मुंबई : सर्वात जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये ही पेपरफूट झाली होती, आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. या अधिवेशनात आम्ही ज्या परीक्षा घेण्यात आल्या, त्याचा लेखाजोखा मांडणार आहोत असा इशाराच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
अधिवेशनापूर्वी सरकारने दिलेल्या चहापान निमंत्रणावर विरोधकांनी बहिष्कार घातल्यावर त्यानंतर, सत्ताधारी पक्षानेही चहापान कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज कारवाई, पेपरफुटीप्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं.
खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नेरेटीव्ह बनवून एका निवडणुकीत मतं मिळाल्यानंतर आता खोटच बोलायचं ह्या मानसिकतेत विरोधी पक्ष आहे. विदर्भातील संचिनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश असं ते म्हणातात. मात्र, ज्यांनी विदर्भातील एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही तेच आता आम्हाला सांगत आहेत. पण आमच्या सरकारने केवळ सुप्रमाच दिली नसून कामही सुरू केलं आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विदर्भातील विकासकामे आणि संचिन प्रकल्पाची माहिती दिली.
उद्योग आणि गुंतवणुकीत त्यांच्या काळात 3-4 नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात गेल्या 2 वर्षांपासून पहिल्या क्रमांकवर आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. खोटे नेरेटीव्ह तयारी करण्याची फॅक्टरी यांनी उभी केली आहे, त्याला आम्ही अधिवेशनात उत्तर देऊ. विशेषत:, गँगस्टर, ड्रग्जप्रकरणावर मोठा हो हल्ला करण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र, 100 कोटी रुपयांसदर्भात उच्च न्यायालयाने ह्यांच्या गृहमंत्र्यांसदर्भात एफआयआर करुन त्यांना अटक केली होते हे ते विसरत आहेत.
ड्रग्जविरुद्ध आम्ही लढाई सुरू केली आहे, संपूर्ण देशात सुरू केली असून ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे. एवढंच नाही, पुण्यातील घटना दुर्दैवी होती, त्यातही कोणालाही स्पेअर न करत राज्य सरकारने कडक भूमिका ठेवली आहे. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्था असो किंवा ड्रग्ज संदर्भात झिरो टोलरन्स पॉलिसी असो हे सरकार सुरूच ठेवणार आहे, असेही फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. कोविड घोटाळे, खिचडी घोटाळे हे सगळं आम्ही काढणार. विरोधी पक्ष केवळ हंगामा करत असून माध्यमांसमोर बोलत आहे. त्यांनी सभागृहात बोलावे, असेही फडणवीसांनी म्हटले.
