Category: होम

प्रख्यात रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया मृत्यूच्या दाढेतून बचावले

डॉ. पराग अजमेरांच्या उपचाराला यश  मुंबई  : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात प्रख्यात ह्रुदयरोग तज्ज्ञ डॉ. पराग अजमेरा यांना यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र मिशन पीस UN चे राजदूत दहिसर येथील प्रख्यात रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया यांना चक्कर आल्याने आणि उजवा हात व पाय संवेदनाहीन झाल्याने बोरिवली मुंबईतील अरिहंत हॉस्पिटलमधील इंटेसिव्ह कार्डियाक केअर युनिट (ICCU) मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलाने त्यांना त्वरीत अरिहंत हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ पराग अजमेरा यांनी तपासणी केली आणि तपासणीत डॉ. पुरेचा भाटिया यांना सोडियमची पातळी कमी, हिमोग्लोबिन कमी, फॅटी लिव्हर आणि मेंदूला रक्तपुरवठा करण्यात अडथळा येत असल्याचे निदान केले. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर इंट्राव्हेनस औषधे दिली गेली. ते धोक्याबाहेर असले तरी अजमेरा यांनी त्यांच्यावर दीर्घकालीन उपचारांचा सल्ला दिला आहे. डॉक्टर पुरेचा भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉ. पराग अजमेरांच्या प्रयत्नांना यश आले, उपचाराला प्रतिसाद मिळाला आणि आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु त्यांना विश्रांती घेण्याचा आणि पाहुण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. प्रवीण भाटिया यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय जनता पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, भारतीय जनता पक्षाचे नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांना आपल्या अल्टरनेट मेडिसीन आणि रेकी यांच्या माध्यमातून उपचार केले आहेत.  ते सेंट्रल कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन इंडिया चे डायरेक्टर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपालजी मावजी पुरेचा यांचा वारसा लाभलेल्या डॉ. प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आल्या बद्दल डॉ. पराग अजमेरा यांचे दहिसर बोरीवली येथील नागरिकांनी आभार मानले आहेत.

भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक;

सुदैवाने कुणालाही दुखापत नाही मुंब्राः  बँकेच्या वातानाकुलित (एसी) यंत्राना लागलेल्या भीषण आगीत ११ आऊटडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी मुंब्र्यात घडली. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन गृहसंकुलाच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर एका खाजगी बँकेची शाखा आहे.या बँकेच्या तळ मजल्यावरील एसी युनिटला सोमवारी सकाळी पावणेसात वाजता भीषण आग लागली.याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अथक प्रयत्नानी आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु बँकेचे ११ एसी आऊडडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाले.आगीची झळ  बँकेच्या जवळ असलेल्या मोबाईल आणि  कपड्याच्या दुकानांना देखील बसली.यात दुकानांचे  किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती ठामपाच्या आप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

तुम्हाला माजी मंत्री ओळखता येत नाही का?

शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर गाडी अडवताच शिवतारे संतापले ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजही सर्व बैठका रद्द केल्या आहेत. घशामध्ये इन्फेक्शनचे कारण सांगितले जात असून दोन दिवसांपूर्वी दरे गावी गेलेले असतानाही ते आजारी पडले होते. यानंतर रविवारी दुपारी ते ठाण्यात परतले होते. शिंदे यांचे आजारपण आणि मुख्यमंत्रिपदाचे भिजत घोंगडे याचे कनेक्शन राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. अशातच शिंदेंच्या बंगल्यावर शिवसेनेचे आमदार ये-जा करत आहेत. यावेळी विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकल्याचे दिसले. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी गाडी अडवल्याने आमदार विजय शिवतारे संतप्त झाले होते. शिंदेंच्या ठाण्याताली निवासस्थानाबाहेर शिवतारेंची पोलिसांनी गाड़ी अडविली व कोण म्हणून चौकशी केली. यावेळी शिवतारेंनी तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का? असा सवाल पोलिसांना केला. शिवतारे यांना मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. यामुळे शिवतारे यांची श्रीकांत शिंदे यांनी उठबस केली. बाहेर आल्यावर शिवतारेंनी शिंदेंनी अशी कोणतीही आमदारांची बैठक बोलविलेली नाही, असे सांगितले. दोन दिवस मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना ताप आला होता. कालच ते दरेगावातून मुंबईत आले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, अजूनही ते उपचार घेत आहेत, असे शिवतारे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांची भेट झाली. आता एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी आहे. आज कोणत्याही बैठका नव्हत्या. खातेवाटपाचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, ते जे ठरवतील ते सर्वांना मान्य असेल, असेही शिवतारे म्हणाले.

चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात पुन्हा सवलत मिळणार?

मुंबई : भारतीय जनता पार्टीप्रणित महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाल्यानंतर विकासकांची अनेक महिन्यांपासूनची चटईक्षेत्रफळातील अधिमूल्य सवलतीची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. या बाबतचा प्रस्ताव तयार असून १५ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत साधारणत: सहा महिन्यांसाठी चटईक्षेत्रफळाच्या अधिमूल्यात सवलत देण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र ही सवलत किती असेल, याबाबत या सूत्रांनी मौन धारण केले. या बदल्यात विकासकांनी घरखरेदीदारांना फायदा द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आल्याचे कळते. करोनाच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यावेळी एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारिख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून सध्या असलेले अधिमूल्य भरमसाठ असून ते कमी करावे, अशी सूचना केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वर्षभरासाठी चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यामुळे पालिका, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रकल्पांत विकासकांनी लाभ उठवला होता. महायुती सरकारने समूह पुनर्विकासासाठी अधिमूल्यात वर्षभरासाठी ५० टक्के सवलत दिली होती. आता अधिमू्ल्यात पुन्हा सवलत पुन्हा मिळावी, याबाबत विकासकांकडून वेळोवेळी शासनाकडे मागणी केली जात आहे. माजी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. याबाबतचा प्रस्तावही त्यावेळी तयार करण्यात आला होता. परंतु मावळत्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. आता नव्या सरकारकडून याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. करोना काळात चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात दिलेल्या सवलतीच्या बदल्यात घरखरेदीदारांना लागू होणाऱ्या मुद्रांक शुल्काचा संपूर्ण भार संबंधित विकासकांनी उचलावा, अशी अट घालण्यात आली होती. विकासकाने तसे पत्र करारनामा नोंदणीकृत करताना नियोजन प्राधिकरणाला सादर करावा आणि संबंधित प्राधिकरणाने याबाबतची यादी उपनिबंधक कार्यालयाला द्यावी, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. ज्या विकासकांनी असा लाभ दिलेला नाही, त्यांना चटईक्षेत्र‌फळ अधिमूल्यात सवलत न देण्याचे ठरविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा विकासकांच्या संघटनेने कंबर कसली असून यावेळी नक्की सवलत मिळेल, असा विश्वास त्यांना वाटत आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची दरवाढ झालेली असून विकासकांना विविध शुल्कांपोटी ४० ते ४५ टक्के अधिमूल्य भरावे लागत आहे. त्यात सवलत मिळाली तर बांधकाम व्यवसायाला संजीवनी मिळेल, असा विश्वास विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. ०००००

डोंबिवलीत मालमत्ता कर थकविणाऱ्या क्रिटीकल केअर सेंटरसह पाच गाळे सील

पालिकेच्या ‘ग’ प्रभागाची कारवाई डोंबिवली : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या येथील ‘ग’ प्रभाग हद्दीतील वाणीज्य वापर असलेल्या पाच आस्थापना ‘ग’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सील केल्या. या मालमत्ताधारकांकडे एकूण १६ लाख ५४ हजार ९७७ रूपयांची थकबाकी आहे. पाच गाळे सील करण्यात आलेल्या थकबाकीदारांच्या यादीत डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोडवरील गोविंद राजाराम पाटील यांच्या राजाराम निवासमधील पाच दुकान गाळ्यांचा समावेश आहे. या गाळ्यांचे मालक असलेल्या गोविंद पाटील यांच्याकडे मालमत्ता कराची ११ लाख ३७ हजार २३४ रूपयांची थकबाकी आहे. त्यांना ही थकित रक्कम भरणा करण्यासाठी पालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून ही रक्कम भरणा न करण्यात आल्याने त्यांचे व्यापारी गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी दिली. मानपाडा रस्त्यावरील लक्ष्मी निवास येथील क्रिटीकल केअर सेंटर यांचीही पालिकेकडे मालमत्ता कराची सात लाख १६ हजार ७४३ इतक रक्कम थकित होती. त्यांनाही पालिकेने वारंवार नोटिसा पाठवून कर भरणा करण्याची ताकीद दिली होती. त्यांनी ही रक्कम वेळेत भरणा केली नाही. त्यामुळे त्यांचे क्रिटीकल केअर सेंटर सील करण्यात आले, असे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले. पालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात आस्थापना सील करण्याच्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, मालमत्ता कर उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी, गोविंद पोटे, मोहम्मद खान यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. गेल्या दोन महिन्याच्या काळात पालिकेचा कर्मचारी वर्ग विधानसभा निवडणूक कामात व्यस्त होता. या कालावधीत मालमत्ता कराची अपेक्षित वसुली पालिकेला करता आली नाही. येत्या चार महिन्यावर पालिकेचा अर्थसंकल्प येऊन ठेपला आहे. मालमत्ता कराचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर विभागाला आता धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका संपताच प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. जे मालमत्ता कर थकबाकीदार आहेत त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कोट ‘ग’ प्रभाग हद्दीत काही मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. अशा धारकांना वारंवार नोटिसा देऊनही ते कर भरणा करत नाहीत. त्यामुळे अशा मालमत्ताकरधारकांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त देशपांडे यांच्या आदेशावरून सुरू केली आहे. ग प्रभाग हद्दीतील एकूण सहा आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. -संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.

रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद

भातसातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वितरणाचे नियोजन ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच, या दुरूस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. अशा एकूण सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवार, ०१ डिसेंबरपासून सुरू झाले असून या तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे ०५ डिसेंबरपर्यंत पाणी कपात करण्यात आली आहे. ही दुरूस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण ३० टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत, संपूर्ण महापालिका क्षेत्रास दररोज ३० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागवार स.९.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अशी आवाहन करण्यात आले आहे. दिनांक आणि पाणी पुरवठा बंद असणारे विभाग मंगळवार, ०३ डिसेंबर – माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली बुधवार, ०४ डिसेंबर – गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपूरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर १ व २, मैत्री पार्क गुरूवार, ०५ डिसेंबर – सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकूळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर शुक्रवार, ०६ डिसेंबर – दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर शनिवार, ०७ डिसेंबर – राबोडी १ व २, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर रविवार, ०८ डिसेंबर – लोकमान्य पाडा नं. १, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारूती रोड.

एसएनडीटी विद्यापीठात संविधान आणि शहीद दिन

नवी मुंबइ : एसएनडीटी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉँग लर्निंग अँड एक्स्टेन्शन आणि डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस आणि शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना विभाग संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले की, संविधान समजून घेऊन समाजसेवकांनी त्यातील आपली भूमिका ओळखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर त्यातून समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी योगदान कसे देता येईल, याबाबतही विचार केला पाहिजे. महिला तसेच उपेक्षित घटकांसाठीही विशेष कार्य करण्याची तळमळ अंगीकारली पाहिजे. सहाय्यक प्राध्यापक विकास जाधव यांनी सांगितले की, महिलांना समान संधी देताना त्यांचा चा राजकारणातीलदेखील सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, तुम्ही माझी मंदिरे बांधण्यापेक्षा माझा अनुनय करा, संविधानातील मूल्ये अंगीकृत करा, याची माहिती सहाय्यक प्राध्यापक डॉ. वाघमारे यांनी दिली. यावेळी विभागातील विद्यार्थीनींनीही मनोगत व्यक्त केले. काहींनी गीते गायली, कविता वाचन केले. याप्रसंगी संविधान प्रस्तावनेचे वाचनदेखील करण्यात आले. देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. 0000

पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी ८ डिसेंबरला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 8 डिसेंबरला उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन 1995 पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते. ठाणे महापालिका क्षेत्रात, एकूण 1278 बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे 2556 कर्मचारी कार्यरत असतील. गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात, 0 ते 05 या वयोगटातील 01 लाख 78 हजार 824 बालकांना लस देण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश :  आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेनं चंद्राबाबू नायडू यांच्याबाजुने कौल…