वाणगाव : डहाणूतील शेतकरी हा आधुनिक विचारसरणीचा असल्याने शेतात पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक पद्धतीचा परिस्थितीनुसार बदल होत असतो. यंदाही तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी पद्धतीने, तर ५० हेक्टरवर एसआरटी पद्धतीने भातलागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध होणार आहे.
भातशेती हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. डहाणू तालुक्याचे एकूण ९८,५३७.३८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यातील १५,७४३.६० हेक्टरवर भातलागवड आणि २३४.७५ हेक्टरवर नागलीचे पीक घेतले जाते. यंदा तालुक्यात ५० हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने आणि ५० हेक्टर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भातलागवड होणार आहे. डहाणूतील नरेशवाडी येथेही २० एकर क्षेत्रावर यंत्राच्या साह्याने भात लागवड करण्यात येणार आहे. नरेशवाडी, डेहणेपळे, रानशेत, रणकोळ, ऐना, वाघाडी या भागांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत. तालुक्यातील सर्व कृषी सहायकांनी आपापल्या सजेतील शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करून आधुनिक लागवड पद्धतीचा अवलंब करत आहेत, असे डहाणूचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले. नरेशवाडी संस्थेने नुकतेच नवीन भात लागवड यंत्र खरेदी केले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीही यंत्राद्वारे लागवड करावी. यासाठी ते यंत्रांचे कमीत कमी भाडे आकारून लागवडीस प्रोत्साहन देणार आहेत.
ट्रे तयार करण्याची पद्धती
रोपे ट्रे किंवा प्लास्टिक कागदावर चौकट करता येतात. पेरणीच्या सुरुवातीला माती व शेणाचे ७०:३०चे प्रमाण ठेवून ट्रे भरावे. एकरी फक्त आठ किलो बियाणे लागते. पारंपरिक पद्धतीपेक्षा साधारणत: दहा ते बारा किलो बियाण्याची बचत होते. एका ट्रे मध्ये ८० ग्रॅम बियाणे पेरले जाते. एकरीसाठी १०० ट्रे लागवडीसाठी लागतात. रोपवाटिका तयार करताना सर्वप्रथम ६० ते ७० टक्के ट्रे मातीने भरून घ्यावे. त्यामध्ये २० ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे १५:१५:१५ हे खत मिसळून त्यावर एकसमान बियाणे पसरवावे.
खरीप हंगामात कृषी विभाग डहाणू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. भातपिकाचे विविध प्रात्यक्षिके, एसआरटी, यंत्राद्वारे भातलागवड, चारसूत्री लागवड पद्धत, ⁠भात व नाचणी पिकासाठी शेतीशाळा, ⁠एक रुपयात पीकविमा, लागवडीनंतर त्यावर येणाऱ्या कीडरोगाबाबत माहिती, क्रॉपसॅपअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मदत करणे आदी कामे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत. भात प्रमुख पीक असल्याने त्याचे लागवड क्षेत्र कमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *