Category: होम

ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो ?

राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाने काढले परांजपे-मुल्लांचे वाभाडे अनिल ठाणेकर ठाणे : आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे-मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पीटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? , याचे उत्तर परांजपे-मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले. जो नाही झाला बापाचा; जो नाही झाला ठाकरे-शिंदेंचा; जो नाही झाला आव्हाडांचा , तो काय होणार अजित पवारांचा? , असा सवाल करीत सुहास देसाई म्हणाले की, आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्व नाही. त्यामुळेच ते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूठ टीका करून महत्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण,  पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे सबंध ठाण्याला माहित आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत सबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसेकाय सांगितले होते? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इसमाला कोणी दिली होती?  कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्क॔टाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा ! कार्यालयातील खाणं-पिणं, टिपटाॅपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे. तेव्हा याच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला. विक्रम खामकर यांनी, गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार यांच्या बंगल्यावर नेली होती. पण, त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचीतसा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किमंत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका केली. तर , रचना वैद्य यांनी, रिकाम्या भांड्याचा मोठा आवाज येत असतो. आनंद परांजपे हे असेच रिकामे भांडे आहे. ठाण्यातील स्वतःचे नाव उंच करण्यासाठी परांजपे हे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करीत आहेत. पण, त्यांना त्यांचेच लोक गांभीर्यपूर्वक घेत नाहीत, हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग,  विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे आदी उपस्थित होते.

संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ठाणे मुक्ती दिन’ साजरा

ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ‘ठाणे मुक्ती दिन’ मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे वर्ष १० वर्ष होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत आलुगडे, संगीता  श्री. सीताराम राणे, परिवहन सदस्य श्री. विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळाली होती. या जाचातून सोडविण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोरतुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढरे, अंजूर चे नाईक यांनी पराक्रम गाजवाला. अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला.तर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ऑस्ट्रेलियन नागरिकाला होरायझन हॉस्पिटलने दिले जीवदान

श्वास घेणेही झाले होते कठीण, मित्रही आला धावून; दाखविले माणुसकीचे दर्शन नितिन दूधसागर ठाणे : भारतीय वंशाचा 49 वर्षीय ऑस्टेलियन नागरिक ठाण्यात सासूला भेटण्यासाठी भारतात आला.  मात्र निमित्त झाले खोकल्याचे आणि अचानक त्यांची प्रकृती खालावून श्वासही घेणे कठीण झाले. संसर्गजन्य आजाराने त्रस्त झालेल्या या रुग्णाला तातडीने नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. होरायझन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपचार करुन शर्थीच्या प्रयत्नांनी जीवदान दिले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक हे 16 फेब्रुवारी 2024 रोजी बाळकुम, ठाणे येथे राहणाऱया त्यांच्या सासूला भेटण्यासाठी भारत भेटीवर आले. भारतात आल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांना खोकला आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला. छातीत किरकोळ जळजळ आणि संसर्ग आहे असे समजून त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडून खोकला आणि अशक्तपणावर उपचार सुरू केले. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनतर खोकल्यावर थोडीशी रक्ताची थुंकी दिसल्यानंतर ते अधिक चिंतेत पडले. हळूहळू त्यांना अधिक अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऑस्ट्रेलियात असलेल्या आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. तिने ताबडतोब भारतातील आपल्या डॉक्टर मित्राशी बोलणे पेले. त्यांना 28 फेब्रुवारी 2024 रोजी ठाण्यातील नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट आणि वैद्यकीय संचालक यांच्या ओळखीच्या एका फिजिशियनमार्फत होरायझन रुग्णालयात आणले. रुग्णालयात दाखल होताच त्यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. खोलीच्या हवेत ऑक्सिजन सॅच्युरेशन 65 टक्के पर्यंत ऑक्सिजन सॅच्युरेशनसह ऊर्जेची कमतरता होती. त्यांना तातडीने एनआयव्हीसपोर्ट देण्यात आला. सखोल तपासणीनंतर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दुसऱयाच दिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी 2024 रोजी रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे व श्वसनदर व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.  व्हेंटिलेटरचा आधार असूनही त्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि श्वसनात सुधारणा झाली नाही; हे प्राथमिक फुफ्फुस निकामी होण्याचे सूचक होते. जीवरक्षक उपाय म्हणून ईसीएमओ प्रक्रियेची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत घेण्यात आले आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि समुपदेशन करण्यात आले. आवश्यक प्रक्रिया आणि वैद्यकीय व्यवस्थापनासह ईसीएमओ थेरपी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण टीमसाठी तिथला प्रवास खडतर होता. संपूर्ण आयसीयू परिचारिकांच्या कठोर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी डॉक्टर हृषीकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परफ्युजनिस्ट, ईसीएमओ थेरपी या महत्त्वाच्या निकषांचे दैनंदिन निरीक्षण तसेच पल्मोनोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ञ, ईएनटी सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट यांचा संपूर्ण प्रवासात सहभाग होता. रूग्णामध्ये सुधारणा दिसू लागल्यावर 7 मार्च 2024 रोजी ईसीएमओ थांबविण्यात आला. धमनी लाइन काढून टाकण्यात आली. टीटी ट्यूब काढून टाकण्यात आली. रुग्णाने संपूर्ण थेरपीला चांगला प्रतिसाद दिला आणि 11 मार्च 2024 पर्यंत आपली स्थिती पूर्णपणे परत मिळवली. या सर्व प्रक्रियेत रुग्णाचा मित्र वेळेत धावून आला आणि आपल्या माणुसकीचे दर्शन दिले. तर अत्याधुनिक सामुग्री आणि योग्य उपचार तसेच देवाच्या कृपेने आज रुग्ण ऑस्ट्रेलीयाला जाण्यास सज्ज असल्याचे डॉक्टर हृषीकेश वैद्य यांनी सांगितले.

छञपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले मुंबई यांच्या तर्फे जुहू समुद्र किनारी  असणाऱ्या  मुंबईचे माजी महापौर/माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू  यांच्या पुढाकाराने बांधलेल्या  छञपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प समूहाला  पुष्पहार अर्पण करताना  समितीचे सचिव डॉ. मोहन अनंत राणे, विश्वस्त राजू रावळ, मकरंद येडुरकर,   डॉ. चैतन्य बढे, अविनाश गुजर,  राजेश घाग चंद्रकांत  तांबे  पवन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘गडकोटांचे संवर्धन व्हायला हवे, आज ते तग धरुन आहेत उद्या ते दिसणारच नाही’ – हमीदा खान

ठाणे : गडकोटांमुळे इतिहासाबदद्लचा आदर निर्माण होतो, तसेच, इतिहासाची माहिती मिळते. नुसती भटकंती न करता आपण त्याचा अभ्यास करु लागतो असे मत गडरागिणी हमिदा खान यांनी व्यक्त केले. गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे. आज ते तग धरुन आहे, उद्या ते दिसणारच नाही. त्यामुळे आजच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे कळकळीचे आवाहन हमिदा यांनी केले. शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वतर्फे श्री शिवराज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशी (तिथी नुसार) ३५०वे वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ६५० किल्ले सर करणाऱ्या दुर्गकन्या हमिदा यांची “शिवाजीमहाराजांच्या गड-दुर्गांची भ्रमंती” याविषयावर शिवकालीन नाणी संग्राहक, अभ्यासक प्रशांत ठोसर यांनी मुलाखत घेतली. हमिदा यांनी ६५० किल्ले सर करताना आलेले अनुभव, अडचणी, मित्रांकडून मिळालेली प्रेरणा हे सांगत आप्पा परब यांनी दिलेले प्रोत्साहन याचा प्रवास उलगडला. माझी गड कोटांची सुरूवात १९९० साली रायगड पासून झाली खरी पण १९९८ साली रायगडला पुन्हा भेट दिल्यावर आप्पांनी रायगडच्या इतिहासाचा खडान खडा सांगितला त्यावेळी सगळेच गडकोट बघण्याचा निश्चय केला आणि १९९९ साली मी एका वर्षात १०० किल्ले सर केले. आप्पांनी गडकोटांची माहिती दिली नसती तर गडकोटांची भटकंती झाली नसती असे त्यांनी आवर्जुन नमूद केले. छत्रपती शिवरायांचे ३५० किल्ले पार करायला औरंगजेबला किती वेळ लागला असता हे त्यांचे किल्ले पाहिल्यावरच अनुभूती येते. सह्य्ाद्रीतील गडकोट ही आपली दौलत आहे अशी सह्याद्री आपल्याला लाभली याचा मला अभिमान आहे. स्वराज्याची दौलतच हे गडकोट आहेत. या गडकोटांमुळेच महाराजांना स्वराज्य जिंकता आले आहे. महाराजांचे हे गडकिल्लेच स्वराज्याचे साक्षीदार आहेत. काही किल्ले तग धरुन आहेत, काही नामशेष होत आहेत तर काहींचा शोध लागत आहे. नामशेष झालेल्.ा गडकोटांच्या चिराही आपल्यासाठी पूजनीय आहेत. काही किल्ल्यांमध्ये तर चक्क गाव वसले आहे त्यामुळे गडकोटांच्या खाणाखुणा शोधाव्या लागत आहेत पण त्या दिसल्या तरी महाराजांची प्रचिती येते अशा भावना हमीदा यांनी व्यक्त केल्या. सर्वांत आवडता किल्ला कोणता हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, रायगडा हा किल्ला मला अतिप्रिय आहे कारण त्यावर माझ्या राजांचा वास होता. शिवरायांच्या गडकोटांचे वैशिष्ट्य वेगळे आहे त्यामुळे एका किल्लयाची दुसऱ्या किल्ल्यासोबत तुलना करुच शकतन नाही असेही त्या म्हणाल्या. रायगड ही ट्रेकर्स मंडळीची पंढरी आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात तिथीच्या दिवशी ममहाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यादिवशी महाराज सििंहासनाधिश्वर झाले. या क्षणाचा रायगड हा साक्ष आहे. म्हणून ट्रेकर्स हे रायगडावर जाऊन, महाराजांना मुजरा करुन पुढची वाटचाल करत असल्याचे हमीदा यांनी शेवटी सांगितले.

केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरुद्ध कर्नाक बंदर येथे गोदी कामगारांची प्रचंड  निदर्शने

ठाणे : भारतातील प्रमुख बंदरातील  बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन  करार लागू आहे. आत्तापर्यंत या करारासाठी सात मिटिंग झाल्या असून,  इंडियन पोर्ट असोसिएशनने ४ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला अखिल भारतीय बंदर व गोदी  कामगारांच्या पाचही  महासंघाच्या राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे कडाडून विरोध केला असून, केंद्र सरकारच्या या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांनी  निदर्शने केली. मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशन, फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती, मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी./ एस. टी. अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशन या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २७ मार्च २०२४  रोजी जेवणाच्या सुट्टीत कर्नाक बंदर येथे कामगारांनी आपल्या विविध  मागण्यांसाठी निदर्शने केली. याप्रसंगी ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स) जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, गोदी कामगारांचा वेतन करार आत्तापर्यंतच्या प्रथेनुसार मूळ पगारात  महागाई भत्ता समाविष्ट करून  केला पाहिजे. सरकार व मालक आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे,  हे आपण ओळखले पाहिजे.  आपणांस लढल्याशिवाय  काही मिळणार नाही,  त्यासाठी सर्व  कामगारांनी एकजुटीने लढा देण्याची काळाची गरज आहे. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे  जनरल सेक्रेटरी केरशी पारेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, अधिकाऱ्यांपेक्षा कामगारांना जास्त पगार मिळता कामा नये, ही सरकारची अट चुकीचे आहे. गोदी कामगारांना मूळ पगारात महागाई भत्ता समाविष्ट करून १७  टक्के पगारवाढ मिळालीच पाहिजे. सरकारने पगार वाढीसाठी घातलेल्या अटी मागे घेतल्या पाहिजेत. याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार व मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे पदाधिकारी विजय कांबळे, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे सचिव उदय चौधरी, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मीनास मेंडोसा,  मुंबई पोर्ट ट्रस्ट एस. सी./एस. टी. अँड ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी गिरीश कांबळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेला  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी विजय रणदिवे, शीला भगत, अहमद काझी, मारुती विश्वासराव, मनीष पाटील, संदीप चेरफळे, प्रदीप नलावडे, ट्रान्स्पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बबन मेटे, बापू घाडीगावकर, फिलिप्स आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

