Category: होम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू

अहमदनगर जिल्हयातून रणशिंग फुंकणार…   मुंबई : ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. लोकसभेला कमी खासदार आले असले तरी विधानसभेला अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंबर कसली आहे. या राज्यव्यापी दौऱ्यातून पक्षाची दिशा आणि भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे स्पष्ट करणार आहेत.…

वंचितांचा नव्हे हा तर संचिताचा रंगमंच! – विजयराज बोधनकर

ठाणे : ठाणे शहरातील लोकवस्तीतील मुले वंचित नसून भाग्यवान आहेत कारण त्यांना व्यक्त होण्यास त्यांचा स्वतःचा अवकाश मिळाला आहे. गरिबीमुळे कच न खाता कष्ट करत आलेल्या संधीचे सोने करण्याची उर्जा त्यांना इथे सापडते आहे. त्यामुळे हा वंचितांचा नव्हे संचिताचा रंगमंच आहे, अशा शब्दात सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी विजयराज बोधनकर यांनी वंचितांच्या रंगमंचावरील मुलांची रंगतदार कामगिरी बघून गौरवोद्गार काढले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे  काशिनाथ घाणेकर मिनीथिएटरमध्ये आयोजित वंचितांचा रंगमंचाच्या दशकपूर्ती सोहोळ्यात ठाण्यातील विविध वस्तीतील युवांच्या, उल्हासात पार पडलेल्या युवा नाट्यजल्लोष मध्ये ते बोलत होते. वंचितांच्या रंगमंचाचे प्रणेते स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या स्मृतीस वंदन करून, साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीवर्षा निमित्त महाराष्ट्रात चालू असलेल्या साने गुरुजी १२५ अभियानांतर्गत नाट्यजल्लोषचे यंदा दहावे पर्व सादर झाले. या वेळेस मान्यवरांनी मुलांचे कौतुक करत त्यांना अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. नाट्यप्रशिक्षण शिबिर घेणाऱ्या थिएटर कोलाज च्या सुप्रसिद्ध प्रशिक्षक पल्लवी वाघ – केळकर मुलांच्या प्रयत्नांची प्रशंसा करुन म्हणाल्या की, इथे जगण्यातच संघर्ष आहे त्यामुळे खरे नाटक सापडते आणि मुलांच्या कलेला कसलीही भिंत नसते, भेद नसतो आणि मुलांच्या प्रगतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या वेळेस ‘दीवार म्हणजेच भिंत’ या विषयाच्या अनेक पैलूंवर आधारित नाटिका सादर झाल्या. डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ‘पाडू चलारे भिंत ही मध्ये आड येणारी’ हे गीत सादर करून थीमचं महत्व अधोरेखित केलं. ठाणे शहरातील विविध वस्तीतील युवांनी एकत्र येत ‘आधार’ ही नाटिका सादर केली. वेगवेगळ्या भिंती कशा दुःखितांच्या आधार बनतात हे नाटिकेतून प्रभावीपणे सादर केलं. अंबिका नगर गटाने ‘ ढ ची गोष्ट’ या नाटिकेत विद्यार्थी हुशार किंवा ढ असे नसतात. कुणी अभ्यासात तर कुणी खेळात तर कुणी कलेत हुशार असतात व अन्य कशात तरी ढ असतात. मित्रांनी एकमेकांना मदत करुन पाठबळ दिलं तर हुशार आणि ढ ही दीवार पाडली जाईल व ढ समजले जाणारे विद्यार्थी सुद्धा पास होतील हे विनोदी अंगाने छान सादर केलं. घणसोली गटाने ‘हे जीवन सुंदर आहे’ या नाटकात खेडेगावातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलीला अनेक अपमानास्पद वागणुकींना कसं सामोरं जावं लागतं व अशा वेळी नैराश्य येऊन आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत असताना तिची मैत्रीण तिला या विचारापासून कशी दूर नेते आणि तिच्यात कसा आत्मविश्वास निर्माण करते, हे अतिशय प्रभावी पद्धतीने दाखवलं. खारटन रोड गटाने ‘ आवाज उठाओ’ या नाटकात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धारिष्ट दाखवलं तर श्रीमंत आणि गरीब यातील भिंत पाडायला वेळ लागणार नाही हे उत्तम प्रकारे सादर केले. याच बरोबर एनॉक कोलियार याने निर्माण केलेली ‘मिरास’ आणि मयुर बने याने बनवलेली ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ या सुंदर शॉर्टफिल्म्स दाखवल्या गेल्या. वैष्णवी कारंडे आणि करीना साऊद यांनी कोळी नृत्य पेश केलं. राबोडी मधील अल्फिया, फलक, मुस्कान, शिफा या मुलींनी मुशायरा पेश करून प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमात समता विचार प्रसारक संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, एपिकॉन कंपनीचे चेअरमन जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मीनल उत्तुरकरांनी तर आभार प्रदर्शन हर्षलता कदम यांनी केले. वंचितांच्या रंगमंचाच्या संयोजिका हर्षदा बोरकर आणि एकलव्य कार्यकर्ता दर्शन पडवळ यांनी सुत्र संचालन केलं. लोकवस्तीतील युवांच्या नाटिका बघून त्यांचे कौतुक करण्यासाठी लघुपटकार डॉ. संतोष पाठारे, नाट्यजल्लोष ची आयोजक, प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, यू ट्युबर रवींद्र पोखरकर, जगदीश खैरालिया, सीमा साळुंखे, मयूरेश भडसावळे, टॅगचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांना सहाय्यक म्हणून सुनीता फडके, सुयश पुरोहित, विश्वनाथ चांदोरकर,नीलिमा सबनीस यांनी मदत केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लतिका सु. मो. , सुनिल दिवेकर, अजय भोसले, किशन सिंग बेदी, निलेश दंत आदींनी मेहनत घेतली. लोकवस्तीतील एकलव्य युवा दीपक, अक्षता, एंजेल, माही, मयुर, अनमोल, स्नेहा, साक्षी, प्रसन्न यांनी छान अभिनय केला. सृष्टी, ऋतुजा, कार्तिक, अथर्व, साक्षी, यशस्वी, हेमाली यांनी प्रभावी अभिनय करून प्रेक्षकांना हसवलं. नेहा, श्रद्धा, तेजस्वी, राधिका, सायली, सानिका, कार्तिकी, अस्मिता यांनी नाटिकेत सहभाग घेतला. किशन, अश्रफीय, एंजेल, रुद्र, टिया, निखिल, निकिता, दिव्या, प्रमिता यांनी छान कामे केली. 0000

लेट्स इमॅजिनचे वाडा, विक्रमगडमधील शाळांना पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई : जून महिन्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी लेट्स इमॅजिनने मॉर्गन स्टॅनलेतील कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने ( ग्लोबल व्हॉलंटरी मंथ या उपक्रमांतर्गत) वाडा आणि विक्रमगडमधील जिल्हा परिषदेच्या जवळपास 19 शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. लेट्स इमॅजिनच्या पूर्णिमा नार्वेकर, मिहीर नागदा, कानन गोराडिया तसेच मॉर्गन स्टॅनलेच्या कर्मचारी प्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. मुलांप्रमाणे शिक्षकांनाही उपयोगी असे साहित्य देण्यात आले.  पूर्णिमा नार्वेकर यांनी सांगितले की गेल्या 2 वर्षांपासून शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम लेट्स इमॅजिन करते आहे.

मुंबई शहराची जिल्हास्तरीय पंच परीक्षा ३० जूनला

मुंबई : मुंबई शहर कबड्डी असो. च्या विद्यमाने रविवार दिनांक ३० जून २०२४ रोजी जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. या पंच परीक्षेकरीता सोमवार दिनांक २४ जून पासून मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. तरी जिल्हा संघटनेला संलग्न असलेल्या संघाच्या ज्या सदस्यांना ही परीक्षा द्यावयाची असेल त्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पूर्ण भरून प्रवेश शुल्कसह शनि. दिनांक २२ जून पर्यंत कार्यालयात जमा करावेत. अधिक माहितीकरिता पंच समितीचे अध्यक्ष महेंद्र हळदणकर(९८६९८७८५८१) किंवा सचिव सूर्यकांत देसाई (९८६९००३२२८) यांच्याशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे एका परिपत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी असो. ने प्रसार माध्यमांना कळविले आहे.

विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही  – श्रीरंग बारणे

पनवेल : लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी निश्चित विजयी होतील, असा दावा मावळ लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे रविवारी आपल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केला. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे, भाजप उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उप जिल्हाप्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲड. प्रकाश बिनेदार, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी,  माजी नगरसेवक रमेश गुडेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, भाजप, आरपीआय, मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलताना या निवडणुकीत आपण प्रामाणिक प्रयत्न केले, पण मतदारात गैरसमज निर्माण करून देण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला. संविधान बदलणार म्हणून सांगितले. आता केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे. संविधानात कोणताही बदल होणार नाही हे लोकांना समजेल. यापूर्वी काम करताना काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी सकारात्मक विचार करून गावा-गावात जाऊन लोकांचे गैरसमज दूर करा. कोकण पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे यांना मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार यापेक्षा मोठा भव्य दिव्य व्हावा, अशी आपली इच्छा होती. देशात आपले सरकार आले आहे, मग आपल्यात उत्साह का नाही? गुपचुप का राहण्याचे काही कारण नाही उत्साहाने काम केले पाहिजे. आपण कोठे कमी पडलो याचा अभ्यास करायचा आणि संरक्षणात्मक भूमिका न घेता आक्रमक भूमिका घ्यायची आहे. इथले प्रश्न घेऊन लोकांच्यात जाऊ म्हणजे लोक आपल्याबरोबर येतील. स्टेजवर भाषण करण्यापेक्षा गावागावात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवूया. विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ या असे सांगून त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्याचे कौतुक केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, महायुतीतल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीमध्ये आप्पांचा विजय साध्य करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन व मनापासून धन्यवाद. या देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने 2014 सालापासून या देशाच्या विकासासाठी काम केले त्याला देशातल्या जनतेने कौल दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार लागोपाठ तिसर्‍यांदा बहुमताने या ठिकाणी सत्तेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचेसुद्धा आपण मनापासून अभिनंदन करूया. या मतदारसंघाचे खासदार म्हणून आप्पांनी गेल्या दहा वर्षांमध्ये सातत्याने या मतदार संघाचे विषय हेरी संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलेले आहेत. आप्पांनी नवी मुंबई विमानतळ नामांतराचा प्रश्न, सिडकोतील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, विमानतळामुळे येणारे प्रकल्प व त्यावर आधारित प्रशिक्षण येथील प्रकल्पग्रस्तांना देणे, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडून मिळणारा निधी, पनवेल रेल्वे स्टेशनच्या प्रश्नांकडे खासदार श्रीरंग बारणे यांनी लक्ष वेधले आहे. आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, आप्पा आपल्या या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि आम्ही जो शब्द दिला होता तो पाळला. तुम्ही तिसर्‍यांदा खासदार झालात सर्वप्रथम मनःपूर्वक तुमचा अभिनंदन. आप्पा उरण आणि पनवेलला आपण केंद्राकडून भरपूर आणले आहे. त्यामुळेच आपण विधानसभेला मोठ्या मताधिक्याने आपणच निवडून येणार अशी खात्री व्यक्त केली. या वेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी बोलताना महायुतीला लोकसभेला जरी अपेक्षित यश भेटले नाही तरीही महायुतीचा कार्यकर्ता हा कुठेही खचला नाही. ताकतीने सातत्याने लढण्याची भूमिका ठेवत. प्रत्येक निवडणूक येत्या काळामध्ये आपल्याला ताकतीने लढायची आहे. या पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली आणि त्याच अनुषंगाने येणार्‍या 26 तारखेला आपली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदार संघ ठाणे जिल्हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर म्हणजे चांदा ते बांदा असा हा मतदार संघ आहे आणि या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदान हा आपल्याला मतदानासाठी नेण्याची यंत्रणा ही सातत्याने पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमांनी आपण लावत चाललोय. आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आहे. येत्या 26 तारखेला मतदार काढण्याच्या संदर्भातली विनंती करतोय. सर्व मतदारांपर्यंत संदेश जाणे गरजेचे आहे. मतदान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ईव्हीएमची मशीन येते आणि त्याच्यामुळे मतदाराच्या लक्षात येत असते की आपल्याला बटन दाबून मतदान करायचेय तर त्याला सांगायचे की यावेळेस बॅलेट पेपर आहे. 26 तारखेला पाऊसही भरपूर असेल आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या मतदारांपर्यंत पोहाचवून त्याचे मतदान निश्चित करायचे आहे. मतदानाचे नियोजन आणि वेळ हे ठरवून आपण सगळ्यांनी या पद्धतीचे नियोजन 26 तारखेला करावे, अशी विनंती निरंजन डावखरे यांनी केली. 0000

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा २२ जूनला युवा संगीत महोत्सव

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार दिनांक २२ जून २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता युवा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रीती ठाकोरभाई देसाई यांच्या…

 पदवीधर मतदारसंघातून अमोल जगताप यांची उमेदवारी मागे

निरंजन डावखरे यांना पाठिंबा देत कोचिंग क्लासेस संघटनेची माघार ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन वसंत डावखरे यांना वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेही उमेदवार अमोल जगताप यांची उमेदवारी माघारी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी ठाण्यात झालेल्या सभेत कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख व सचिव अॅड. सचिन सरोदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार डावखरे यांना पाठिंबा असल्याचे पत्र प्रदान केले. तसेच त्यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याची ग्वाही दिली. 00000

कळंबोली ठरणार सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे केंद्र

प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन संपन्न   पनवेल : कळंबोली मध्ये वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणाऱ्या संस्थेची फ्रॅंचाईजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.जगतकर्ता इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणाऱ्यांकरता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथराईज फ्रेंचायसी पार्टनर आहेत. या शोरूमचे उद्घाटन काल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्यांनी जगतकर्ता इंडस्ट्रीजचे संचालकांना यशस्वी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या तसेच पुनर्वापर युक्त आणि हरित ऊर्जा वापराच्या प्रक्रियेमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. उद्घाटनानंतर आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणातून ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून पुनर्वापर योग्य ऊर्जा आणि हरित ऊर्जा वापरण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या ऊर्जेच्या वापरामुळे ग्राहकांच्या खिशावरचा भार देखील हलका होणार आहे. सौर ऊर्जा व अन्य हरित ऊर्जा यांचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न करत आहेत. फार्म हाऊस, मोकळ्या जागा, इमारतीवरील जागा या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया कार्यान्वित केल्यास घरोघरी वीज निर्मिती केंद्र उघडले जाऊ शकतील. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यामध्ये एक करोड पेक्षा जास्त नागरिक अशा स्वरूपाची घरोघरी ऊर्जा केंद्र निर्मिती करण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे वीज निर्मिती केल्यास सध्या वीज निर्मितीसाठी लागणारे कोळसा, इंधन यांची देखील बचत होण्यास फार मोठी मदत होईल.जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून वारी यांचे सौर ऊर्जा निर्मिती साहित्य पनवेल परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी कंपनीचे तसेच त्यांचे संस्थापक संचालक नागेंद्रसिंग आणि आशिष सिंग यांचे आभार मानतो. संचालक आशिष सिंग म्हणाले की सौर ऊर्जा वापर हा ऑन ग्रीड अँड ऑफ ग्रिड प्रकारचा असतो. आम्ही ऑन ग्रीड प्रकारची सौर ऊर्जा निर्माण करण्यावर भर देत आहोत. वास्तविक सौर ऊर्जा निर्मिती करणे सोपे आहे परंतु ही ऊर्जा साठवून ठेवणे अत्यंत कठीण असते. निर्माण केलेली अतिरिक्त सौर ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी केंद्र सरकार मदत करते. साधारण ऊर्जा वापराची मोजतात करण्याकरता वन-वे मीटर असतात. परंतु या सौर ऊर्जा प्रकारात दिल्या जाणाऱ्या आणि घेतल्या जाणाऱ्या विजेची मोजदाद करण्याचे प्रावधान असते. यामध्ये तुम्ही निर्माण केलेल्या विजेतील अतिरिक्त वीज सरकार कडे जमा होते.सरकारकडून तुमच्या गरजेच्या वेळी ही वीज तुम्हाला परत केली जाते.पुन्हा दिल्या जाणाऱ्या विजेची मोजदाद करण्यासाठी नेट मीटर असतात. त्यामुळे ही ऊर्जा पर्यावरण पूरक आहे आणि तुमच्या सध्याच्या विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत करणारे देखील आहे. या उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत जगतकर्ता इंडस्ट्रीज चे संस्थापक संचालक नागेंद्र सिंग, आशिष सिंग, शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, पम पाचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील,”वारी” चे फ्रॅंचाईजी मॅनेजर राजेश लाटे, ॲड. रमेश त्रिपाठी, अविनाश पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा, भाजपचे कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 00000

देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं-नरेश म्हस्के

ठाणे : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. यात महायुतीकडून कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरेंना उमेदवारी मिळाली आहे. परंतु तत्पूर्वी मनसेनं अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची द्विधा मनस्थिती झाली होती. निरंजन डावखरे यांच्या प्रचारावेळी म्हस्केंनी बैठकीत हा किस्सा सांगितला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी या संकटातून वाचलो असंही म्हस्के यांनी सांगितले. खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, खासदारकीच्या निवडणुकीत अवघ्या १२ दिवसांत मला महायुतीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत करून निवडून आणलं. खासदारकीनंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक लागली. निरंजन डावखरेंसोबत आमची चर्चा सुरू होती. कसं नियोजन करायचे, त्यात अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सगळ्यात पहिला माझ्या पोटात गोळा आला. अभिजीत पानसे, निरंजन डावखरे हे दोघेही माझे मित्र. दोघांनीही निवडणुकीत प्रचंड काम केले आहे. निकाल लागून ५-६ दिवस झालेले, त्यात सगळे पत्रकार या दोघांना सोडून माझ्यामागे लागले होते. त्यावेळी मी फोन बंद केला आणि नाशिकला पळून गेलो. उत्तर काय देणार? असं त्यांनी सांगितले. तसेच निरंजन डावखरेला योग्य म्हटलं तर अभिजीतला राग येणार, अभिजीतला योग्य म्हटलं तर निरंजनला राग येणार, मी रवींद्र चव्हाणांना फोन केला, हे मिटवा लवकर…मी रोज निरंजनला फोन करायचो, हा विषय लवकर संपव, फडणवीस साहेबांना सांग..एकदा अभिजीतला फोन करून त्याचे मत परिवर्तन होतं का हे पाहिले. किती नोंदणी केली आहेस, निरंजनपेक्षा पुढचा आकडा अभिजीतनं सांगितला. मी म्हटलं आता वाटोळं झालं, करायचं काय..फडणवीस यांनी मला या सगळ्यात मोठ्या संकटातून वाचवलं असं खासदार म्हस्केंनी म्हटलं. त्याशिवाय महायुती म्हणून निरंजनचं काम करायचं आहे पण महायुतीत अभिजीत पानसेही आहेत. निरंजनचं काम केल्यानंतर अभिजीत पानसे मला गद्दार, ऐहसान फरामोश म्हणणार, अभिजीत लहानपणापासून मित्र आहे, या निवडणुकीत अभिजीतनं माझ्या प्रचाराचं डिझाईन करायचे काम केले. अविनाश जाधवचा चेहरा आठवला. आता करायचे काय, परंतु केवळ फडणवीसांनी भूमिका घेतली आणि अतिशय सलोख्याने आज आपण महायुतीत बसलो आहोत. निरंजन डावखरेंचा विजय निश्चित आहे. विरोधकांचा उमेदवार कोण, तेदेखील कोणाला माहिती नाही असं नरेश म्हस्के म्हणाले. दरम्यान, बऱ्याच जणांना ही निवडणूक माहिती नाही. पक्षाच्या वतीने त्या त्या विभागातील पदवीधरांची यादी दिली जाईल. पदवीधरांशी संपर्क करा, वेळ पालून त्यांच्याशी संपर्क साधा. पक्षाचे पदाधिकारी, विभागप्रमुख, नगरसेवक यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. निरंजन डावखरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. 00000

भिवंडीत मुस्लिम बांधवांकडून बकरी ईदनिमित्त नमाज पठण

भिवंडी: जगभरातील मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा कुर्बानीचा सण सोमवारी शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध मशिदी व मदरशांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी बकरा ईदची नमाज अदा केली. भिवंडी शहरातील असलेल्या कोटरगेट, दिवानशहा दरगाह, आसबीबी, मामूभांजा, चांद तारासहित अनेक मशीदींमध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या ईद सणानिमित्त पोलिसांच्यावतीने कोटरगेट मशीद येथे मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भिवंडी महापालिकेच्यावतीने कुर्बानी सेंटर तयार करण्यात आलेल्या ठिकाणी बकरा आणि रेड्याची कुर्बानी देण्यात आली. तर दुसरीकडे अखंडता कायम टिकून राहावी यासाठी मुस्लिम बांधवांसह सर्वच जातीधर्माच्या नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले. 00000