38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25
राष्ट्रीय विक्रमासह वैष्णव ठाकूरची रूपेरी कामगिरी डेहराडून : महाराष्ट्राच्या वैष्णव ठाकूर या २३ वर्षीय खेळाडूने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली राजगुरुनगर तालुक्यातील ठाकूर पिंपरी या गावचा खेळाडू वैष्णव याने पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटातील स्नॅचमध्ये १६० किलो वजन उचलले आणि गत वेळी जगदीश विश्वकर्मा याने नोंदविलेला १५७ किलोचा विक्रम मोडला. स्नॅचमध्ये वैष्णवने आघाडी घेतली होती. मात्र, क्लीन व जर्कमध्ये त्याला १७५ किलो उचलता आले. एकूण त्याने ३३५ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. विश्वकर्मा याने येथे स्नॅचमध्ये १५२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १९३ किलो असे एकूण ३४५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. वैष्णव हा वडगाव मावळ येथे ज्येष्ठ प्रशिक्षक अनिकेत नवघणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्षे प्रशिक्षण घेत आहे. गतवर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अगोदर गुडघ्याची शीर तुटल्यामुळे त्याला स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. त्यानंतर गेले तीन महिने त्याने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली होती. आजपर्यंत त्याने वरिष्ठ व कनिष्ठ या दोन्ही गटात मिळून चार सुवर्णपदकांसह सात पदके जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेतही त्याने सोनेरी कामगिरी केली होती. त्याचे वडील शेतकरी असून, वैष्णव हा राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे.