Category: होम

राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!

मुंबई : राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्व सुनावण्या येत्या सोमवारपासून ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता दिल्लीत न जाता तक्रारदार तसेच प्रतिवाद्यांना सुनावणीला हजर राहता येणार आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने गेल्या दीड वर्षांपासून केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाची दिल्लीतील उपभोगक्ता भवनात सात खंडपीठे आहेत. या सर्व खंडपीठापुढे दररोज सुनावण्या होतात. या सुनावणीसाठी तक्रारदार वा प्रतिवाद्यांना प्रत्यक्ष वा ऑनलाईन हजर राहता येणार आहे. करोना काळात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने ऑनलाईन सुनावणी सुरु केली होती. त्यावेळीही तक्रारदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरीही नंतर ऑनलाईन सुनावणी बंद करण्यात आली. ऑनलाईन सुनावणी पुन्हा सुरु करण्यात यावी, यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने आयोगाला पत्र लिहिले होते. याशिवाय आयोगाच्या अध्यक्षांकडे पाठपुरावाही केला होता. दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली तेव्हाही अशी मागणी पुन्हा नव्याने करण्यात आली. परंतु याबाबत निर्णय घेतला जात नव्हता. आयोगाच्या अध्यक्षपदी नव्याने आलेले अध्यक्ष अमरेश्वर प्रताप साही यांच्याकडेही ग्राहक पंचायतीने नव्याने पाठपुरावा सुरु केला. अखेर त्यांनी ही मागणी मान्य केली आहे. सुरुवातीला एका खंडपीठात अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यास यश मिळाल्यानंतर आता सर्व खंडपीठात ही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ई-न्यायालयांचा आग्रह धरला आहे. याबाबत न्यायालयाने नियमावलीही जारी केली होती. सर्वोच्च व उच्च न्यायालयात काही प्रमाणात तसा वापर सुरु झाला आहे. महारेरातीलही काही सुनावण्या ऑनलाईन घेतल्या जातात. आता राष्ट्रीय ग्राहक आयोगाने पुढाकार घेतला असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था सुरु करण्यात आलेली आहे, असे पत्रक आयोगाने जारी केले आहे.

वर्षभरात पावणेसतरा कोटीचा मालमत्ता कर जमा – पंकज पाटील

अशोक गायकवाड खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल पावणेसतरा कोटींची वसुली केली असून, हा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबद्धरित्या वसुलीची रूपरेषा आखली होती. याचप्रमाणे खोपोलीकरांनी आपला मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावावा, असे आवाहन खोपोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरलेल्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले. थकबाकीदारांच्या नावांची बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी यासारखी कारवाई करण्यात आल्याने वसुलीत विक्रमी वाढ झाली. पालिकेच्या तिजोरीत ३१ मार्चअखेर १६ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत. मालमत्ता कर विभागाचे गौतम भगळे, गजानन जाधव यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एकूण २० कर्मचारी वसुली मोहिमेकरिता नेमण्यात आले होते. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरू केली. अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या २४ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. मार्चनंतर देखील वसुलीची मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.

वरंध घाट ३० मे पर्यंत सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील मौजे वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दि.8 एप्रिल पासून ते ३० मे २०२४ पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसा महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू साखळी क्रमांक ८८/१०० (मौजे वरंघ) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही सदर कालावधीकरीता वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे. वरंध घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत तसेच सदरवेळी पर्यायी मार्ग वापराबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तरुण वर्ग संघटनेच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन

रमेश औताडे मुंबई :  भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निम्मिताने सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी सिद्धार्थ कॉलनी तरुण वर्ग संघटनेच्या वतीने दिनांक 14/4/2024 ते 30/4/2024 दरम्यान 16 दिवसांचे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापुरुषांच्या विचाराचे सामर्थ तरुणामध्ये येण्यासाठी तसेंच बुध्द आणी त्यांचा धम्म,शाहू, फुले ,यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या उन्हाळी शिबीरातून आत्ताच्या तरुणापर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील विद्यार्थी तरुण तरुणी यांच्यासाठी शैक्षणिक,क्रिडा,मनोरंजन,करिअर मार्गदर्शन,योगा,ध्यान,याबरोबर कोणत्याही प्रकाराचे शुल्क न आकारता क्रिकेट,फुटबॉल,कब्बड्डी,बुध्दिबळ् अश्या प्रकारे खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. या बरोबर महिला मुलीसाठी स्व सुरक्षेच्या दृष्टीने कराटे ,किक बॉक्सिंग,सहीत अनेक मैदांनी खेळाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती युवा पँथर प्रणित विनायक पगारे यांनी दिली.अधिक माहितीसाठी 98332 29995 या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले.

