नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईतील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्याच्या दृष्टीने स्वीप अर्थात मतदार जागरूकता कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. या अंतर्गत आज दिघा येथील नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 108 मध्ये विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगत त्यांच्यामार्फत आई-बाबा व कुटूंबिय आणि शेजारी यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्याचे सांगण्यात आले. तसेच नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 113, महापे येथेही मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या विषयावर रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमार्फत मतदानाचा संदेश प्रसारित केल्याने त्यांना मतदानाचे महत्व कळतेच शिवाय त्यांच्यामार्फत त्यांच्या आईवडिलांपर्यंत तसेच परिचितांपर्यंत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचा संदेश पोहचतो. नेरूळ विभागात सेक्टर 29 येथील दैनंदिन बाजारामध्ये मतदार जनजागृती पथकाने भेट देत तेथील व्यावसायिक आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याविषयी सांगितले, तसेच याठिकाणी मतदान करणेबाबत सामुहिक शपथही ग्रहण करण्यात आली. अशाच प्रकारे वाशी विभागात सेक्टर 15 ए येथील कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात मॉडर्न महाविद्यालय वाशी येथे वर्गावर्गांमध्ये जाऊन युवकांशी संवाद साधण्यात आला व त्यांना मतदानाचे महत्व विशद करण्यात आले. पहिल्यांदाच मतदान करणा-या तरूणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. त्यांच्यामार्फत त्यांच्या घरी तसेच परिसरातील व संपर्कातील नागरिकांनाही संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याविषयी आवाहन केले जावे असे सूचित करण्यात आले. वाशी हायवे बसथांब्यावरील प्रवाशांमध्येही मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. उद्यानांमध्ये जॉगींगसाठी येणा-या नागरिकांसह तेथील कर्मचा-यांसह मतदानाविषयी शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे नेरूळ, वाशी व तुर्भे विभाग कार्यालयांमधील कर्मचारी तसेच विभाग कार्यालयांना भेट देणारे नागरिक यांनी एकत्रितपणे मतदानाची शपथ ग्रहण केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नमुंमपा क्षेत्रातील 150 व 151 या दोन विधानसभा मतदारसंघाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा वाशीचे विभाग अधिकारी सागर मोरे व ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी तथा उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे – पाटील यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, नेरूळ विभाग अधिकारी जयंत जावडेकर, तुर्भे विभाग अधिकारी बोधन मवाडे, दिघा विभाग अधिकारी भरत धांडे, कोपरखैरणे विभाग अधिकारी सुनिल काठोळे यांनीही आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सहभाग घेतला. ००००