Author: bittambatami.com

‘संवेदना’ उद्यानाबाबत महापालिका ‘असंवेदनशील’

नवी मुंबई : कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या सानपाडा सेक्टर १० येथील ‘संवेदना’ उद्यानाची दुरवस्था झाल्यामुळे दिव्यांगांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी निवेदन दिले. उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सानपाडा सेक्टर १० येथे ‘संवेदना’ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर संवेदना उद्यान विकसित करण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. उद्यानांमध्ये दिव्यांग मुलांसाठी खेळणी, व्हीलचेअरचा झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, लेस बांधण्यासाठी बूट, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, दगड, लाकूड, लादी, गोटे बसविलेला मार्ग, सापशिडीचा खेळ, स्पिकिंग ट्यूब, बेल ट्री, फुली गोळ्याचा खेळ, सेल्फी फ्रेम, बुद्धिबळ चौकटी, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक इत्यादी सुविधांचा समावेश असून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा व लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली असून विशेष सुविधेसह दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत. सौंदर्याला बाधा उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. उद्यानातील लोखंडी फलक, लहान मुलांची तुटलेली खेळणी उद्यानात पडलेली दिसत आहेत. तसेच कारंजे बंद पडले असून पाण्याचे हौद पाण्याअभावी ओस पडले असून झाडेही सुकून गेली आहेत. विद्युत दिवेसुद्धा तुटले असून त्यांचा खच एका कोपऱ्यात पडलेला आहे. स्वच्छतागृहातील नळ खराब झाले असून शौचास बसण्यासाठी असलेले भांडेसुद्धा तुटून पडले आहे. पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे उद्यानाचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उद्यानात सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सानपाडा येथील संवेदना उद्यानातील दुरुस्ती करण्याबाबत शहर अभियंता यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जी काही कामे आहेत ती अभियांत्रिकी विभागाकडून केली जातील. – दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग

महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे, खासदार अरविंद सावंत, काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, अश्फाक सिद्दीकी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

शिंदेसेनेसह काँग्रेसची मागणी

नागरिकांवर लादलेला पाणी पुरवठा लाभकर रद्द करण्याची मीरारोड – अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नागरिकांवर केली नाही सांगायचे आणि नंतर मागून नवीन कर आकारणी करून थेट बिलात पाठवून नागरिकांना झटका द्यायचा असा प्रकार मीरा भाईंदर महापालिकेने चालवला असून पालिकेच्या पाणीपुरवठा लाभ करास आता शिंदेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक , आमदार गीता जैन , काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश नागणे आदींनी विरोध करत कर रद्द करण्याची मागणी केली आहे . लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असून कोणालाही  विश्वासात न घेता असा कर लागू करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.  अचानक कर लागू केल्याने नागरिकां मध्ये संताप व्यक्त होत आहे . महापालिकेच्या या मनमानी निर्णयाला आमचा विरोध असून प्रशासनाने तात्काळ कर रद्द करावा अन्यथा पालिके विरुद्ध संघर्ष करू असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी लेखी पत्रा द्वारे दिला आहे . पाणीपुरवठा लाभकर  त्वरित रद्द करुन नव्याने मालमत्ता देयके नागरिकांना वितरित करण्याची मागणी काँग्रेस चे जिल्हा प्रवक्ते व प्रदेश प्रतिनिधी प्रकाश नागणे यांनी महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांच्या कडे केली आहे. गेल्या वर्षात पालिकेने अश्याच प्रकारे जनतेवर १० टक्के इतका रस्ता कर लादला होता .  शहरवासीयांना मूलभूत सेवासुविधा मिळत नाहीत. उधळपट्टी , मनमानी दराने टेंडर देणे , अनावश्यक कामे करणे पासून अनेक घोटाळे करून पालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या प्रशासनाने नागरिकांच्या माथी मात्र सातत्याने करवाढीचा वरवंटा चालवला आहे . महापालिका प्रशासनसह राज्यातील भाजपा – शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सरकार आणि त्यांचे स्थानिक नेते ह्याला जबाबदार असून त्याचा काँग्रेस निषेध करत असल्याचे नागणे यांनी म्हटले आहे. आमदार गीता जैन यांनी देखील प्रशासनाने आर्थिक अपव्यय टाळून काटकसर करावी . केवळ नागरिकांवर नवीन कर लादणे व करवाढ करणे हे चालणार नाही . अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ केली नाही सांगून गोडगोड प्रसिद्धी खायची  आणि नंतर गुपचूप मागच्या दाराने नागरिकांवर करवाढ लादून त्यांचा विश्वासघात करायचा हे योग्य नाही . गेल्या वर्षी १० टक्के रस्ता कर लावण्यासह अन्य करत वाढ केली असता आता या वर्षी आणखी एक कर लावून लोकांवर आणखी कराचा बोजा टाकू नये असे आ. जैन म्हणाल्या.

निर्भिड, पारदर्शकपणे लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी दक्षतेने काम करावे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे ठाणे : ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण व 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी दि. 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. येत्या 26 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरूवात होणार असून भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निरीक्षक हे ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून सर्व पथकांना सतर्कपणे काम करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात आचारसंहिता पथक, दक्षता पथक, व्हिडीओ चित्रिकरण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक, भरारी पथक, स्थिर देखरेख पथक, तसेच आयकर विभाग, अबकारी कर विभाग, 24×7 कॉल सेंटर, माध्यम कक्ष यासह निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च सर्व पथकांनी यापुढील काळात अतिशय बारकाईन प्रत्येक प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. तसेच खर्च निरीक्षकांनीही उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर लक्ष ठेवावे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता संबंधित पथकाने घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी आचारसंहिता भंगाची तक्रार येईल, तेथे तातडीने गुन्हे दाखल करावे. . निवडणुकीच्या कालावधीत अवैध रक्कम पकडणे, तिचा पंचनामा करणे, दारू, अन्य अवैध पदार्थ ताब्यात घेऊन दंडात्मक तथा प्रसंगी फौजदारी कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात यावे, अशा सूचनाही श्री. शिनगारे यांनी दिल्या. सर्व मतदारसंघातील एक खिडकी कक्षातून राजकीय पक्ष व उमेदवारांना आवश्यक ते परवाने देताना दक्षता घ्यावी व परवानगी मागणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल व कोणत्याही प्रकारे त्याचा भंग होणार नाही, यासाठी पोलीस विभागाने बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे, निर्भिड वातावरणात पार पडले, यासाठी सर्वच यंत्रणांनी जबाबदारीने कामे करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी दिल्या.

कपिल पाटील यांच्या प्रचाराचा शहापूर तालुक्यात झंझावात

शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी बुधवारी दिवसभर शहापूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. कपिल पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. तर वासिंद येथील सुमारे ६०० कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शहरातील प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्र मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्ष (आठवले) आणि कुणबी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध प्रचार करीत नागरिकांबरोबर संवाद साधला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेल्या कार्याबरोबरच कपिल पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची माहिती दिली जात आहे. पुढील उज्जवल भविष्यासाठी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. शहापूर तालुक्याच्या दौऱ्याला वासिंद येथून सुरूवात करण्यात आली. गावागावांमध्ये कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. वासिंद, आसनगाव, चेरपोली, आटगाव, खर्डी, पळशीण, बिरवाडी आदी भागात स्थानिक राजकीय पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तींबरोबरच ग्रामस्थांशी संवाद साधला. तर शहापूर येथे बुद्धीजीवी वर्ग असलेल्या डॉक्टर, वकील, व्यापारी आणि सिंधी, तेली, बोहरा, नाभिक समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पळशीण येथे छोटी रॅली काढून सभा झाली. या दौऱ्यात या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरौडा, भाजपाचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अशोक इरनक, नंदकुमार मोगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर सासे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, मनसेचे तालुकाप्रमुख विजय भेरे आदींची उपस्थिती होती. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

ठाणे शहरातील बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बसस्थानकावर करण्यात आले. २५ ठाणे-लोकसभा मतदार संघ अंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बसस्थानकावर मतदान जनजागृती कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली सदर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या जनजागृती मोहिमेत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी २५ ठाणे लोकसभा मतदार संघाचे मतदान जनजागृतीबाबत लावण्यात आलेले मोठे फलक हे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वीपच्या पथकाने बसस्थानकावरील प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात ठाणे परिवहन बसस्थानक येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रवासी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदान जनजागृती’ विषयक माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या. तसेच मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला माहितीपट व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केलेले आवाहन तसेच मतदानासंदर्भात इतर जनजागृती कार्यक्रम चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे – ग.दि.कुलथे

राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे एक कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे. महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर, आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, डॉ.अविनाश भागवत, सुदाम टाव्हरे, दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष इंजि. मोहन पवार, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुनिल चव्हाण, जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री.पंडित राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. रामेश्वर पाचे, जि.प.चे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नेताजी मुळीक, शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्राची चिवटे, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत, माजी सहायक संचालक श्रीकांत बाभूळगावकर यांच्यासह आरोग्य विभाग तसेच अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित आहेत. महासंघाचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक कुलथे यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांचे कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितले. महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, सातवा वेतन आयोग, अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यासह विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. महासंघाने कल्याण केंद्र बांधण्याचे स्वप्न पाहिले असून त्याचे काम बांद्रा येथील जागेत सुरू झाले आहे. या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने यात योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने आजपर्यंत केलेल्या लढ्यांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाप्रमाणेच वेतन आयोग, महागाई भत्ता, बालसंगोपन रजा, खंड दोन नुसार वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीविरुद्ध कायदा तयार करणे, नवीन निवृत्ती वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करणे अशा अनेक मागण्या यशस्वीपणे मान्य झाल्या आहेत. महासंघामुळे शासकीय अधिकाऱ्यांना लाभ होत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महासंघाची शक्ती आणखी वाढविण्यासाठी हातभार लावावा. यासाठी जिल्हास्तरावरील समन्वय समिती मजबूत होणे आवश्यक असल्याचे सांगितले. महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनीही महासंघाच्या वतीने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून अनेक सुविधा मिळाल्याचे सांगितले. यापुढील काळातही महासंघाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कल्याण केंद्राचा निधी जमा करण्यासाठी महासंघाच्या वतीने अँप विकसित करण्यात आला असून या अॅपद्वारे सदस्यांना निधी जमा करून त्याची पावती घेता येणार आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी या अॅपद्वारे ऑनलाईन निधी द्यावा, असे आवाहन श्री. भाटकर व श्री. सानप यांनी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना केले.ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुदाम परदेशी व कार्याध्यक्ष अविनाश सातपुते यांनी महासंघाचे काम आणखी वाढविण्यासाठी व संघटन चळवळ मजबूत करण्यासाठी तसेच महासंघाच्या कल्याण केंद्राच्या निधीसाठी जिल्हा समन्वय समिती भरीव योगदान देईल, असे आश्वासन दिले. ठाणे समन्वय समितीचे सरचिटणीस मनोज शिवाजी सानप यांनी प्रास्ताविकात जिल्हा समन्वय समितीच्या कामकाजाची व बैठक आयोजनामागील भूमिका मांडली. उपाध्यक्ष मोहन पवार यांनी सूत्रसंचालन केले.जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी ११ हजार रुपयांचा निधी श्री. कुलथे यांच्याकडे सुपूर्द केला तर श्री. सानप यांनी ऑनलाईन ११ हजार रुपये जमा करून आपले योगदान तात्काळ दिले. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. कुलथे यांनी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांना महासंघाच्या वतीने प्रकाशित केलेली वार्षिक डिरेक्टरी – २०२४ भेट दिली.

निष्काम भावनेतून मदत करणारा कर्मचारी हेमंत सपकाळ

ठाणे : जगात चांगली माणसे  वावरत आहेत म्हणून  हे जग चालत आहे.त्याचे जवलंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्हा सामान्य रुगणालयातील कर्मचारी हेमंत सपकाळ हे आहेत.रुग्णालयात येणाऱ्या गरजूंना निष्काम भावनेतून मदत करत असतात ही त्याची ओळख आहे. हे काम इथेच न थांबवता प्रवास येता – जाता गरजूंना मदत करत असतात. दि.24 एप्रिल 2024 रोजी श्रीम. सुलोचना गायकवाड वय 72 व 12 वर्षीय नातू सोबत अंबरनाथ वरून पुण्याला निघाले होते.दोघे अंबरनाथ वरून लोकन ने कर्जत स्टेशनला पोहोचले. पुण्याला जाण्यासाठी कोणार्क एक्सप्रेस गाडीची वाट बघत होते. ट्रेनमध्ये चढताना त्यांची चुकून कपड्याची बॅग प्लॅटफॉर्म न. 1 ला विसरली. ट्रेन लोणावळ्याला पोहचत असताना त्या आजीच्या लक्षात येते की, एक कपड्याची बॅग दिसत नाही. ती ट्रेन मध्ये इतरत्र शोधत होती. त्यावेळेस आजीच्या बाजूच्या सीट वर बसलेले हेमंत सपकाळ यांच्या लक्षात ही बाब आली असता, त्यांनी कर्जत रेल्वे पोलिस आर. पी. एफ. श्रीम. वर्षा गुंजाळ यांना भ्रमध्वनीद्वारे संपर्क केला. सर्व घटना त्यांनी वर्षा गुंजाळ  यांना सांगितली. त्यांनी जळद गंतीने  त्याचे सहकारी होमागार्ड  कर्मचारी यांच्या मदतीने प्लॅटफॉर्म न. 1 वरून ती बॅग शोधून काढली. बॅगचा फोटो पाठवला असता फोनवरुन ती बॅग त्याच आजींचीच आहे याची शहानिशा केली. त्यानंतर त्यांनी स्वतः ती बॅग  सायं. 5 वा कर्जत वरून  नांदेड पनवेल गाडीने घेऊन आल्या तोपर्यंत त्या आजींना श्री. सपकाळ यांच्या सांगण्यावरून लोणावळा स्टेशनला वाट पाहण्यास सांगितलेले होते. काही वेळा नंतर नांदेड पनवेल गाडी साय. 5.45 वा लोणावळा स्टेशन ला आली व आर. पी. एफ. श्रीम. वर्षा मुंजाळ मॅडम नी त्या आजींना फोन करून गाडीमध्ये ती बॅग परत केली. ती बॅग मिळताच त्या आजीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले व तीने दोघांचे पण मनापासून धन्यवाद मानले. श्री. हेमंत सकपाळ  व वर्षा गुंजाळ  यांनी केलेल्या मदतीचा सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास

आदिवासी क्रांती सेनेच्या लढ्याला यश ठाणे – भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील योद्धा, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या ठाणे कारागृहातील स्मारकाचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे. आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांच्या पाठपुराव्यामुळे हे स्मारक पूर्णत्वास आले असून येत्या दोन मे रोजी या स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे फाशीची शिक्षा ठोठावलेल्या आदिवासी समाजातील महान क्रांतीकारक आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली होती.  हे  स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतर करण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिवीर  राघोजी भांगरे यांना दि.2 मे 1848 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे ब्रिटिशांनी फाशी दिली होती. ह्या महान क्रांतिवीरांच्या स्मृती जागृत करण्यासाठी स्मारक उभारण्यात आले होते. परंतु अनेक वर्षांपासून ह्या स्मारकाची दुरवस्था झाल्याने ते अडगळीत पडले होते. या स्मारकाचे नुतनीकरण करण्यात यावे,  यासाठी महाराष्ट्र आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील भांगरे, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या स्मारकाचे नूतनीकरण करावे,  अशी मागणी केली होती. त्यानंतर  तत्कालीन गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी स्मारक परिसराची पाहणी करून तत्कालीन कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांना  हे स्मारक सुटसुटीत जागेत स्थलांतरीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे स्मारक सामान्य नागरिकांसाठी खुले ठेवून ठाणे कारागृहातील स्वांतत्र्य लढ्याचा इतिहास लिखीत स्वरूपात फलकावर लावण्यात याव्यात , अशी मागणी अनिल भांगले यांनी केली होती. अखेरीस आदिवासी क्रांती सेना, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान,व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अखेर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या नुतनीकरणास मंजुरी मिळाली. त्यानुसार या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले होते. आता हे काम पूर्णत्वास आले असून येत्या २ मे २०२४ रोजी राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना याच नूतनीकृत स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे, असे आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांनी सांगितले.

एकही गाव पाण्यावाचून वंचीत राहणार नाही – छायादेवी शिसोदे

ठाणे : सापगांव येथे वॉटर फिंडीग सेंटर मधून भरण्यात येणारे टँकर मधील पाण्याची शुध्दता त्यामध्ये असलेले टी. सी. एलचे प्रमाणाबाबत व पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करताना  पाणी टंचाई काळात पाण्यापासून एकही नागरीक वंचीत राहणार नाही अशा सक्त सुचना .जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शहापूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपचांयत सारमाळ व बोरशेती येथे भेट देऊन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेंतर्गत सुरु असलेल्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली. पंचायत समिती शहापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत पंचायत) प्रमोद काळे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर राजू भोसले तसेच आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थीत होते. ग्रामपंचायत गोठेघर येथे भेट देऊन ग्रामपंचायतीचे कामकाजाची पाहणी केली, त्यानंतर सापगांव नदीवर वॉटर फिडीग सेंटर येथे भेट देऊन कामकाजाविषयी आढावा घेतला. सापगांव येथे वॉटर फिंडीग सेंटर मधून भरण्यात येणारे टँकर मधील पाण्याची शुध्दता त्यामध्ये असलेले टी. सी. एलचे प्रमाणाबाबत व पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाणी टंचाई काळात पाण्यापासून एकही नागरीक वंचीत राहणार नाही, याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या. टॅंकर चालकाच्या कामाविषयी चर्चा करण्यात आली तसेच पाणी टंचाई बाबत विस्तृत आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा येथे भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच शेणवा येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत बेडीसगांव येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजनेंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची पाहणी केली.