस्ता विकसित केला जाणार असून पाहणी नंतर मुख्यमंत्र्यांना याबाबतचा अहवाल दिला जाणार असून सर्व प्रक्रिया करून पावसाळ्या नंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
हे रस्ता रुंदीकरण होत असताना त्याच्या मधोमध डबल डेकर पूल उभारला जाणार आहे. गायमुख ते फाउंटन हॉटेल म्हणजेच काशीमीरा पर्यंत मेट्रो आधीच मंजूर झाली आहे. त्यामुळे या मार्गावर डबलडेकर पूल असेल आणि वरून मेट्रो धावेल आणि खालून वाहने जाण्यासाठीचा पूल असणार आहे , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. ठाणे घोडबंदर भाईंदर या रस्त्यावर ट्राफिकचे प्रमाण वाढत असून भविष्याची गरज लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे. फाऊंटन हॉटेल ते गायमुख पर्यंत रस्ता सध्या ३० मीटर इतका आहे. सध्याची व भविष्याची गरज ओळखून हा रास्ता दुप्पट म्हणजे ६० मीटर इतका रुंद केला जावा अशी आमदार सरनाईक यांची मागणी आहे. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करून mmrda ने हे रस्ता रुंदीकरणाचे काम करावे , पाहणी करून रस्त्याच्या कामाचे खर्चाचे अंदाजपत्रक आणि अहवाल सादर करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. याबाबत आमदार सरनाईक यांची एम एम आर डी ए चे आयुक्त डॉ संजय मुखर्जी , अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांच्याशी चर्चा ही झाली होती. हा रस्ता रुंद करण्याचे काम सुरु करण्यासाठी त्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. काल आमदार सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जागेवर जाऊन पाहणी केली. मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त  संजय  काटकर , नगररचना विभागाचे पुरुषोत्तम शिंदे, महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबीत , एमएमआरडीएचे विनायक सुर्वे व इतर अधिकारी सोबत होते , त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि एकूणच आढावा घेतला. फाउंटन हॉटेल ते गायमुख रस्ता रुंद करण्याच्या कामाची पाहणी झाल्यांनतर आता याबाबतचा अहवाल mmrda आयुक्तांना दिला जाईल.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही अंतिम मंजुरी घेतली जाईल ,  व खर्चाचे अंदाजपञक तयार केले जाईल. मंजुरी व एकूणच प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरु होईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
गायमुख ते फाउंटन हॉटेल हा जवळपास ६ किमी लांबीचा रस्ता आहे. सध्या ३० मीटर रुंद असलेला रस्ता भविष्याची गरज लक्षात घेता ६० मीटर होणे आवश्यक आहे. गायमुख ते काशिमीरा या मार्गावर मेट्रो मार्ग ही मंजूर झाला आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद करून रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे काम ही केले जाणार आहे. भविष्याची गरज ओळखून रस्ता रुंदीकरण करून रस्त्याच्या मधोमध मेट्रो मार्ग उभारणीही केली जाणार आहे. त्या दृष्टीने आमदार प्रताप सरनाईक यांचा पाठपुरावा व कामाचे एकूणच नियोजन सुरु आहे. फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याचे झाल्यास येथे रस्त्यासाठी जमीन संपादित करावी लागेल. त्यात ९० टक्के खासगी जमीन आहे. ही खासगी जमीन मोबदला देऊन संपादित करावी लागणार आहे तर १० टक्के जमीन वन खात्याची जमीन असून ही सर्व आवश्यक जमीन संपादित केल्यास ६० मीटर रास्ता प्रत्यक्षात येऊ शकणार आहे असेही आमदार सरनाईक पाहणी दरम्यान म्हणाले. ठाणे , मीरा भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या , येथील रस्त्यांवर वाढत चाललेली ट्राफिक , रस्त्यांवर येणारा ताण , अनेकदा तासनतास होणारी वाहतूक कोंडी पाहता भविष्याची गरज ओळखून रुंद रस्त्याची आवश्यकता आहे. फाउंटन हॉटेल ते गायमुख पर्यंत सध्या  चार पदरी रस्ता आहे तो भविष्यात रुंदीकरण झाल्यावर 8 पदरी होणार आणि त्याचा लोकांना मोठा फायदा होईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. पावसाळ्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असून रस्त्याचे काम जेव्हा कधी प्रत्यक्षात सुरु होईल तेव्हा रुंदीकरणाच्या कामामुळे मूळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेऊन त्या दृष्टीने आतापासून नियोजन केले जावे असेही आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे.
चौकट
ठाण्याच्या कापूरबावडी पासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. तेथून गायमुख ते फाउंटन हॉटेल पर्यंत रस्ता रुंदीकरण करताना रस्त्याच्या कडेला ३ मीटर जागेत सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. ठाणे ते फाउंटन हॉटेल दरम्यान असा हा जवळपास १० किलोमीटरचा सायकल ट्रॅक रास्ता रुंदीकरणा दरम्यान बनवला जाणार आहे अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *