Category: होम

‘स्वच्छ माझे अंगण’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान – डॉ भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग :*रायगड जिल्ह्यात १ हजार ८३० गावांमध्ये स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान २६ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानात स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यात येणार असून, अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी केले आहे. जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय, शोष् खड्डा, अथवा परसबाग, कंपोष्ट खत खड्डा तसेच कचरा वर्गीकरण साठी हिरव्या व निळ्या रंगाच्या दोन डस्ट बिन असणाऱ्या कुटुंबांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कुटुंब म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. २१ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य प्रत्यक्ष गृहभेटी देऊन या चार बाबी वापरात आहेत का याची माहिती ते घेणार आहेत. २६ जानेवारी रोजी या कुटुंबांचा ग्रामपंचायत चे वतीने सत्कार होणार आहे. सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरी चे प्रमाणपत्र देऊन पात्र कुटुंबांना गौरविण्यात येईल.ग्रामीण भागातील सर्व गावात दृश्यमान स्वच्छता राहावी. व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहन देनेसाठी स्वच्छ माझे अंगण अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे स्वच्छता सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. गाव स्वच्छ, सुंदर राहण्यास याची मदत होणार असल्याने जास्तीत जास्त ग्रामस्थांनी यात सहभागी होऊन स्वच्छतेची व्याप्ती वाढवावी असे आवाहन पाणी व व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. 00000

 रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार!

 १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार   बदलापूर: बदलापूर शहरातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी अंबरनाथच्या प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेणारी जुनी जलवाहिनी सातत्याने फुटत असल्याने त्यातून निघणारे सांडपाणी नैसर्गिक नाल्यामार्गे थेट उल्हास नदीत जाऊन मिळत होते. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत होता. आता हे सांडपाणी नेण्यासाठी भुयारी गटार योजना राबवली जाते आहे. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते १२८ कोटींच्या या योजनेचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यामुळे बदलापूर पूर्वेतील कर्जत राज्य मार्गावर होणारा त्रास कमी होणार आहे. बदलापूर एमआयडीसीतील रासायनिक सांडपाणी कल्याणच्या खाडीपर्यंत वाहून नेण्यासाठी एमआयडीसीत जुनी वाहिनी होती. मात्र ती जीर्ण झाल्याने वारंवार वाहिनी फुटून शहरी भागात रासायनिक सांडपाणी रस्त्यावर येत असल्याच्या घटना घडत होत्या. ही वाहिनी बदलापूर पूर्वेतील वर्दळीच्या कर्जत राज्यमार्गावरून जात होती. अनेक मोठे वाणिज्य आस्थापना, कार्यालये आणि हॉटेल या मार्गावर होते. जलवाहिनी फुटल्याने अनेकदा हेच सांडपाणी शेजारच्या रहिवासी इमारतींमध्ये जात होते. तर शेजारी असलेल्या नाल्यामार्गे हेच सांडपाणी उल्हास नदीतही जात होते. उल्हास नदीवरील आपटी बंधारा येथून उचललेले पाणी जिल्ह्यातील बहुतांश शहरांना दिले जाते. त्यामुळे सांडपाणी मिसळल्याने पिण्याच्या पाण्याला दर्प येण्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या सगळ्यावर उपाय म्हणून रासायनिक सांडपाण्याची ही वाहिनी भूमिगत करण्याचा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला. त्याला उद्योग विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार आता १२८ कोटी रुपयांच्या खर्चातून बदलापूर औद्योगिक वसाहत ते अंबरनाथ सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशी ही रासायनिक सांडपाण्याची भुयारी गटार योजना राबवली जाणार जाते आहे. नुकतेच आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होऊन रासायनिक सांडपाण्याचा त्रास पूर्णपणे बंद होईल, असे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. ००००००

शेतकऱ्यांच्या मदतीला आता ‘बळीराजा मदतवाहिनी’

हरिभाऊ लाखे नाशिक : शेतकऱ्यांना फसवणुकीच्या तक्रारी करता याव्यात, यासाठी बळीराजा ही मदतवाहिनी कार्यान्वित करण्यात येत आहे. सद्यस्थितीत आर्थिक गुन्हे शाखा यासंदर्भातील तक्रारी जमा करत यावर काम करत आहे. केवळ नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून फसवणुकीचा आकडा ४२ कोटींच्या घरात आहे. यातील एक कोटी रुपये शेतकऱ्यांना परत देण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांदा उत्पादकांची बऱ्याचदा परप्रांतीय तर, कधी स्थानिक व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाला पैसे देण्याचा वायदा होतो. परंतु, आश्वासन न पाळता संशयितांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. शेतकऱ्यांच्या बांधावर द्राक्ष खरेदीच्या वेळी भाव, वजन अशा वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असते. शेतकऱ्यांची होणारी ही अडवणूक लक्षात घेता याआधी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यानंतर काही काळ काम थंडावले. मात्र मागील आठवड्यात कृषि मंत्री कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा शेतकरी फसवणुकीचा विषय चर्चेत आला. फसवणूक झाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नाशिक जिल्हा पोलिसांच्या वतीने बळीराजा ही मदतवाहिनी सुरू करण्यात येत आहे. तत्पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे फसवणुकीचे तक्रार अर्ज मागवण्यात येत आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातून ९०० हून अधिक तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १०० शेतकऱ्यांची पोलिसांनी प्रत्यक्ष भेट घेत काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या बैठका घेत प्रबोधन करण्यात येत आहे. याविषयी कृषी, पणन, द्राक्ष बागायत संघ आदींशी पत्रव्यवहार करुन आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. परप्रांतीयांना वचक नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या तक्रारी २०१४ पासूनच्या आहेत. फसवणुकीचा आकडा हा ४२ कोटींच्या घरात आहे. यात संशयितांकडून ९० लाखांहून अधिक वसूल केले आहेत. काही पैसे लवकरच परत मिळतील. परप्रांतीय व्यापारी किंवा अन्य व्यापाऱ्यांना जिल्ह्यात कृषिमालाची खरेदी करायची असेल तर त्यांनी द्राक्ष बागायतदार संघाकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी एखादा व्यापारी माल खरेदीसाठी आला तर त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. जेणेकरून त्याची तपासणी करुन त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती मिळवली जाईल. या सक्रियतेमुळे फसविण्याच्या उद्देशाने येणारे परप्रांतीय व्यापारी सावध झाले आहेत. – रवी मगर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा)

 सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारी रोजी ‘घर चलो अभियान’

 भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विश्वास मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गत 10  जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी  घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायती पासून पार्लमेंट पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. यावेळी संघटन पर्व प्रभारी आ. रवींद्र चव्हाण, आ. शिवाजी कर्डिले, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. पक्षाचे दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वासही श्री. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. बावनकुळे यांनी सांगितले की, पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्य नोंदणी अभियानाला राज्यात प्रारंभ झाला आहे. 5 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी बूथ पातळीवर जाऊन या अभियानात सहभाग घेतला.10 जानेवारी रोजी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी प्रत्येक बुथवर किमान 40 -50 घरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणी करणार आहेत. पक्षाने राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्राथमिक सदस्य नोंदणीनंतर सक्रीय सदस्य नोंदणी अभियान सुरु होईल. एका बुथवर 5 सक्रीय सदस्य नोंदवून राज्यात 5 लाख सक्रीय सदस्य नोंदविले जातील, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यातील जनता सदस्य नोंदणी अभियानाला प्रतिसाद देईल, असा विश्वासही श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला. ०००००

 दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची विजय साळवी यांची मागणी  

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण : कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि सभोवतालचा परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना पत्र दिले आहे. किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थान आहे. त्या स्थानामुळेच कल्याण शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. किल्यावरील दुर्गा देवी हे अत्यंत जागृत दैवत आहे. हे दैवत कल्याणकरांचे ग्रामदैवत, कुलदैवत आहे. त्यामुळेच या पवित्र स्थानाने सर्व कल्याणकरांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. किल्ले दुर्गाडी ही सरकारी मालमत्ता आहे असा न्यायालयाने नुकताच निर्णय आदेश दिलेला आहे. या आदेशा नुसार किल्ले दुर्गाडी जागेचा संपूर्ण कब्जा सरकारकडे आला आहे. किल्ले दुर्गाडी हे स्थान कल्याणकरांसाठी एक श्रध्देचा व प्रेरणेचा विषय आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडी व त्या सभोवतीच्या परिसराचे नुतनीकरण करुन ते एक पर्यटन स्थळ होईल असे सुंदरीकरण व्हावे अशी सर्व कल्याणकरांची इच्छा आहे. सध्या किल्ले दुर्गाडीच्या बुरुजाचे काम सुरु आहे.  नंतर मंदिराच्या चौथऱ्याचे काम होणार आहे असे समजते. परंतु असे थोड्या थोड्या भागाचे डागडुजीचे काम न करता संपूर्ण किल्याचा रचनाकाराकडून एक सुंदर आराखडा तयार करुन त्याप्रमाणे एक सुंदर कलाकृती कशी निर्माण होईल याबाबत विचार करुन आदर्शवत काम करावे. महापालिकेकडून असे सुंदर स्थान निर्माण झाले तर कल्याणकर सदैव महानगरपालिकेचे व आपले ऋणी राहतील. सध्या दुर्गाडीच्या गेटला संपुर्ण तडे जाऊन ते जीर्ण झालेले आहे, श्री दुर्गादेवीच्या मंदिराचा चौथरा घुशींनी पोखरलेला आहे, चौथऱ्यावरील लाद्या संपूर्ण तुटलेल्या आवस्थेत आहेत.  चौथऱ्याला तटबंदी नसल्यामुळे तो ढासळण्याच्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीत असलेला छत्रपतींचा किल्ला पाहुन मनाला फार वेदना होत असतात. त्यामुळे हा विषय कल्याणकरांच्या श्रध्देचा व भावनीक आहे याचा विचार करुन संपूर्ण लक्ष घालावे व ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीची अप्रतिम नुतन  कलाकृती निर्माण करावी अशी मागणी शिवसेना उपनेता विजय साळवी यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

मुलांचा भाव विश्वास जाणून ‘वासाची किंमत’ या लघुपटाची निर्मिती – डाएट प्राचार्य संजय वाघ

कल्याण : “इयत्ता तिसरीच्या वर्गातील मराठी विषयातील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित अजय पाटील यांनी पटकथा, संवाद, कॅमेरा, एडिटिंग, दिग्दर्शन असे पंचरंगी भूमिका सादर करून अत्यंत सुंदर पद्धतीचा लघुपट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे,” असे गौरव उद्गार डायटचे प्राचार्य संजय वाघ यांनी काढले. नुकताच “वासाची किंमत” या लघुपटाचे उद्घाटन संजय वाघ यांच्याहस्ते जिल्हा डाएट शिक्षण प्रशिक्षण सभागृह राहटोली बदलापूर येथे ठाणे जिल्ह्यातून आलेल्या विषय तज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर डाएट प्राध्यापक खरोटमल, कुमार पाटील, लेखक दिग्दर्शक अजय पाटील, या लघुपटात अभिनय करणारे विद्या शिर्के, करण राजपूत, पांडुरंग पाटील, रणजित पाटील आणि बालकलाकार आदिती पाटील हे उपस्थित होते. संजय वाघ पुढे म्हणाले की,  “ही नवनिर्मिती असून या नव्या निर्मितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या लघुपटाचा फायदा होणार आहे. दृश्य माध्यम मुलांना निश्चितच अध्ययन प्रकिया समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. शिवानीच्या धाडसाची, बुद्धिमत्तेची आणि कल्पकतेची कथा या लघुपटात दाखवलेली आहे. लहान मुलं सुद्धा समाजामध्ये वावरत असताना जशास तसे कसे वागतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे “वासाची किंमत”  हा लघुपट‌ आहे. वैजोळ शाळेत शिकणाऱ्या आदिती पाटील या विद्यार्थ्यीनीने अत्यंत उत्तम पद्धतीने भूमिका शिवानीची भूमिका साकारली आहे. अजय पाटील त्याचबरोबर सर्व कलाकारचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” असे हे गौरव उद्गार वाघ यांनी काढले. खरोटमल यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून ही एक नवनिर्मित असून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल आणि अत्यंत उत्तम पद्धतीने फिल्म तयार केल्याचे सांगितलं. लेखक दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितलं की, हा लघुपट बनवताना इयत्ता तिसरीतील “वासाची किंमत” या चित्रकथेवर आधारित लघुपट बनवलेला असला तरीसुद्धा यामध्ये अनेक बारकावे घेण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतीच्या कामात मदत करणारी शिवानी,  खेळ, हसणं, अभ्यास आणि एकट्याने बाजारामध्ये अत्यंत बिंधासपणे वावरताना स्वतःची काळजी घेणं. समाजामध्ये जर आपल्याला कोणी फसवत असेल, ठकवत असेल तर त्यालाही त्याच भाषेत उत्तर कसे द्यावे, असा सर्वांगीण विचार करून हा लघुपट केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण राजपूत तर आभार प्रदर्शन पांडुरंग पाटील यांनी केले. 00000

 ‘एचएमपीव्ही’ या विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये!

ठाणे महापालिकेचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विशेष वॉर्ड तयार ठाणे : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही (Human Metapneumo virus) साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला सर्तक राहण्याचे निर्देश दिले आहेत. या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, २०२३च्या तुलनेत डिसेंबर-२०२४ मध्ये या आराजाच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करु नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. विशेष वॉर्ड तयार दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. हे करावे… खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटीलेशन) राहील, याची दक्षता घ्या. काहीही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे करु नये हस्तांदोलन करणे टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे…

वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे तिचा उपयोग समाज बदलण्यासाठी होऊ शकतो

बाबासाहेब जंजाळ यांचे मत   सोयगाव : वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्यासाठी वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका पार पाडतात, समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल व्यक्तीला सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रे ही एक फार मोठी शक्ती आहे तिचा उपयोग समाज बदलण्यासाठी होऊ शकतो असे ठामपणे बाबासाहेब जंजाळ पाटील पत्रकार दिनी म्हणाले. सोयगाव तालुक्यातील वडगाव – घोरकुंड ग्राम पंचायत दालनात सोमवारी पत्रकार दिनानिमित्त सन्मान पत्रकाराचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला प्रमुख  ग्रा. पं. अधिकारी कल्पना कचरे, सरपंच नंदाताई संतोष पवार, जनार्दन पंडीत आघाडे सदस्य , बाळासाहेब जंजाळ पाटील,भागवत पाटील, गणेश देविदास गुंजाळ संगणक परिचालक, समाधान वसंत मासरे , संदिप प्रकाश साबळे ,भागवत पाटील विश्राम पाटील, विकास बाबू अमेश‌ आदीच्या उपस्थितीत विजय पगारे मराठवाडा विभागिय अध्यक्ष,पत्रकार जनसेवा संघ संचलीत,महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघ यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन येथोचित्त सत्कार करण्यात आला,पुढे संबोधित करतांना जंजाळ पाटील म्हणाले की, बाळ शास्त्री जांभेकर त्यांचा यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यासाठीच जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना आपणास काही क्षणात समजतात त्यात नवीन शोध,राजकारण, अर्थकारण सभा संमेलने,कला, क्रीडा,शिक्षण, निवडणुका,चित्रपट प्रदर्शित होणे, खून फसवणूक,दरोडे, किंवा समाजातील स्थित्यंतरे याबाबतची माहिती असो,आपल्यापर्यंत पोहोचण्याचे काम पत्रकार बंधु करतात,समाजासाठी सातत्यपूर्ण झगडणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो, पत्रकार हे देशाचे खरे भक्त असतात याची जाणीव समाजाला करून देण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवीन पनवेलमध्ये वेळेवर बस सोडण्यासाठी प्रवाशांचे आंदोलन   

पनवेल : प्रवाशांना असाच त्रास होत राहिला तर, यापुढेही असेच आंदोलन होत राहील व त्यास गंभीर स्वरूप येईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, बस संघटनेच्या सभासद या आंदोलनात सहभागी झाले होते.…

दोन वेळा गुलाब देणार; तिसऱ्यांदा थेट रिकामे हंडे फेकणार – मर्जिया पठाण

अनिल ठाणेकर ठाणे : पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही ठामपा प्रशासनाकडून मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. मुंब्रा – कौसाच्या वाट्याचे 17 लाख लिटर्स पाणी चोरले जात आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी ठामपा आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आता आम्ही केवळ गुलाब दिले आहे. आणखी दोनवेळा गुलाब देऊ नंतर रिकामे हंडे फेकू, असा इशारा पठाण यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा,  कौसा परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा, यासाठी मुंब्रा परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली असून पालिकेकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांना चक्क पाणी माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्या निषेधार्थ मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया पठाण आणि सुमारे 25 ते 30 महिलांनी ठामपा आयुक्त सौरव राव यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद पवार यांनी मर्जिया पठाण यांची भेट घेतली. पाणी वितरण व्यवस्थेच्या रिमोल्डींगचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत होईल,  असे आश्वासन पवार यांनी दिले. त्यावर मर्जिया पठाण या चांगल्याच संतापल्या. ठाणे पालिकेकडून वारंवार अशीच उत्तरे दिली जात आहेत. एकीकडे १७ लाख लिटर्स पाण्याची दररोज चोरी होत आहे. या चोरीमागे पाणी माफिया की व्हाॅल्वमॅन आहेत, याचा शोध पालिकेने घ्यायला हवा. पण, तो घेतला जात नाही. सामान्य नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत असताना पाणी माफिया गब्बर होत आहेत. आज हे शांततेत आंदोलन झाले आहे. पुन्हा दोन वेळा आम्ही ठामपा अधिकाऱ्यांना गुलाबाची फुले देऊ त्यानंतरही जर पाण्याची टंचाई संपली नाही तर रिकामे हंडे आणि कळश्या अधिकाऱ्यांना देऊ, असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला. 0000