२८८ जागांवर स्वबळाच्या दृष्टीने चाचपणी
अकोला : आगामी विधानसभेसाठी वंचितने पुन्हा एकदा एकला चलो रेचा नारा दिला आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या स्वबळाच्यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांकडून पक्षाने अर्ज मागवले आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यात वंचितने निरिक्षकाची नेमणूक केली आहे.
आज राज्यातील सर्व मतदारसंघातील इच्छुकांची माहिती पक्षाकडे दिली जाणार. परिणामी, वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांची राज्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकला चलो रे ची तयारी असल्याचे यातून दिसून आले आहे. प्रकाश आंबेडकर गेल्या 15 दिवसांपासून कुटूंबियांसह सुट्टीसाठी महाराष्ट्राबाहेर गेल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ते राज्यात परत आल्यावर विधानसभानिहाय आढावा घेणार असून त्यावरुन अंतिम निर्णय पुढे घेतला जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितने लढवलेल्या 38 जागांवर पक्षाला 16 लाखांच्या आत मते मिळाली आहेत. तर 2019 च्या तुलनेत पक्षाचा जनाधार घसरला असल्याचेही यातून दिसून आले आहे. पक्षाचे हक्काचे मतदार असलेले दलित, ओबीसी, मायक्रो मायनॉरिटी आणि मुस्लिम मतदार मविआकडे गेल्याने वंचितला मोठा फटका बसल्याचा अंदाज आहे. दुसरीकडे वंचितला मविआजवळ करण्याची शक्यता आता धुसर असल्याचे चित्र आहे. म्हणूनच वंचितने आतापासूनच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच गमावलेला जनाधार परत मिळवण्यासाठी वंचितने आतापासून चाचपणी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावं लागल्याचे बघायला मिळाले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील मंथन केल्यानंतर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार असल्याचा विश्वास दर्शवला. तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता पूर्ण ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्त्यांना कामाला जागण्याचे आदेश दिले आहे. परिणामी, त्या अनुषंगाने वंचित कामाला लागल्याचे बघायला मिळत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविणार असल्याची स्थिती आहे. कारण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यासाठी वंचितने राज्यभरात हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी आणि मुलाखती वंचित घेत आहे. दरम्यान, अमरावतीतील विधानसभेसह राज्यातील संपूर्ण विधानसभा वंचित पूर्ण ताकदिने लढवणार असल्याची माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिलीय.
