Author: bittambatami.com

गणेशोत्सवापर्यंत मिरा-भाईंदरला ‘सूर्या’चे पाणी

भाईंदर : सूर्या प्रादेशिक पाणी योजनेतून मिराभाईंदर शहराला गणेशोत्सवापर्यंत ४० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. शहराला यापुढे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

म्युच्युअल फंडाशी संबंधित नियमांमध्ये बदल

बाजार नियामक ‘सेबी’ने म्युच्युअल फंडांची आघाडी रोखण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्याची तयारी केली आहे. यासाठी ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने आपल्या म्युच्युअल फंड नियमांमध्ये बदलांना मान्यता दिली आहे. यासाठी…

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्या

मुंबई : भारतीय संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी मतदारांनी सजग आणि निर्भय मतदान करावे, यासाठी मुंबईत ‘निर्भय बनो’ जाहीर सभा घेण्यात आली. ही सभा दुभाषी मैदान, गुजरात सोसायटी रोड, विलेपार्ले पूर्व…

पवारांचे वादग्रस्त बोल!!

शरद पवारांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे आणि नंतर असेही सांगितले आहे की मी तसे बोललोच नाही ! शरदराव पवार हे महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ राजकारणी आहेतच, मात्र ते सर्वात…

पनवेल महापालिकेच्या पहिल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण

पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पालिका नवीन पनवेल येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत असून या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून जून अखेरीस हे बांधकाम पूर्ण होणार आहे. नुकतेच पालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करुन कामाचा आढावा घेतला. पनवेल महापालिकेच्या सदस्यांनी सभागृहात ठराव करुन सिडको महामंडळाकडून क्रिकेट प्रशिक्षणासाठी नवीन पनवेल येथील आदई सर्कलशेजारचा २८ हजार चौरस मीटरचा भव्य भूखंड मिळविला. या भव्य भूखंडावर क्रीडांगणाचे आरक्षण असल्याने पालिकेने येथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी भव्य मैदान बांधले आहे. तब्बल १२ कोटी रुपये पालिका या प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी खर्च करत आहे. पुढील नऊ वर्षे देशाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला हे प्रशिक्षण केंद्र पालिका देखभाल व प्रशिक्षणासाठी देण्याचे पालिका सदस्यांनी ठरविले आहे. वेंगसरकर यांची प्रशिक्षण संस्था वर्षात शंभर प्रशिणार्थींना या मैदानात क्रिकेटचे धडे देणार आहे. शंभर प्रशिक्षणार्थी निवडताना पनवेल पालिका क्षेत्रातील ५० तसेच रायगड जिल्ह्यातील २५ व राज्यातील २५ या निकषावर प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे. जुलै महिन्यात दिलीप वेंगसरकर प्रशिक्षण संस्थेकडे हे मैदान हस्तांतरण झाल्यानंतर यंदाच्या दिवाळीपासून या मैदानातून क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. वेंगसरकर यांची संस्था या मैदानाच्या देखभालीचा खर्च विविध कंपन्यांच्या कोर्पोरेट सोशीअल रिस्पॉन्सिब्लिटी (सीएसआर) निधीतून करणार आहे. तसेच या मैदानामध्ये विविध क्रिकेट सामन्यांच्या मालिका आयोजित करुन त्यामधून मिळणाऱ्या नफ्यातून या प्रशिक्षण केंद्राची देखभाल वेंगसरकर यांच्या संस्थेला करावी लागणार आहे.

सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार – प्रशांत रोडे

ठाणे : मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तत्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बुधवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त (जाहिरात विभाग) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान-मोठे असे २९४ स्ट्रक्चर (सांगाडे) आहेत. या सर्व स्ट्रक्चरचे नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. मात्र, आता त्यांच्या मालकांनी-कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने, आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करायचे आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थैर्यता प्रमाणपत्र) सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, ज्या होर्डिंगचे आकारमान मंजूर मोजमापापेक्षा जास्त आहे. त्यात आठ दिवसात सुधारणा न झाल्यास वाढीव काम महापालिका काढून टाकणार आहे. त्याबद्दल संबंधित कंपनीकडून दंड आकारला जाणार असल्याचेही या बैठकीत रोडे यांनी सांगितले. तसेच, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या उंचीपेक्षा जास्त उंचीवर फलक लावण्यात आले असल्यास ती उंचीही कमी करण्यात येणार आहे. उंची वाढवण्यात आलेल्या, धोकादायक होर्डिंगचे सर्वेक्षण जाहिरात विभागातर्फे करण्यात येणार आहे. त्याचवेळी, महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग असल्यास त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रात, मध्य रेल्वेच्या हद्दीत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित काही होर्डिंग आहेत. त्यांचेही आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेटची प्रत (स्थैर्यता प्रमाणपत्र) महापालिकेस सादर करण्यासंदर्भात दोन्ही यंत्रणांना कळविण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

दीड लाख पुस्तकांचे मोफत वाटप!

जि.प. प्रशासक छायादेवी शिसोदे व शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात होणार वाटप अनिल ठाणेकर ठाणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे व शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा अभियानातंर्गत ठाणे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ५६ हजार ९३९ विद्यार्थ्यांना १ लाख ६८ हजार ९५४ मोफत एकात्मिक पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. येत्या शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात होत असून, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना  पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. समग्र  शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील  १ लाख ५६ हजार ९३९ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे. मागणी केलेली पुस्तके बालभारती पनवेल गोडाऊन मधून तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकार्यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे व शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठ्यपुस्तकांचे नियोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यात पहिले ते पाचवीपर्यंत ९५ हजार ८२९ विद्यार्थ्यांसाठी १ लाख ९७१ पुस्तके तर सहावी ते आठवीपर्यंतच्या ६१ हजार २१० विद्यार्थ्यांसाठी ६७ हजार ९८३ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने माहिती दिली आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद नगरपालिका खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते त्यानुसार  विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ मिळेल. ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद, नगरपालिका शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत त्यांनी बाजारातून पुस्तके खरेदी करू नये. पाठ्यपुस्तके सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. चौकट इयत्ता              विद्यार्थी                 पुस्तके १ली ते ५वी    ९५ हजार ८२९        १ लाख ९७१ ६वी ते ८वी   ६१ हजार २१०          ६७ हजार ९८३ १ली ते ८वी १ लाख ५६ हजार९३९  १ लाख ६८ हजार९५४

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

काजल – घुफ्रानला अग्र  मानांकन मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ मे  रोजी लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात इंडियन ऑईलचा महम्मद घुफ्रानला तर महिला एकेरीत इंडियन ऑईलच्याच काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन शनिवार १८ मे ला सकाळी ९ वाजता होणार असून पुरुष एकेरी व महिला एकेरी या दोनही गटांच्या सामन्यांनी स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिल्या ८ विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे पुरुष एकेरी : १) महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ), २) संदीप देवरुखकर ( ओ. एन. जी. सी. ), ३) फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ), ४) ओमकार टिळक ( ए. के. एफ.), ५) ओमकार नेटके ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ), ६) अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ना. म. जोशी मार्ग ) ७) प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ), ८) विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ), महिला एकेरी : १) काजल कुमारी ( इंडियन ऑइल ), २) अंबिका हरिथ ( रिझर्व बँक ), ३) उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक ), ४) रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस ), ५) निलम घोडके ( पोस्ट ऑफिस ), ६) वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी. ), ७) सेजल लोखंडे ( डी. के. सी. सी. ), ८) रुची माचिवाले ( ए. के. एफ. )

ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र

केंद्रावर रुग्णांना मोफत मार्गदर्शन ठाणे : कर्करोग संदर्भातील माहिती कर्क रुग्णांना एका ठिकाणी उपलब्ध व्हावी त्यासह, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाच्या मनात विश्वास, उमेद निर्माण होण्यासाठी ठाणे जिल्ह्यात प्रथमच कर्करोग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. ठाण्यातील तीनहात नाका येथे हे केंद्र सुरु असून शहरातील आधाररेखा प्रतिष्ठानच्या माध्यमातून याठिकाणी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. ठाणे शहरातील आधाररेखा प्रतिष्ठान गेले ११ वर्षे कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन, तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यरत आहे. ठाण्यात राहणाऱ्या रश्मी जोशी याचे पती अरविंद जोशी हे कर्करोगग्रस्त होते. त्यामुळे कर्करुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या अडचणी, वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. हा त्रास इतर रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना होऊ नये यासाठी या पती-पत्नीने मे २०१३ मध्ये ‘आधाररेखा प्रतिष्ठान’ची स्थापना केली. कर्करुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी विविध योजना आखून विनामूल्य सहकार्य करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार, संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला आरोग्याविषयीची माहिती देण्यासाठी मोफत आरोग्यजत्रा उपक्रम, वैद्यकीय, आहारशास्त्र, मानसशास्त्र आणि योगाभ्यास या विषयावर तज्ज्ञ वक्त्यांची ‘आधार माला’ या नावाने संवाद मालिका राबविण्यात आली. हे समाजकार्य करत असताना २०१७ मध्ये अरविंद जोशी याचे निधन झाले, परंतु, अरविंद यांच्या पत्नी रश्मी यांनी हे समाजकार्य पुढे कायमस्वरुपी सुरु ठेवले. रश्मी यांच्यासोबत २० ते २५ स्वयंसेवक या कार्यात जोडले आहेत. त्यांच्या या कार्याला रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. ठाणे शहरासह मुंबई उपनगरातूनही त्यांना मार्गदर्शनासाठी संपर्क साधला जात. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समोरा समोर बसून समुपदेशन आणि मार्गदर्शन करता यावे, विविध उपक्रम राबविता यावेत यासाठी कर्करोग माहिती केंद्र उभारण्यासाठी हक्काची जागा मिळावी याकरता त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेर इनरव्हील चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना २६ जानेवारी रोजी तीन हात नाका येथे जागा उपलब्ध झाली. याठिकाणी जिल्ह्यातील पहिले कर्करोग माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र मंगळवार आणि गुरुवार सुरु असते. याठिकाणी कर्करोगाच्या विविध चाचण्याबाबत रुग्णांना मार्गदर्शन केले जाते. तसेच कर्करोग असल्याचे समजल्यास रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाना नैराश्य येते, त्यांना या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाचे दालनही या केंद्रात आहे, अशी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली. कर्करुग्णांना उपचारासाठी परळ येथील टाटा रुग्णालयात वारंवार जावे लागते. यासाठी त्यांना प्रवासखर्च जास्त होत. रुग्णांचा हा खर्च वाचविण्यासाठी या संस्थेमार्फत ‘आधारवाहिनी’ उपक्रम सुरु आहे. ‘आधारवाहिनी’ ही विनामूल्य टॅक्सी सेवा असून ठाणे ते परळ येथील टाटा रुग्णालय अशी सेवा रुग्णांना दिली जाते. या टॅक्सी सेवेचा दर महिन्याला ३५ ते ४० रुग्ण लाभ घेतात. जानेवारी २०२१ पासून ही सेवा सुरु झाली आहे. या टॅक्सी सेवेच्या आतापर्यंत १२०० हून अधिक फेऱ्या झाल्या आहेत.