अशोक गायकवाड रायगड : जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अलिबाग तालुक्यातील बामनोली येथील चार केंद्र, वरसोली येथील सहा केंद्र, चेंढरे येथील दहा केंद्र, अलिबाग येथील सहा मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून…

निवडणूकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी ५३ भरारी पथके, ७६ स्थिर सर्वेक्षण पथक – किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात ५३ भरारी पथके आणि ७६ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापना…

मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व निरोप समारंभ

केंद्रशाळा पोयरे गांगोरामेश्वर  येथे कै.रामचंद्र हरी राणे स्मरणार्थ ठाणे : जिल्हा परिषद केंद्र शाळा पोयरे गांगोरामेश्वर येथे नुकतेच  मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. श्री जयवंत राणे यांच्यामार्फत  श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या तर  शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने ७वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीम.भाग्यश्री सांबारी मॅडम व केंद्रप्रमुख श्री नामदेव सावळे सर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमधील लहान गट पहिली ते चौथी यामधून तीन क्रमांक यात प्रथम क्रमांक कु. मैत्री रणजित घाडी द्वितीय क्रमांक ऋतुराज जयदेव करंदीकर तर तृतीय क्रमांक वेदांत दिपक मेस्त्री याचा आला. मोठा गट यात  पाचवी ते सातवी इयत्ताचा सहभाग होता.प्रथम क्रमांक यश सुनील घाडी द्वितीय क्रमांक राधिका संतोष साळसकर तर तृतिय क्रमांक हर्षदा दिपक मेस्त्री हिचा आला.या सर्व गुणी विद्यार्थ्यांना   मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदन करून  कंपास पेटी भेट दिली. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य दिले.. इयत्ता ७ वीचा विदयार्थी मोतीराम साळसकर याने शाळेसाठी समई भेट दिली.कु. तेजल घाडी व कु.हर्षदा मेस्त्री या  विद्यार्थ्यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. भाग्यश्री सांबारी मॅडम यांनीही मुलांना छान मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख श्री सावळे सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.वाचनाचे महत्व सांगितले.  वाचाल तर वाचाल,सुसंस्कार याविषयी मार्गदर्शन केले. अशाच स्पर्धा पुढच्याही वर्षी राणे परिवाराच्या वतीने आपण घेऊया असे श्री जयवंत राणे यांनी आवर्जून सांगितले.याचा सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी आनंद झाला.तसेच मुलांना खाऊ ही राणे परिवाराच्या वतीने देण्यात आला. उपशिक्षक श्री उदगीरे सर यांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग आवश्यक आहे असे सांगितले. शाळेच्या भविष्यातील उपक्रमासाठी पालकांनी मदत करावी अशीही विनंती केली.शाळेच्या नावाची एक गोलाकार कमान व संपूर्ण शाळा रंगरंगोटी करून बोलक्या भिंती करावयाच्या आहेत यासाठी दात्यानी सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गोसावी मॅडम यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचलन श्री उदगीरे सर यांनी केले.स्वयंसेविका श्रीम मोरजे मॅडम यांनीही कार्यक्रमाला  मोलाचे सहकार्य केले. याप्रसंगी उपस्थित केंद्रप्रमुख श्री सावळे सर, सौ.भाग्यश्री सांबारी मॅडम,श्री धोंडू हरी राणे,श्री दाजी हरी राणे,सौ.गोसावी मॅडम, श्रीम.मोरजे मॅडम,शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री रणजित घाडी,उपाध्यक्ष श्रीम.दिव्या मेस्त्री,श्री जयवंत राणे, श्री.सचिन राणे,श्री. दिपक राणे,अंगणवाडी सेविका मालपेकर मॅडम,श्री धोंडू घाडी,सौ.आर्या जयदेव करंदीकर, सौ.मानसी लक्ष्मण घाडी, सौ.जयश्री लक्ष्मण साळसकर, सौ.शारदा संतोष साळसकर, श्रीम.प्रतिक्षा गुणाजी घाडी, सौ.साक्षी सुनिल घाडी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.