Author: bittambatami.com

आदिवासींना मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्या, अन्यथा बहिष्कार घाला- अनिल भांगले

आदिवासी क्रांती सेनेचे आवाहन ठाणे : पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे रोजी होत आहे. या मतदानामध्ये मुरबाड,  शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आदिवासींची मतसंख्या मोठी आहे. मात्र, अनेक उमेदवारांकडून आदिवासी समाजाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी मानसन्मान देणाऱ्या उमेदवारालाच मत द्यावे; अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी केले आहे. अनिल भांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, मुरबाड,  शहापूर, भिवंडी, वाडा, कल्याण पूर्व आणि पश्चिम तसेच डोंबिवलीच्या ग्रामीण पट्ट्यात आदिवासींची मोठी संख्या आहे. या भागातील आदिवासींच्या जमिनींवर धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. कल्याण, मुरबाड, मलंगगड परिसर, शहापूर, भिवंडी भागातील अनेक वाड्या वस्त्यांवर मूलभूत सुविधा पोहचविण्यात शासनाला यश आलेले नाही. पाणी, आरोग्य,  शिक्षण आदी सुविधा आदिवासींना मिळत नाहीत. याबाबत अनेक उमेदवारांनी आपल्या  जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही. आदिवासी वाड्या वस्त्यांवर उमेदवार जाण्यास तयार नाहीत. म्हणजेच, आदिवासींचा विकास करण्याबाबत कोणतेही धोरण आखले जात नाही. एकूणच अनेकांनी आदिवासींना गृहीत धरले आहे. त्यामुळेच आता जे उमेदवार आदिवासी समाजाला मानसन्मान देतील, अशाच उमेदवारांना मत द्यावे. अन्यथा, बहिष्कार घालावा, असे आवाहन अनिल भांगले यांनी केले.

वडाळा ‘आरटीओ’च्या तिजोरीत ४८३ कोटी

मुंबई : नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, नवीन अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण, वाहनांचा कर, वाहनांवरील बिनबोजा उतरविणे व चढविणे, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र व त्याचे नूतनीकरण, वाहनांना जारी केलेले शुल्क आणि दंड वसुली यातून वडाळा आरटीओला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४८३.७७ कोटी रुपये महसूल मिळाला. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४५०.२२ कोटी महसूल मिळाला होता. या दोन वर्षांच्या तुलनेत महसुलात सुमारे ७ टक्के म्हणजे ३३.५५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वडाळा आरटीओला दंडात्मक कारवाईकरिता कार्यालयीन कार्यक्षेत्रामध्ये विधीग्राह्य नसलेली अनुज्ञप्ती, बिल्ला (बॅच) धारण न करणे, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, विमा प्रमाणपत्र वैध नसणे, वायू प्रदूषण प्रमाणपत्र वैध नसणे, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक, विना परवाना / अवैध प्रवाशी वाहतूक, विनाआच्छादन माल वाहतूक, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे व इतर विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्या वाहनचालक व मालक यांच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये जारी करावयाच्या प्रकरणांकरीता वार्षिक लक्ष्य १४,४०० प्रकरणे होते. दंडात्मक कारवाई करून तडजोड शुल्क वसुलीचे वार्षिक लक्ष्य म्हणून ४ कोटी ५० लाख देण्यात आले. तर, २०२३-२४ या आर्थिक वर्षात वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांकडून तपासणीद्वारे वाहनधारकांकडून एकूण ३ कोटी ७१ लाख रुपये दंडवसुली करण्यात आली. वडाळा आरटीओने गेल्या आर्थिक वर्षात एकूण १०,५०० ऑटोरिक्षा टॅक्सी वाहनांची तपासणी केली. दोषी ३,४०० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ६१.०५ लाख इतकी तडजोड शुल्क रक्कम वसूल करण्यात आली. तसेच एकूण ८५८ प्रकरणी परवाना व अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आले, असे वडाळा आरटीओ कार्यालयाने सांगण्यात आले.

डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्प पत्राचे अनावरण

कल्याण : सलग १० वर्ष यशस्वी खासदार असलेले महायुतीचे कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढील पाच वर्षाचे व्हीजन आज पत्रकार परिषदेत सादर केले. यात मतदार संघातील रेल्वे स्टेशनलगत ट्रॉमा सेंटर, रेतीबंदर ते कल्याणपर्यंत कोस्टल रोड, अँक्सेस कंट्रोल फ्रिवे, इंटर्नल मेट्रोने शहरे जोडणे आणि पाणी पुरवण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे वचन ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी संकल्प पत्रात दिले आहे.ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वासने पूर्ण केली. कल्याण यार्ड रिमॉडलिंगचा ८०० कोटींचा प्रकल्प होत आहे. यामुळे मेल एक्सप्रेस, लोकल सेवा यांना क्रॉसिंग बंद होऊन स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध होईल. खारेगाव, दिवा, ठाकुर्ली आणि कल्याण पश्चिम येथील रेल्वे फाटक बंद झाले आहेत. त्यामुळे पुढील एक वर्षात पाचवी आणि सहावी लाईन कार्यान्वित होऊन कल्याण ते कुर्लापर्यंत शटल सेवा सुरु करणे शक्य होईल, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. कल्याण-कर्जत, कल्याण-कसारा शटल सेवा, दिवा वसई मार्गावर लोकल सेवा, कल्याण ते पनवेल लोकल सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यातील तिसरी मुंबई कल्याण परिसरात होणार असून पुढील पाच वर्षात येथे पायाभूत सुविधांचा नियोजनबद्धपध्दतीने विकास केला जाईल, अशी ग्वाही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याणमध्ये मेट्रो १२ चे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर बदलापूरपर्यंत मेट्रो १४ ला मंजुरी मिळाली असून त्याचे काम लवकरच सुरु होईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. विठ्ठलवाडी ते शहाड हा ब्रीज करण्यात येणार आहे. कल्याणमध्ये यूटाईप रोड, इतर शहरात पार्किंग प्लाझा सुरु केले जातील, असे आश्वासन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. उल्हासनगरातील २०० बेड्सचे नो कॅश काउंटर हॉस्पिटल प्रत्येक शहरात सुरु करणे, स्पोर्ट्स स्टेडियम, महिलांसाठी, दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी स्वतंत्र भवन उभारण्याचा मानस डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. कॅन्सर हॉस्पिटल, ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच सुरु होणार आहेत. कल्याणमध्ये एम्सच्या धर्तीवर हॉस्पिटलची मागणी करण्यात आली असे ते म्हणाले. अंबरनाथमधील यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र इतर शहरादेखील सुरु करण्यात येतील. मतदार संघातील सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. अंबरनाथमध्ये आयटीआयचे आधुनिकीकरण करणे, स्टार्टअप्स आणि नवउद्योजकांसाठी अंतरलीमध्ये महा हब मंजूर करण्यात आले असून ते लवकरच सुरु करण्यात येईल, असे ड़ॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये टाटा इन्स्टीट्युकडून २०० कोटींचा निधी मिळाला असून तेथे सेंटर फॉर एक्सलन्स सुरु केले जाणार आहे. २०१४ मध्ये अडीच लाख आणि २०१९ मध्ये साडे तीन लाखांच्या मताधिक्याने मतदारांनी निवडून दिले. सलग दोन वेळा माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिल्याबद्दल डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. महायुतीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक दिलाने काम केल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, कल्याणमध्ये मागील १० वर्षांत झालेल्या विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांच्या कौतुकाची थाप मिळाल्याने आणखी आत्मविश्वास वाढला असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या `नमो नम: वचननामा’ चे प्रकाशन

अनिल ठाणेकर  ठाणे : ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या `नमो नम: वचननामा’ चे प्रकाशन गुरुवारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित पानसे, शिवसेना प्रवक्ते राहूल लोंढे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, रिपाइंचे भास्कर वाघमारे आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. `वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे’ अशा शिर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या पाच वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकासकांचा वाचनाम्यात संकल्प मांडला आहे. जलद, सुखकर आणि सुरक्षित लाईफलाईन अंतर्गत ठाणे मनोरुग्णालयाच्या जागी नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी पूर्ण करणे, ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी, कळवा- ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाचे रखडलेले काम पूर्ण करणे, लोकल फेऱ्या वाढविणे, १२ डब्यांची लोकल १५ डब्यांची करण्यासाठी फलाटांची लांबी वाढविणे, सर्व रेल्वे स्थानके स्मार्ट करण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईत एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज रुग्णालय उभारणे, मीरा भाईंदर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे वाचन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी मतदारसंघ सज्ज असून खारघर येथे ४० हजार प्रेक्षक संख्येचे फुटबॉल स्टेडियम उभारणार असून मतदारसंघात क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहरातील कोंडीमुक्त, वेगवान प्रवासासाठी विविध कामे मार्गी लावली जाणार आहेत. ठाणे – बोरिवली हे अंतर २० मिनिटात पूर्ण करण्यासाठी प्रस्तावित बोगद्याच्या कामाला चालना देणार आहे. प्रवास वेगवान होण्यासाठी मेट्रो ४ आणि ४ अ चे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नवी मुंबई विमानतळ ते संपूर्ण नवी मुंबई शहराच्या मेट्रो कनेक्टीव्हीटीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी वचननाम्यात दिले आहे. ठाणे हा देशातील पहिला झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रगत आणि स्मार्ट शहरांची भरारी अंतर्गत ठाणे, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर शहरांचा सुनियोजित विकास करून या महापालिकांना जागतिक स्तरावर पोहोचविणे, पर्यावरण संवर्धन आणि प्रदुषणमुक्ती अंतर्गत शहरांचे ४० टक्के ग्रीन कव्हर वाढवून ते ६० टक्के करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विकास करताना आणि वारसा जपताना ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे स्थलांतर करून ऐतिहासिक वारशाचे जतन केले जाणार आहे. तसेच ऐतिहासिक संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शिवस=ष्टी उभारणार आहे. घोडबंदर येथे फिल्मसिटी उभारण्याचे आश्वासन नरेश म्हस्के यांनी दिले आहे. मीरा-भाईंदरच्या समृद्धीसाठी समाजोत्थान योजना राबवली जाणार आहे. या महत्त्वाच्या वचनांप्रमाणेच नियोजन शहराचे, नागरिकांच्या हिताचे करत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटला (टीओडी) चालना दिली जाणार आहे.  वॉकिंग स्ट्रीट, सायकल ट्रक उभारणीला प्राधान्य दिले जाणार असून मतदारसंघात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता स्वतंत्र धरण उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  उद्योग-रोजगारांना वाढते बळ, नवी मुंबईच्या विकासासाठी प्रयत्न आणि इतर अनेक कामे करणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी वचननाम्यात नमूद करून २० मे रोजी धनुष्यबाण समोरील बटण दाबून आपणाला विक्रमी मताधिक्क्यांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