दोनशेहून अधिक बेकायदा फलक

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २०० हून अधिक बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या नाहीत. बहुतांशी बेकायदा फलक माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने लावण्यात येत आहेत. या बेकायदा फलकांवर स्वताचा ताबा ठेऊन काही राजकीय मंडळी या माध्यमातून पालिकेला अंधारात ठेऊन व्यवसाय करत असल्याची माहिती काही नोंदणीकृत जाहिरात कंपन्यांच्या मालक, अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. घाटकोपर येथे फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पापांचे जीव गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आता जागे झाले आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कल्याण पूर्व, शिळफाटा रस्ता आणि काटई भागात सर्वाधिक बेकायदा फलक लावले जात आहेत. हे सर्व फलक काही माजी नगरसेवक, राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने लावले जातात. अशाप्रकारे फलकासाठी जागा अडवून तेथे मोबदला घेऊन इतरांना जाहिराती लावण्यास मुभा द्यायची असे प्रकार कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नोंदणीकृत जाहिरातदार कंपन्यांच्या मालक, अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवलीत राजकीय वजनदार मंडळी ज्या भागात अधिक आहेत. तेथे बेकायदा फलकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या फलकांवर वर्षभर याच मंडळींचे, त्यांचे समर्थक यांचे वाढदिवस, इतर उपक्रमांचे कार्यक्रम, प्रतिमा सतत झळकवल्या जातात, असे सुत्राने सांगितले. पालिका अधिकाऱ्यांनी अशा बेकायदा फलकांवर कारवाई केली तर त्यांना राजकीय मंडळी दबाव आणून ती कारवाई थांबविण्यास भाग पाडतात. या माहितीला काही पालिका अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. पालिकेचे नुकसान काही जाहिरात कंपन्या कल्याण डोंबिवली पालिकेकडून रस्त्यांवर फलक लावण्यासाठी दर भरणा करून जागा निश्चित करतात. फलकाच्या एका बाजुला लावण्यात येणाऱ्या फलकाचा दर कंपन्यांनी पालिकेकडे भरणा केलेला असतो, पण काही जाहिरातदार फलकाच्या दुसऱ्या बाजुला पालिकेला अंधारात ठेऊन जाहिराती लावून स्वताचा आर्थिक फायदा करतात आणि पालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. फलक तपासणी आदेश घाटकोपर मधील फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने पालिका हद्दीतील धोकादायक, अतिधोकादायक फलकांची पाहणी करून अशा धोकादायक फलकांवर मालमत्ता विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त धर्येशील जाधव यांनी दिली. मालमत्ता विभागाकडून १८२ जाहिरात फलकांना परवानगी देण्यात आली आहे. अशा फलकांमुळे पावसाळ्यात कोणताही धोका नको म्हणून अशा सर्व फलकांची जाहिरातदार कंपन्यांच्या मालकांनी संरचनात्मक तपासणी करून तो अहवाल मालमत्ता विभागाकडे दाखल करावा. परवानगी व्यतिरिक्त असलेल्या फलकांवर कारवाई करण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.