महिला सक्षमीकरण कार्यक्रमातून समाजात चांगला संदेश : जगदीश तेजवानी

राजेंद्र साळसकर उल्हासनगर : समाजाच्या कल्याणासाठी अनेक सामाजिक संस्था सक्रिय भूमिका निभावतात, ज्यामध्ये मां काली चॅरिटेबल ट्रस्टचे प्रयत्न नेहमीच स्मरणात राहतील कारण ही संस्था गावोगावी काम करते आणि शाळा चालवण्याबरोबरच विधवा महिलांना पेन्शन, ज्योतिबा फुले योजना, पॅन कार्ड,आधार कार्ड देखील देते. पण हीच लिंक पुढे नेत ती समाजसेवा करत आहे, महिलांना रोजगार, शिक्षण आणि मुख्य म्हणजे महिला सन्मान आणि विधवा पेन्शन आणि साडी वाटप, ट्रॉफी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व विद्यार्थ्यांना मेडल देऊन उद्घाटन केले. प्रत्येक शुभ सणाला ट्रस्टचे अध्यक्ष व शाळेने कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजूंच्या पाठीशी उभे राहावे, असा संस्थेतर्फे सातत्याने प्रयत्न केला जात आहे. शिवप्रताप सिंह सांगतात की त्यांनी २०१८ पासून संघटना स्थापन केली आहे, तेव्हापासून जगदीश तेजवानी आणि राजन चंद्रवंशी त्यांना वेळोवेळी साथ देत आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगर भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी, महेश पुरस्वानी होते. माँ काली चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह प्राचार्य  लतिका बिचकुंडवार, अशोक भंडारी, नितीन कडू, विवेक भदानी, दर्शन अहिरे, प्रमिला शर्मा, रितू यादव यांच्यासह शिक्षक, महिला, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन सुरूच

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता लागू असताना या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अनेक ठिकाणी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्ष कार्यालयांवरील पक्षाचे नाव, चिन्ह अद्यापही नियमानुसार झाकले नाही. भाजपने वर्तकनगर येथे कार्यालय स्थापन केले आहे. या कार्यालयावरील भाजपचे नाव ठळक अक्षरात दिसत आहे. टेंभीनाका भागातही असेच चित्र आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्यानुसार आता आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या आचारंसहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज संस्थामधील अधिकारी कार्यरत आहेत. या कालावधीत पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करावे लागते. त्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे लागू करण्यात आली आहेत. पक्ष कार्यालयावर नेते, पक्षाचे नाव, चिन्ह असल्यास ते झाकण्याच्या सूचना केल्या जातात. नियमानुसार काही नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची नावे झाकली आहेत. तर काही पदाधिकारी अद्यापही आचारसंहितेच्या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. वर्तकनगर येथील रेमंड परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गुढीपाडव्या निमित्ताने भाजपच्या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयावर भारतीय जनता पक्ष असे ठळक अक्षरांममध्ये लिहीण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या आकारातील छायाचित्र प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले आहे. उद्घटनाचा दुसरा दिवस उजाडल्यानंतरही दुपारपर्यंत या कार्यालयावरील नाव झाकण्यात आले नव्हते. अशाचप्रकारे चरई भागात शिंदे यांच्या शिवसेनेच्या टेंभीनाका-चरईच्या शाखाप्रमुखाचे कार्यालय आहे. या कार्यालयावरील फलक झाकण्यात आलेले नाही. या फलकावर शिवसेनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र आहे. उथळसर येथे शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेविकेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या दर्शनीभागाचे फलक झाकण्यात आले असले तरी एक दिशेकडून शिवसेना हे नाव स्पष्ट दिसत आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथे आनंद आश्रमावर देखील पक्षाचे नाव आहे. आनंद आश्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पत्रकार परिषद होत आहेत. असे असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांकडून या बाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या कार्यालयाबाबत येथील निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले असता, संबंधित बाब निदर्शनास आल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह झाकण्याचे कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उथळसर आणि नौपाड्यात सोमवारी पाणी पुरवठा बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात जल वाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवार, १५ एप्रिल स. ८.०० ते मंगळवार, १६ एप्रिल स. ८.०० वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. के व्हिला नाला पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे  स्थलांतर करून जोडकाम करण्यासाठी २४ तासांचा शट डाऊन पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या शटडाऊनमुळे, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. १ व २, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्र्ल जेल परिसर, पोलीस लाईन, तसेच, नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील एन. के. टी. महाविद्यालय परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूल या भागात सोमवार, १५ एप्रिल स. ८.०० ते मंगळवार, १६ एप्रिल स. ८.०० वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शट डाऊननंतर, पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त  प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जी.जी.गोदेपुरे, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर व महापालिकेच्या विविध विभागाचे कर्मचारी.

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचे अभिवादन !

ठाणे : स्री शिक्षण, समानता, सत्यासाठी देह झिजविणारे, सत्यशोधक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार, ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रविंद्र पालव. परिवहन सदस्य नितिन पाटील, ठाणे सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, जिल्हा कार्यकारिणी सचिव लखबीर गील, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समिर पेंढारे, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, महिला विधानसभा अध्यक्षा अरुणा पेंढारे, वंदना खानोलकर, उथळसर ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मी वैती आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करा – संजीव नाईक

अनिल ठाणेकर ठाणे : कार्यकुशल  विकासाभिमुख युवा नेतृत्व असलेले माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी, आपला वाढदिवस केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा करावा, त्याला उत्सवी स्वरूप देऊ नये असे आवाहन केले आहे. १५ एप्रिलला संजीव नाईक यांचा वाढदिवस आहे. माजी खासदार संजीव गणेश नाईक हे विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदरसह राज्यात विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते संजीव नाईक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. यावर्षी वाढदिवसाला कोणतेही उत्सवी स्वरूप न देता केवळ  विधायक उपक्रमांचे आयोजन करूनच संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. रक्तदान, अन्नदान, आरोग्य तपासणी, समाजातील गुणवंतांचा सत्कार, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, फळवाटप  अशा समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या  कार्यक्रमांचे आयोजन करावे. वाढदिवसाचा केक कापू नये. हार, तुरे, पुष्पगुच्छ शुभेच्छांसाठी आणू नयेत. सेवाभावी उपक्रमातून मिळणाऱ्या जनतेच्या  शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे आहेत, अशी भावना,  माजी खासदार संजीव गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे.