Author: bittambatami.com

मावळ मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान – दीपक सिंगला

अशोक गायकवाड पुणे :वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग घेतला. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून अंदाजे सरासरी ५२.३० टक्के मतदान झाले आहे, अशी प्राथमिक माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. आपल्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना युवा युवतींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रांवर दिलेल्या विविध सोयीसुविधांबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले. मावळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड पिंपरी असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३८ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदानाचे प्रमाण उरण विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून आले. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाच्या प्रमाणात साधारणपणे तिपटीने वाढ होऊन ते १४. ८७ टक्के इतके झाले. दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण २७.१४ टक्के इतके झाले. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३६.५४ टक्के मतदान पार पडले. ५ वाजेपर्यंत सरासरी ४६.०३ टक्के मतदान पुर्ण झाले. सायंकाळच्या सत्रात मतदार अधिक संख्येने मतदान केंद्राकडे मतदानासाठी येत होते. सकाळी मतदानापुर्वी झालेल्या मॉक पोलवेळी २५ बॅलेट युनिट ६ कंट्रोल यूनिट आणि १४ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. यामध्ये पनवेल (१ बीयु, ३ व्हीव्हीपॅट), कर्जत (३ बीयु, २ व्हीव्हीपॅट), उरण (६ बीयु, २ व्हीव्हीपॅट), मावळ (३ बीयु, १ सीयु, ४ व्हीव्हीपॅट), चिंचवड (९ बीयु, ३ सीयु, २ व्हीव्हीपॅट), पिंपरी (३ बीयु, २ सीयु, १ व्हीव्हीपॅट) मतदान यंत्रांचा समावेश होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघात १२ बीयु, ४ सीयु आणि ७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. तर पनवेलमध्ये ४ व्हीव्हीपॅट, कर्जतमध्ये ६ व्हीव्हीपॅट, उरणमध्ये २ व्हीव्हीपॅट, मावळ ६ व्हीव्हीपॅट आणि पिंपरी २ व्हीव्हीपॅट यंत्र बदलण्यात आले. मावळ लोकसभेतील मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली होती. आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेवून होते. याद्वारे मतदान केंद्राशी समन्वय साधून नियंत्रण करण्यात येत होते. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला होता. यामध्ये अनुक्रमे राहुल मुंडके, अजित नैराळे, जनार्दन कासार, सुरेंद्र नवले, विठ्ठल जोशी आणि अर्चना यादव यांच्याद्वारे मतदान केंद्रावर लक्ष ठेवले जात होते. तसेच समन्वयासाठी समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे हे देखील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित राहून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधत होते. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी देखील मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी करून माहिती घेतली. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर तसेच निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी भर उन्हात देखील मोठ्या संख्येने मतदार मतदान करण्यासाठी येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रे विशेष स्वरूपात सजविण्यात आली होती. त्यामध्ये महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व महिला अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी नियुक्त महिला पोलीस अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. युवा संचलित मतदान केंद्रावर युवा वयोगटातील सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या केंद्रांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये गडकिल्ल्यांच्या संकल्पनेवर आधारित मतदान केंद्रेही साकारण्यात आली होती. तर कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये पर्यटन स्थळाच्या संकल्पना साकारण्यात आली होती. तसेच आदर्श मतदान केंद्रावर मतदानाच्या अनुषंगाने सर्व सेवासुविधा आणि आवश्यक त्या अतिरिक्त सुविधांसह संस्कृती दर्शवणारी रचना करण्यात आली होती. अशी सर्व मिळून १४ महिला संचलित मतदान केंद्रे, १४ युवा संचलित मतदान केंद्र आणि ६ संस्कृती जोपासणारे व ३४ आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पी. के. इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एन सी आर डी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज शाहूनगर येथे असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर संकल्पित हरीत मतदान केंद्र साकारण्यात आली होती. या हरित मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावताना विविध जातीच्या वनस्पती तसेच वृक्षांच्या प्रजातींबद्दल माहिती जाणून घेतली. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस सह वैद्यकीय सुविधा, आशा सेविका, प्रतीक्षा कक्ष तसेच पाळणाघर, हिरकणी कक्ष, व्हिलचेअर, व्हिलचेअर मदतनीस, उन्हापासून संरक्षणासाठी शेड व मंडप, वाहनतळ इ. सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याने ज्येष्ठ मतदारांसह दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाकडून पुष्प देऊन स्वागत केल्याचा क्षण मतदारांसाठी उत्साह वाढविणारा ठरला. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान जनजागृतीबाबत सुविचार, घोषवाक्ये, आकर्षक छायाचित्रे अशी सजावट करून मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले होते. याठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढली. यामध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. मतदान केंद्रावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यासह सुरक्षितपणे नेमून दिलेल्या स्थळी घेऊन येण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली. मतदान यंत्रे निश्चित केलेल्या ठिकाणी संकलित करून बालेवाडी येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्ष (स्ट्रॉन्ग रूम) येथे सुरक्षित जमा केले जाणार आहेत.

ठाण्यातील होर्डिंग्ची होणार झाडाझडती

ठाणे : घाटकोपर येथे जाहिरात होर्डिग्ज कोसळून १४ जणांचा बळी गेल्यानंतर ठाणे शहरातील मोठमोठ्या होर्डिंग्जमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका सतर्क झाली असून शहरातील सर्वच होर्डिंग्जची झाडाझडती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व होर्डिंग्जमालकांना बुधवारी (ता. १५) होणाऱ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर योग्य ती कार्यवाही होणार आहे. ठाणे शहरात प्रवेश केल्यापासून ते अगदी गायमुखपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत सर्वत्र महाकाय होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेतात. पालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे अशी ५२८ होर्डिंग्जचे मनोरे आहेत; मात्र प्रत्येक पावसाळ्यात या होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर येतो. ठाण्यात यापूर्वीही जाहिरात होर्डिंग स्टँड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. २०२१ च्या सप्टेंबरमध्ये मासुंदा तलावसमोरील शिवाजी मैदानाबाहेरचे होर्डींग केसळले होते. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गेल्यावर्षी ६ मार्चला झालेल्या अवकाळी पावसात कापूरबावडी परिसरातील होर्डिंग कोसळून सहा वाहनांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील या होर्डिंगसचे कालबद्ध पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना गेल्या वर्षी तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या होत्या. तसेच दुर्घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व होर्डिंग मालकांनी हे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केल्याची माहिती पालिकेने दिली; पण तरीही घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर ‘भय इथले संपत नाही’ अशीच परिस्थिती आहे. वास्तविक पालिकेच्या तिजोरीत भर पडावी, यासाठी होर्डिंगच्या मनोऱ्यांना परवानगी देण्यात आली; पण हे होर्डिंग पावसाळ्यात जीवघेणे ठरण्याची भीती बळावली आहे. घोडबंदर पट्ट्यात सर्वाधिक धोका रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भल्या मोठ्या होर्डिंगची सर्वाधिक संख्या घोडबंदर भागात असल्याचे आढळते. ढोकाळी, मानपाडा, कापूरबावडी, गायमुख येथून जाणाऱ्या महामार्गाला लागून असे शेकडो होर्डिंग आहेत. लवकरच ठोस भूमिका घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पालिकेने सर्व होर्डिंग मालकांची बैठक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टसह सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. धोका किंवा दुर्घटना टाळण्यासाठी कोणते नवीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत. यासंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न केले पूर्ण

बच्चू कडू यांची माहिती उल्हासनगर : दिव्यांग कल्याण मंत्रालय मंत्रीपदाच्या दर्जाचा पदभार हाताळताना केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी उल्हासनगरातील मेळाव्यात दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांगांच्या स्वप्नाची पूर्तता केल्याने त्यांचे आपल्यावर ऋण आहेत. त्यामुळे आपण शिवसेनेत सोबत असून कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे. उल्हासनगर-4 येथील स्वामी शांती प्रकाश हॉल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार 13 मे रोजी रात्री पार पडला.यावेळी बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय उभारण्यात यावे आणि ते स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात उतरवले.माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल असले तरी ते सर्वसामान्यसाठी लढलो म्हणून असून गुंडागर्दी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात ठाणे जिल्हात अनेक वेळा उपोषण तसेच आंदोलन करण्यात आले आहेत. त्यात काही प्रमाणात यश आले असले तरी काही अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्यामुळे त्यांचावर कारवाई होत नाही. असा आरोप करतानाच निवडणूक संपल्यावर मी स्वतः उपोषणाला येऊन बसतो. मग बघू सरकार या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कशी कारवाई करत नाही. असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, संपर्क प्रमुख हितेश जाधव, शहरप्रमुख प्रधान पाटील, पदाधिकारी बाळकृष्ण पाटील, श्याम भोईर, दिपक लढे, अविनाश सोनवणे, आलम खान, वसंत पानसरे, विजय मढवी, रक्षक म्हात्रे उपस्थित होते.

