पुणे : लोकांना महत्त्वाकांक्षी न बनविता त्यांना मोफतच्या गोष्टी अधिकाधिक देऊन गरीब बनविले जात आहे. गरिबी हटविण्यापेक्षा गरिबी जोपासण्याचे काम सरकार करत आहे. गरिबीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी ही राजकीय व्यवस्था चुकीची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनी सोमवारी राजकीय व्यवस्थेवर टीका केली.
विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस व ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्या वेळी हर्डीकर बोलत होते. या वेळी हर्डीकर यांनी विविध विषयांवर विचार मांडले. ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.
हर्डीकर म्हणाले, शेतकर्यांच्याही खात्यावर पैसे टाकले जात आहेत. त्यामुळे आंदोलनाची संख्या कमी झाली आहे. शेतकरी संघटनांना त्यांचा प्रभाव वाढवायचा असेल, तर पुन्हा एकदा ‘भीक नको’ अशी भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा राजकीय व्यवस्था गरिबीला प्रतिष्ठा देण्याचे कार्य सुरूच ठेवेल.
मला एकीकडे शास्त्रीय संगीत आवडते, तर दुसरीकडे कविता, असे सांगत हर्डीकर म्हणाले, एक कवितासंग्रह होईल एवढ्या कविता मी लिहिलेल्या आहेत. कविता प्रचंड लिहिल्या, मात्र त्या प्रकाशित करण्याचे धाडस केले नाही. मी वाड्:मयाचा समाजसेवक नाही. मला ज्या गोष्टीत आनंद मिळतो, तोपर्यंतच त्या क्षेत्रात काम करतो. सृजनशील माणसांवर आणि प्रतिभावंतांवर आजचे चाहते लोक नेहमी अन्याय करत आले आहेत. आम्हाला अजून द्या, आम्हाला अजून द्या, असे त्या माणसाला बोलून अडकवून ठेवतात. माझ्यासारख्या माणसाने हे कधीही मान्य केले नाही, अशी टिप्पणीही हर्डीकर यांनी केली.
भारतीय हिंदू, भारतीय मुस्लिम या द़ृष्टीने मी कधी पाहिलेच नाही. मी केवळ भारतीय या द़ृष्टीने पाहत आलो आहे. त्यामुळे सर्वांनीच एकमेकांकडे भारतीय या द़ृष्टीने पाहावे. मी भारतीय हिंदू, भारतीय मुस्लिम असे कधी लिहिणार नाही. लिहिलेच तर भारतीय म्हणून लिहीन असेही हर्डीकर म्हणाले.
मी नोकरी कधीच शोधली नाही, तर नोकरीने मला शोधले. भराभरा लिहिलेही नाही. कधी पुरस्काराच्या मागेही धावलो नाही. आपण कायम यशापयश उभे मोजतो. यश आणि अपयश आपण आडव्या पद्धतीने का मोजत नाही? असा प्रश्न उपस्थित करून मी दीर्घकाळ कोठेच टिकलो नाही. नव्या गोष्टींनी मला कायमच आकर्षित केले. मी नेहमी वेगवेगळे पर्याय शोधले, अशा पद्धतीने हर्डीकर यांनी आपला प्रवास बोलका केला.