26 मे ते 31 ऑगस्ट  या कालावधीत जलयानाना समुद्रात जाण्यास प्रतिबंध

ठाणे : पावसाळी हंगामात दि. 26 मे ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत नोंदणीकृत जलयानाना समुद्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. प्रविण खरा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव पावसाळी हंगामात दरवर्षी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या सर्व बंदरांमधून जलयानांना समुद्रात जाण्यापासून बंदी घालण्यात येते. यावर्षीही दि. 26 मे ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत कोणतीही जलयाने समुद्रात घेऊन जाऊ नयेत, असे आवाहन श्री. खरा यांनी केले आहे. यासंदर्भात मंडळाच्या अखत्यारीतील सर्व बंदर कार्यालयांना कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

सोशल मिडिया आणि आधुनिक सुरक्षा कार्यशाळेचा दैनंदिन जीवनात उपयोग होईल – डॉ. गणेश मुळे

अशोक गायकवाड नवी मुंबई :सोशल मिडिया आणि आधुनिक सुरक्षा कार्यशाळेचा दैनंदिन जीवनात उपयोग होईल असा विश्वास कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी यावेळी व्यक्त केला. दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके कसे ओळखावे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे आज सोशल मिडिया आणि आधुनिक सुरक्षा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागातील समाज माध्यमांशी संबधित काम पाहणारे कर्मचारी व अधिकारी तसेच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय कोकणभवन नवीमुंबई या कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बँकिंग सायबर सिक्युरिटी तज्ञ विकास पाटील व प्रशांत पाटील यांनी स्मार्ट फोन वापरतांना काळजी कशी घ्यावी, पासवर्ड बद्दल सुरक्षितता कशी बाळगावी. तसेच इंटरनेट माध्यमांतून होणारी फसवणूक, सोशल मिडियावरील खोटी प्रलोभने आणि खोटी अमिषे कशी ओळखावी या बद्दल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करुन तपशीलवार माहिती दिली. संगणक आणि मोबाईलचा उपयोग करतांना सुरक्षितता असणे कसे आवश्यक आहे. याबाबतही माहिती त्यांनी दिली.कार्यशाळेच्या प्रारंभी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी प्रस्ताविक भाषणात कार्यशाळेचे महत्व सांगितले. डॉ.मुळे म्हणाले की, आज सर्व वयोगटातून दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा सऱ्हास वापर होतो आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. परंतू या स्मार्ट फोनमधील बरेचशे तंत्रज्ञान आपल्याला माहिती नसते. मोबाईल बॅंकिंगचा वापर वाढला आहे. युपीआय, जीपे, पेटीएम, फोन पे सारख्या आर्थिक व्यवहाराच्या ॲपचा मोठया प्रमाणात वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व गोंष्टीची माहिती समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, या प्रशिक्षणाचा दैनंदिन जीवनात उपयोग होईल असा विश्वास डॉ.मुळे यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यशाळेचे सूत्रसंचलन कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव- पाटील यांनी केले. ऑनलाईन प्रशिक्षण सत्रासाठी विभागात समन्वयाचे काम उपसंपादक प्रविण डोंगरदिवे यांनी पाहिले. यावेळी कार्यशाळेत उपस्थितांनी त्यांना प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणीबाबत प्रश्नोत्तरे केली.

मोदींचा डोळा फक्त सत्तेवर

मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल… नवी दिल्ली : आज देशभऱात अनेक भुकेल्यांना जेवण मिळत नाही, त्यांच्या जेवणाची काही व्यवस्था करावी. अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही, त्यांच्या नोकरीची काही व्यवस्था करावी. पण हे सोडून मोदींचा डोळा फक्त आणि फक्त सत्तेवरच आहे,…

रोज टोप्या बदलणारा माणूस पंतप्रधानपदी हवा आहे का ?

उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल नाशिक : “मोदींनी काल महाराजांचा जिरेटोप घातला, आज गांधीटोपी घातली. रोज टोप्या बदलणारा माणूस तुम्हाला पंतप्रधानपदी हवा आहे का ? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिक येथ महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे…

पाकव्याप्त काश्मिरवर अधिकार भारताचाच-अमित शाह

 नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर आमचाच अधिकार आहे, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज…