Category: होम

सब ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

मुंबई : ४६ वी सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २८ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान जीवन दीप शिक्षण संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १५ खेळाडू आणि २ व्यवस्थापक असा एकंदर १७ जणांचा चमू वाराणसी येथे रवाना झाला असून संघातील खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे वातानुकूलित रेल्वे प्रवास व्यवस्था, २ सेट गणवेश व प्रत्येकी रुपये १,०००/= प्रवास भत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे १४ वर्षा खालील ( सब ज्युनिअर गट ) मुले : आयुष गरुड, रुद्र गवारे, वेदांत राणे, द्रोण हजारे, ध्रुव भालेराव, प्रसाद माने १२ वर्षां खालील ( कॅडेट गट ) मुले : नील म्हात्रे, अनंत जैन ( नंदू सोनावणे, संघ व्यवस्थापक ) १४ वर्षा खालील ( सब जुनिअर गट ) मुली : तनया पाटील, स्वरा मोहिरे, पूर्वा केतकर, स्वरा कदम, जिशा आसलडेकर १२ वर्षा खालील ( कॅडेट गट ) मुली : दुर्गेश्वरी धोंगडे, निधी सप्रे ( माधवी आसलडेकर, संघ व्यवस्थापक ) अरुण केदार मानद सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन

रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबतीत राकेश कोकळे यांचे प्रशासकांना निवेदन

माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्स्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे किरकोळ अपघात घडत असतात याकामी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक राहुल इंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. एमएमआरडीए च्या माध्यमातून जवळपास चाळीस कोटी रुपये खर्च करून दस्तुरी पासून माथेरान गावांपर्यंत पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले होते परंतु अत्यंत घाईगडबडीत ही कामे उरकण्यात आली होती. आणलेले ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कच्चे ब्लॉक होते ते झिजून गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना तसेच पर्यटक, हातरीक्षा, घोडेवाल्याना खूपच त्रासदायक ठरत असून या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. पुढील दोन महिने सुट्टयांचा हंगाम येत असून खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी लवकरच ही कामे पूर्ण करून घ्यावीत असे राकेश कोकळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येईल असे उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले.

कौटुंबिक सोहळ्यात मिळालेले प्रेम पाहून डी. के. पाटील भारावले

ज्ञानेश्वर पाटील यांना मिळालेली रयत शिक्षण संस्थेचे कुबेर ही उपमा कौतुकास्पद राज भंडारी पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज या विद्यालयात वरिष्ठ लेखनिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ दि. २७ मार्च रोजी जासई येथे संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या जासई विद्यालयात त्यांना विद्यालयाच्यावतीने सर्व सेवकांकडून सपत्नीक सन्मान करण्यात आला. सायंकाळी त्यांच्या कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्र मंडळींकडून घरगुती सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक नेते दा.चां.कडू गुरुजी सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित  होते. पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी याठिकाणी उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याची सुरुवात ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवापूर्तीतील ३६ वर्षे त्यांच्या संघर्षाची कहाणी उपस्थितांसमोर कथित करण्यात आली. शिक्षक नेते दा.चां.कडू यांनी ज्ञानेश्वर पाटील यांची सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा आदी बाबी निदर्शनास आणताना नात्यापेक्षा आपल्या बरोबर त्यांनी जपलेले स्नेहसंबंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ  असल्याचे  गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती भावूक झाले होते. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी आपल्या प्रामाणिक सेवेच्या घडामोडी कथन केला. यावेळी दा.चां.कडू गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवेतील अनेक ठिकाणांच्या शैक्षणिक सेवांना उजाळा दिला. ज्ञानेश्वर पाटील यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर पाटील यांच्या आजोबांनी रयत शिक्षण संस्थेला जासई शाळेसाठी एक एकर जागा बक्षीस रूपाने दिली होती. ज्ञानेश्वर पाटील हे बीएससी झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने एक एकर जागेची जाणीव ठेवत ज्ञानेश्वर पाटील यांच्या शिक्षणाची दखल घेवून त्यांना  आपल्या शिक्षण संस्थेत रुजू करून घेतले. सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि प्रामाणिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांना संस्थेने सहाय्यक लेखनिक पदाची जबाबदारी सोपविली. सुरुवातीला उरण तालुक्यातील गव्हाण येथील शाळेत सेवा दिल्यानंतर त्यांची पोलादपूर तालुक्यातील तुर्भे आणि नंतर पैठण याठिकाणी बदली झाली. त्यानंतर महाड तालुक्यातील विन्हेरे येथे देखील त्यांनी सेवा केली. नंतर मात्र संस्थेने त्यांना त्यांच्या घराजवळ पनवेल तालुक्यातील रिटघर नंतर दापोली – पारगाव येथे बदली केली. रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या प्रामाणिक कामाची पोहोच म्हणून एक अनोखी भेट रयत शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांना देण्यात आली. आजोबांनी बक्षिसी रूपाने दिलेल्या एक एकर जागेत वसलेल्या शाळेतच त्यांची बदली ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. या सर्वच शाळेतील त्यांच्या कामावर रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ नेहमीच खुश राहत. कारणही तसेच होते, या सर्व प्रवासादरम्यान ते मुख्य लेखनिक या पदावर काम करीत असताना शाळेच्या व्यवहारात कोणताही अपहार ना त्यांनी केला ना त्यांच्यामार्फत कोणाला करू दिला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ते कुबेर म्हणून त्यांना शाळेत संबोधले जावू लागले. कुबेर ही उपमा ज्ञानेश्वर पाटील यांना मिळणे ही बाब मुळात कौतुकास्पद असल्याचे दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले. दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले की, मला सेवानिवृत्त होऊन २७ वर्षे झाली. मी आजही निरोगी आहे. सध्या माझे वय ८७ वर्षांचे आहे. आपण दररोज घरातील किरकोळ कामे स्वतः करीत असतो. ज्ञानेश्वर पाटील यांनीही घरातील परिसरातील छोटीमोठी कामे करून आपले शरीर सुदृढ ठेवावे. त्यांच्या अर्धांगिनी वनिता पाटील, बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेले त्यांचे चिरंजीव आदित्य पाटील, स्नुषा अवंतिका आणि धा.चिरंजीव केतन पाटील यांची भरभक्कम साथ असल्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांचे उर्वरित आयुष्यही आनंदात जाईल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.

तुकाराम बीजनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील कोपर येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. या यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, माजी उपसरपंच विजय घरत, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नालेसफाईची कामे १५ एप्रिलपासून सुरू करण्यात यावीत

आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा ठाणे : नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले. या बैठकीत, नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, १५ एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील ८६ अती धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही श्री. राव यांनी स्पष्ट केले. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे. त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अती धोकादायक इमारतीत रहिवासी रहात असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टीकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, असेही श्री. राव यांनी सांगितले. अती धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी, इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात, याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्त श्री. राव यांनी केली. वंदना एसटी स्टॅण्डसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आप्तकालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. आपत्कालीन कक्षाला भेट बैठकीनंतर, ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसेच, मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आप्तकालीन कक्षात असावेत, असे आयुक्त श्री. राव म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिली. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तिव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. टीडीआरएफची केली पाहणी हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिरालाही आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले. डाटा सेंटरचा वापर वाढवावा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अदययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली. हे सेंटर अद्ययावत आहे. त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीचा अर्लट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या भेटीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते. 00000  

ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो ?

राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाने काढले परांजपे-मुल्लांचे वाभाडे अनिल ठाणेकर ठाणे : आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे-मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पीटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? , याचे उत्तर परांजपे-मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई,  युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले. जो नाही झाला बापाचा; जो नाही झाला ठाकरे-शिंदेंचा; जो नाही झाला आव्हाडांचा , तो काय होणार अजित पवारांचा? , असा सवाल करीत सुहास देसाई म्हणाले की, आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्व नाही. त्यामुळेच ते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूठ टीका करून महत्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण,  पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे सबंध ठाण्याला माहित आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत सबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसेकाय सांगितले होते? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इसमाला कोणी दिली होती?  कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्क॔टाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा ! कार्यालयातील खाणं-पिणं, टिपटाॅपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे. तेव्हा याच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला. विक्रम खामकर यांनी, गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार यांच्या बंगल्यावर नेली होती. पण, त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचीतसा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किमंत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका केली. तर , रचना वैद्य यांनी, रिकाम्या भांड्याचा मोठा आवाज येत असतो. आनंद परांजपे हे असेच रिकामे भांडे आहे. ठाण्यातील स्वतःचे नाव उंच करण्यासाठी परांजपे हे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करीत आहेत. पण, त्यांना त्यांचेच लोक गांभीर्यपूर्वक घेत नाहीत, हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग,  विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे आदी उपस्थित होते.

संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ठाणे मुक्ती दिन’ साजरा

ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ‘ठाणे मुक्ती दिन’ मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे वर्ष १० वर्ष होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत आलुगडे, संगीता  श्री. सीताराम राणे, परिवहन सदस्य श्री. विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळाली होती. या जाचातून सोडविण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोरतुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढरे, अंजूर चे नाईक यांनी पराक्रम गाजवाला. अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला.तर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ऑस्ट्रेलियन नागरिकाला होरायझन हॉस्पिटलने दिले जीवदान

श्वास घेणेही झाले होते कठीण, मित्रही आला धावून; दाखविले माणुसकीचे दर्शन नितिन दूधसागर ठाणे : भारतीय वंशाचा 49 वर्षीय ऑस्टेलियन नागरिक ठाण्यात सासूला भेटण्यासाठी भारतात आला.  मात्र निमित्त झाले खोकल्याचे आणि अचानक त्यांची प्रकृती खालावून श्वासही घेणे कठीण झाले. संसर्गजन्य आजाराने त्रस्त झालेल्या या रुग्णाला तातडीने नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. होरायझन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपचार करुन शर्थीच्या प्रयत्नांनी जीवदान दिले आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक हे 16 फेब्रुवारी 2024 रोजी बाळकुम, ठाणे येथे राहणाऱया त्यांच्या सासूला भेटण्यासाठी भारत भेटीवर आले. भारतात आल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांना खोकला आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला. छातीत किरकोळ जळजळ आणि संसर्ग आहे असे समजून त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडून खोकला आणि अशक्तपणावर उपचार सुरू केले. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनतर खोकल्यावर थोडीशी रक्ताची थुंकी दिसल्यानंतर ते अधिक चिंतेत पडले. हळूहळू त्यांना अधिक अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऑस्ट्रेलियात असलेल्या आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. तिने ताबडतोब भारतातील आपल्या डॉक्टर मित्राशी बोलणे पेले. त्यांना 28 फेब्रुवारी 2024 रोजी ठाण्यातील नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट आणि वैद्यकीय संचालक यांच्या ओळखीच्या एका फिजिशियनमार्फत होरायझन रुग्णालयात आणले. रुग्णालयात दाखल होताच त्यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. खोलीच्या हवेत ऑक्सिजन सॅच्युरेशन 65 टक्के पर्यंत ऑक्सिजन सॅच्युरेशनसह ऊर्जेची कमतरता होती. त्यांना तातडीने एनआयव्हीसपोर्ट देण्यात आला. सखोल तपासणीनंतर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दुसऱयाच दिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी 2024 रोजी रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे व श्वसनदर व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.  व्हेंटिलेटरचा आधार असूनही त्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि श्वसनात सुधारणा झाली नाही; हे प्राथमिक फुफ्फुस निकामी होण्याचे सूचक होते. जीवरक्षक उपाय म्हणून ईसीएमओ प्रक्रियेची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत घेण्यात आले आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि समुपदेशन करण्यात आले. आवश्यक प्रक्रिया आणि वैद्यकीय व्यवस्थापनासह ईसीएमओ थेरपी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण टीमसाठी तिथला प्रवास खडतर होता. संपूर्ण आयसीयू परिचारिकांच्या कठोर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी डॉक्टर हृषीकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परफ्युजनिस्ट, ईसीएमओ थेरपी या महत्त्वाच्या निकषांचे दैनंदिन निरीक्षण तसेच पल्मोनोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ञ, ईएनटी सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट यांचा संपूर्ण प्रवासात सहभाग होता. रूग्णामध्ये सुधारणा दिसू लागल्यावर 7 मार्च 2024 रोजी ईसीएमओ थांबविण्यात आला. धमनी लाइन काढून टाकण्यात आली. टीटी ट्यूब काढून टाकण्यात आली. रुग्णाने संपूर्ण थेरपीला चांगला प्रतिसाद दिला आणि 11 मार्च 2024 पर्यंत आपली स्थिती पूर्णपणे परत मिळवली. या सर्व प्रक्रियेत रुग्णाचा मित्र वेळेत धावून आला आणि आपल्या माणुसकीचे दर्शन दिले. तर अत्याधुनिक सामुग्री आणि योग्य उपचार तसेच देवाच्या कृपेने आज रुग्ण ऑस्ट्रेलीयाला जाण्यास सज्ज असल्याचे डॉक्टर हृषीकेश वैद्य यांनी सांगितले.

छञपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले मुंबई यांच्या तर्फे जुहू समुद्र किनारी  असणाऱ्या  मुंबईचे माजी महापौर/माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू  यांच्या पुढाकाराने बांधलेल्या  छञपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प समूहाला  पुष्पहार अर्पण करताना  समितीचे सचिव डॉ. मोहन अनंत राणे, विश्वस्त राजू रावळ, मकरंद येडुरकर,   डॉ. चैतन्य बढे, अविनाश गुजर,  राजेश घाग चंद्रकांत  तांबे  पवन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘गडकोटांचे संवर्धन व्हायला हवे, आज ते तग धरुन आहेत उद्या ते दिसणारच नाही’ – हमीदा खान

ठाणे : गडकोटांमुळे इतिहासाबदद्लचा आदर निर्माण होतो, तसेच, इतिहासाची माहिती मिळते. नुसती भटकंती न करता आपण त्याचा अभ्यास करु लागतो असे मत गडरागिणी हमिदा खान यांनी व्यक्त केले. गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे. आज ते तग धरुन आहे, उद्या ते दिसणारच नाही. त्यामुळे आजच त्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे कळकळीचे आवाहन हमिदा यांनी केले. शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वतर्फे श्री शिवराज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्रयोदशी (तिथी नुसार) ३५०वे वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ६५० किल्ले सर करणाऱ्या दुर्गकन्या हमिदा यांची “शिवाजीमहाराजांच्या गड-दुर्गांची भ्रमंती” याविषयावर शिवकालीन नाणी संग्राहक, अभ्यासक प्रशांत ठोसर यांनी मुलाखत घेतली. हमिदा यांनी ६५० किल्ले सर करताना आलेले अनुभव, अडचणी, मित्रांकडून मिळालेली प्रेरणा हे सांगत आप्पा परब यांनी दिलेले प्रोत्साहन याचा प्रवास उलगडला. माझी गड कोटांची सुरूवात १९९० साली रायगड पासून झाली खरी पण १९९८ साली रायगडला पुन्हा भेट दिल्यावर आप्पांनी रायगडच्या इतिहासाचा खडान खडा सांगितला त्यावेळी सगळेच गडकोट बघण्याचा निश्चय केला आणि १९९९ साली मी एका वर्षात १०० किल्ले सर केले. आप्पांनी गडकोटांची माहिती दिली नसती तर गडकोटांची भटकंती झाली नसती असे त्यांनी आवर्जुन नमूद केले. छत्रपती शिवरायांचे ३५० किल्ले पार करायला औरंगजेबला किती वेळ लागला असता हे त्यांचे किल्ले पाहिल्यावरच अनुभूती येते. सह्य्ाद्रीतील गडकोट ही आपली दौलत आहे अशी सह्याद्री आपल्याला लाभली याचा मला अभिमान आहे. स्वराज्याची दौलतच हे गडकोट आहेत. या गडकोटांमुळेच महाराजांना स्वराज्य जिंकता आले आहे. महाराजांचे हे गडकिल्लेच स्वराज्याचे साक्षीदार आहेत. काही किल्ले तग धरुन आहेत, काही नामशेष होत आहेत तर काहींचा शोध लागत आहे. नामशेष झालेल्.ा गडकोटांच्या चिराही आपल्यासाठी पूजनीय आहेत. काही किल्ल्यांमध्ये तर चक्क गाव वसले आहे त्यामुळे गडकोटांच्या खाणाखुणा शोधाव्या लागत आहेत पण त्या दिसल्या तरी महाराजांची प्रचिती येते अशा भावना हमीदा यांनी व्यक्त केल्या. सर्वांत आवडता किल्ला कोणता हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, रायगडा हा किल्ला मला अतिप्रिय आहे कारण त्यावर माझ्या राजांचा वास होता. शिवरायांच्या गडकोटांचे वैशिष्ट्य वेगळे आहे त्यामुळे एका किल्लयाची दुसऱ्या किल्ल्यासोबत तुलना करुच शकतन नाही असेही त्या म्हणाल्या. रायगड ही ट्रेकर्स मंडळीची पंढरी आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात तिथीच्या दिवशी ममहाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यादिवशी महाराज सििंहासनाधिश्वर झाले. या क्षणाचा रायगड हा साक्ष आहे. म्हणून ट्रेकर्स हे रायगडावर जाऊन, महाराजांना मुजरा करुन पुढची वाटचाल करत असल्याचे हमीदा यांनी शेवटी सांगितले.