गडचिरोली : महायुतीमध्ये लोकसभा तिकीट वाटपावरून जे काही सुरू आहे. त्यावरून अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाची अवस्था रस्त्यावरच्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट झालेली आहे. भाजप देतील तेवढ्या जागांवर समाधानी होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसून यापुढे ते भाजपचे गुलाम म्हणून जगतील, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महायुतीला राज्यात २० पेक्षा अधिक जागा मिळणार नाही. हे जागा वाटपादरम्यान अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप यांची झालेली दमछाक यातून स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षाने कितीही दावा केला तरी भाजप देतील तेवढ्या जागा मुकाट्याने स्वीकारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. यापुढेही ते भाजपचे गुलाम म्हणून जगतील. त्यांची अवस्था काही मागताही येत नाही. बोलताही येत नाही आणि काही सांगताही येत नाही. अशी झालेली आहे. त्यांच्यापेक्षा रस्त्यावरील भिकारी तरी बरा. अशी बोचरी टीका त्यांनी केली. माजी आमदार डॉ. उसेंडी यांनी उमेदवारीच्या लालसेने भाजपमध्ये प्रवेश केला. ही त्यांची राजकीय आत्महत्या असून ते आता भाजपचे पोपट झाले आहे. त्यामुळे काहीही आरोप करत सुटले आहे. असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभेचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आमदार सहसराम कोरोटे, माजी खासदार मारोतराव कोवासे, बबनराव तायवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम, सुरेंद्र चंदेल, पेंटारामा तलांडी, रवींद्र दरेकर, अजय कंकडालवार, हनमंतू मडावी तसेच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकांमध्ये एवढा उत्साह पहिल्यांदाच बघितला
मागील तीन दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या राजकरणात मी सक्रिय आहे. पण आज उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेला जनसमुदाय मी पहिल्यांदाच बघितला. यावरून महायुतीने समजून जावे की त्यांचा पराभव निश्चित आहे. असे आव्हान वडेट्टीवार यांनी केले.