शहर स्थितीचा व पावसाळापूर्व कामांचा बारकाईने घेतला आढावा

आकस्मिक वादळ व अकाली पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई : काल सायंकाळी आलेल्या आकस्मिक वादळामुळे व पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्भवलेली आपत्तीजनक परिस्थिती तसेच मुंबईतील घाटकोपर येथे घडलेली मोठे होर्डिंग्ज कोसळल्याची दुर्घटना याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज तातडीने दूरदृश्य प्रणालीव्दारे अधिकारीवर्गाची बैठक घेत शहरातील परिस्थिती जाणून घेतली तसेच कालचा प्रसंग लक्षात घेऊन आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे 24×7 सतर्क राहण्याचे निर्देश दिले. काल सायं. 4.05 पासून 5.35 पर्यंत ताशी 107 कि.मी. वेगाने वादळी वाऱ्यांसह अकाली पर्जन्यवृष्टी सुरु झाली. आयुक्तांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेची सर्व यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर मदत कार्यासाठी तात्काळ कार्यान्वित झाली आणि 8 वाजेपर्यंत वादळामुळे पडलेली झाडे व फांदया, दोन ठिकाणी वाकलेले विजेचे खांब, काही ठिकाणी उडालेले पत्रे यावर कार्यवाही करत रहदारीचे अडथळे दूर करुन जनजीवन सुरळीत करण्यात आले. महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावर तत्पर कार्यवाही झाल्याने आणि नागरिकांना बचाव व मदतीचा तात्काळ संदेश निर्गमित झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तथापि या आकस्मिकपणे उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीचा विचार करुन पूर्व खबरदारी घेत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड, शहर अभियंता श्री.संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधत विभागनिहाय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला आणि मौल्यवान सूचना केल्या. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याची घडलेली दुर्घटना लक्षात घेत नमुंमपा क्षेत्रातील अंतर्गत भागात तसेच महामार्ग, रेल्वे हद्द, एमआयडीसी भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग स्वरुपातील जाहिरात फलकांचे रचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्याच्या यापूर्वीच दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करुन घ्यावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या एकूण होर्डिेगची संख्या, त्यांचे आकारमान, त्यामधील परवानगी दिलेल्या होर्डिंगची संख्या याची माहिती त्वरीत संकलित करुन सादर करावी तसेच अधिकृत होर्डिंगवर ते अधिकृत असल्याचे चिन्ह प्रदर्शित करण्याची कार्यवाही करणे त्याचप्रमाणे अवैध/ अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वादळी वारे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीसमयी नागरिकांनी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला थांबू नये असे आवाहन व्यापक स्वरुपात प्रसारित करण्यात यावे असे आयुक्तांनी सूचित केले. होर्डिंगप्रमाणेच ठिकठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवर्सच्या सुरक्षिततेबाबतही सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे  आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. या वादळी कालावधीत अनेक ठिकाणी गच्चीवरील, घरांवरील पत्रे उडाले असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत काळजी घेण्याच्या सूचना सोसायटयांना व वसाहतींना देण्यात याव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले. नमुंमपा क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई सुरु असून त्या कामाला गती देण्याचे निर्देश देत आयुक्तांनी नाल्यातून काढला जाणारा गाळ काहीसा सुकल्यानंतर त्वरीत उचलून नेण्याचे सूचित केले. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संयुक्त पाहणी करुन नालेसफाई पूर्ण करुन घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. कालच्या अकाली पावसात मुकंद कंपनीजवळील रेल्वे ब्रीजखाली पाणी साठण्याची कारणमीमांसा जाणून घेत आयुक्तांनी त्याठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या पाईपचा व्यास मोठा ठेवणेबाबत रेल्वेशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचे सूचित केले. यामध्ये तेथील रिटेनिंग वॉलबाबतही तत्पर कार्यवाही करण्याचे रेल्वेस सूचित करण्याबाबत निर्देशित करण्यात आले. सी-1 श्रेणीच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पूर्वखबरदारी घेण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे पावसाळी कालावधीत साथरोग, मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे करण्याचे व आवश्यक औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्याचे तसेच याबाबत  खाजगी डॉक्टर्सनाही सतर्क करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पावसाळी कालावधीत पाणीपुरवठा शुध्द व पुरेशा प्रमाणात राहील याची दक्षता घेण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी उदयान विभागाने वाहतूकीला व रहदारीला अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांदया छाटण्याचे काम तत्परतेने पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले. शहरात डेब्रिज आणून टाकले जाते अशा ठिकाणी विभाग अधिकारी यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देत आयुक्तांनी याबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले. पावसाळापूर्व कामांना यापूर्वीच 15 मे ही डेडलाईन दिली असून येत्या एक ते दोन दिवसात सर्व कामे पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देत एमआयडीसी भागातील स्वच्छता आणि पुनर्पृष्ठीकरण कामांकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. कालच्या आपत्ती प्रसंगात नागरिकांना दिलासा देणारी तत्पर सेवा सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पुरविली याची नोंद घेत आयुक्तांनी अशाच प्रकारे यापुढील काळातही सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले.

ठाण्यातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डींग्जवर निवडणूक काळातही कारवाई करा – संजय केळकर

अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. घाटकोपर येथे अवाढव्य होर्डींग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच  धोकादायक होर्डींगचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महापालिकेने देखील याबाबत मागे राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करावी, अशी मागणी आ. संजय केळकर यांनी केली. चौकट एखाद्या होर्डींगमुळे मेट्रोचे काम रखडले असेल  आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करेन.अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली, पण संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आ. संजय केळकर यांनी केली.

छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न अजित नैराळे, डॉ. शीतल रसाळ, आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न अशोक गायकवाड कर्जत : देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार,( दि. १३ मे )रोजी पार पडले. यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३.३० मिनिटांच्या दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी बाहेर पडणारा मतदार पाऊसामुळे अडकून पडला. दरम्यान, पावसाच्या विघ्नामुळे मतदानाच्या टक्क्यांवर देखील परिणाम झाला आहे.ही निवडणूक प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली. मावळ मतदारसंघात गेले काही दिवस प्रचाराच्या तोफा धडधडत होत्या. अशात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असल्याने लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर सोमवार,(दि. १३ मे) रोजी निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तर शहरी भागात साधारण ११ नंतर तुरळक मतदार दिसत होते. ११ नंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील किरवली, हलिवली,कर्जत दहीवली, कशेळे, धामोते, नेरळ दहीवली, कोठिंबे आदी भागात दुपारी देखील मतदार गर्दी करून होते. तर धामोते, कर्जत दहीवली येथील मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. तसेच नेरळ येथील ८१ क्रमांक आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते. दरम्यान, १८९ कर्जत मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.१५ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.२७ %, दुपारी १ वाजेपर्यंत २९.४७ %, दुपारी ३ वाजेपर्यंत ३८.०३% तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान पार पडले. अशात दुपारी ३.३० वाजता अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला. साहजिकच याचा फटका हा उमेदवारांना बसणार आहे. मावळ मतदारसंघात एकूण ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवार, दि.१३ मे) रोजी मतपेटीत बंद झाले आहे. येत्या ४ जून रोजी निकाल असणार आहे. तेव्हा या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांना पथक निहाय एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३४९ कंट्रोल युनिट आणि ३४९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप केले होते. ही प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत तहसीलदार डॉ. शीतल रसाळ, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी  विधानसभा मतदार संघातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम अशा सहकार्याने पार पडली.

24-कल्याण लोकसभा मतदारसंघात 39 सूक्ष्म निरीक्षक दाखल

ठाणे : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 39 सूक्ष्म निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून ते केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी काम करणार आहेत. मतदारसंघात दाखल झालेल्या या सूक्ष्म निरीक्षकांना आज त्यांच्या कर्तव्याबाबत, मतदान यंत्र हाताळणीबाबत, तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन, निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, पदनिर्देशित अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते उपस्थित होत्या. सूक्ष्म निरीक्षक दि. 20 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा अहवाल निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. मनोज जैन यांना सादर करतील.

ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे  रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात युवावर्ग,स्त्री -पुरुष ,दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता. ठाणे शहरात २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आणि लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन स्वीप पथकाने केले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होवू नये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे त्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही शंका, स्पष्टीकरण आणि तक्रारींसाठी नागरिक 1950 वर कॉल करून आपल्या शंकाचे निरसन करु शकतात असेही यावेळी सांगण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन करीत उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे  महाराजांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राजभवनातील अधिकारी व  कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.