ठाणे :  समता, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायाचे राज्य करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कळवा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन व आंतराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समाज कल्याणच्या मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचूरे, ठाण्याचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, लेखक व कवी रघुनाथ देशमुख, व्याख्याते बबन सरोदे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था- बार्टीच्या प्रकल्प अधिकारी मेघा पवार, समतादूत रेश्मा साळवे उपस्थित होत्या.
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून यावेळी सामाजिक न्याय भवन ते पारसिक नगर, कळवा पा परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भिवंडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
समाज कल्याण, मुंबई विभागच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराजाच्या विचारांची प्रेरणा घेवून स्वत:ची तसेच समाजाची  प्रगती कशी साधता येते यावर मार्गदर्शन केले.
समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. इंगळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना व्यसनांपासुन दूर  रहाण्याचा संदेश देवून व्यसनमुक्तीवर आपले विचार मांडले.
यावेळी श्री. देशमुख यांनी व्यसनमुक्तीवर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, व्यसन मुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांचे योगदान पाहिजे. छोटी-छोटी व्यसने सुध्दा आपले मोठे नुकसान करतात. व्यसनामुळे फक्त आपले नुकसान होत नसून सर्व कुटुंबाचे नुकसान होते.
व्याख्याते श्री.सरोदे यांनी न्याय व सामाजिक न्याय यामधील फरक समजून सांगितला. तसेच समतादूत रेश्मा साळवे यांनी  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली.
कार्यक्रमाची सांगता अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ घेवून करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक लेखाधिकारी अरुण साळुंखे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *