Category: ठाणे

Thane news

ठामपाचे सुका कचरा संकलनासाठी केंद्रे सुरु, प्रक्रिया करून होणार पुनर्निर्माण – मनीष जोशी

अनिल ठाणेकर ठाणे महानगरपालिकेले स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या मोहिमेत पुनर्निर्माण अभियान हाती घेतले आहे. या अभियानात दीपावलीत जमा होणारा सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संकलन केंद्रे सुरू केली आहेत. ही संकलन केंद्रे सहा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. या उपक्रमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणेकर नागरिक स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यशस्वी होतील असा, विश्वास उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीच्या काळात शहर स्वच्छ राहावे, तसेच, निर्माण झालेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, असा या पुनर्निर्माण अभियानाचा उद्देश आहे. दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भेटवस्तूंसह इतर प्रकारची खरेदी होते. त्यामुळे इतर दिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यासोबतच दिवाळी सणाच्या काळात जास्तीचा सुका कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचे ठाणे महानगरपालिकेने ठरवले आहे. या अभियानासाठी महापालिका क्षेत्रात, परिसर भगिनी (स्त्री मुक्ती संघटना), समर्थ भारत व्यासपीठ, ऑंटी प्लास्टिक ब्रिगेड या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. हिरानंदानी इस्टेट, भूमी एकर, लोढा अमारा, हिरानंदानी वन, दोस्ती इम्पेरिया, सिद्धाचल, हिरानंदानी मेडोज या मोठ्या गृहसंकुलांसोबत, डी मार्ट टिकुजीनी वाडी येथेही सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे दररोज सुमारे ३० हजार घरापर्यंत हे अभियान पोहचवण्यात येईल. या काळात सुमारे २५० टन सुका कचरा गोळा होईल, असा अंदाज आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नितीन कंपनी उड्डाणपुलाखालील मुख्य संकलन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबतची माहिती घेतली. तसेच, स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या संकलन केंद्रांवर सुका कचरा जमा करावा. त्यामुळे, स्वच्छता राखली जाईल आणि सुक्या कचऱ्यातून पुनर्निर्माण करणे शक्य होईल, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले. तत्पूर्वी, संकलन केंद्रांमधील कचरा एकत्र केला जाणार असलेल्या मुख्य संकलन केंद्राचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते नागरिकांनी सुका आणि ओला कचरा याचे वर्गीकरण करून, सुका कचरा महापालिकेच्या या संकलन केंद्रात किंवा प्रभाग समिती कार्यालयात असलेल्या ‘आर आर आर’ केंद्रात द्यावा. या उपक्रमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणेकर नागरिक स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यशस्वी होतील असा, विश्वास उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे ३१ ऑक्टोबर रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी  यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता…

भाजप उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांना मातृशोक

ठाणे: ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या मातोश्री अनुराधा मुरलीधर मढवी यांचे बुधवारी रात्री  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्या ८२ वर्षाच्या होत्या. भाजपच्या मा.नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी…

सुतिकागृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पनवेलसाठी वरदान-अ‍ॅड. यशवंत भोपी

अशोक गायकवाड पनवेल : सुतिकागृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा दवाखाना पनवेलकरांसाठी वरदान ठरत आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळत आहे अशी माहिती अ‍ॅड. यशवंत भोपी यांनी दिली. आजच्या धकाधकीच्या जीवनात दवाखाना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यात सर्व सुविधायुक्त,स्वच्छ,उत्तम निदान होणारे व परवडणारे असे दवाखाने लाभणे ही दुर्मिळ गोष्ट बनलेली आहे. अशा युगात पनवेलकरांना सर्व आरोग्य सुविधा देणारा सुतिकागृह दवाखाना नव्या रूपात सुसज्ज इमारतीमध्ये चालू झालेला असून तिथे सुतिकागृहासह अनेक रोगांवर उत्तम प्रकाराने सज्ज असे शुश्रुषा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झालेले आहे. अलीकडेच या दवाखान्याची नवीन वास्तू आपल्या सेवेसाठी कार्यान्वित झालेली असून या ठिकाणी आयसीयू पासून लॅप्रोस्कोपी सारख्या अनेक रोगांवर उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वीच्या( जुने पोस्ट ऑफिस पनवेल )जवळ सुतीकागृह म्हणून नावाजलेल्या या दवाखान्यास यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या रूपात साकार झालेला हा दवाखाना दोनच वर्षात पनवेलकरांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. या दवाखान्यात दोन नातेवाईकांना उपचारासाठी घेऊन जाण्याचा योग आला. तेथील उपचार सुविधा,कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व झालेली शस्त्रक्रिया पाहून हा लेख लिहिण्याचा मोह आवरला नाही. अजूनही अनेक लोकांना ह्या दवाखान्याची माहिती नसावी असे दिसते.त्यामुळे पनवेलच्या मध्यवर्ती असलेल्या या दवाखान्याचा लाभ व अनुभव गरजू जनतेने घ्यावा असे जनतेस आवाहन आहे. येथील डॉक्टर अंजली मॅडम तसेच डॉक्टर स्वप्नील वाघ व जनसंपर्क अधिकारी चांदसर हे आरोग्य सेवेसाठी तत्पर असून थोड्याच अवधीत त्यांनी दवाखान्याचे नावलौकिक वाढविले असून सदरचा दवाखाना जनतेसाठी वरदान ठरत आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळत आहे हे आणखी एक विशेष आहे असे अ‍ॅड. यशवंत भोपी यांनी सांगितले. 0000

आदिवासी मुलांनी कंदील बनवून केली दिवाळी साजरी

ठाणे : ठाण्यातील पाचवड गावांमधील आदिवासी मुलांनी दिवाळी एका अनोख्या पद्धतीने साजरी केली. गेली पाच वर्ष दिवाळीच्या सुट्टीमध्ये आकाश कंदील बनवून आणि त्याची विक्री करून या गावांमध्ये दिवाळी साजरी होते.…

विद्यार्थ्यांकडून कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणाचा संदेश

पनवेल –  महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी प्रत्येक कुटूंबांमध्ये साजरी करावी यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा ५.० या योजनेअंतर्गत पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम  विद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांनी काय करावे असे विविध पर्याय मुलांना सूचविण्यात आले. तसेच पर्यावरण विषयावर विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी स्पर्धा व पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. यावेळी रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या दरम्यान फटाके उडवल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणाचे  प्रमाण वाढते. त्यामुळे श्वसनदाह आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनेनूसार हरित सण अंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी, प्रदूषण मुक्त दिवाळी विद्यार्थ्यांनी साजरी करावी यादृष्टीने ही जनजागृती पालिकेने केली आहे. विद्यार्थ्यांनी पुनर्वापर करण्यात येणाऱ्या वस्तू पासून पर्यावरणपूरक आकाश कंदिल बनवून दाखवले.

दिवाळी पहाट निमित्त ठाण्यात तरूणाईचा जल्लोष

डिजेच्या तालावर तरूणाई थिरकली   ठाणे : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळपासून शहरातील राम मारूती  रोड परिसर, मासुंदा तलाव परिसर, गडकरी चौक तरूणाईच्या उत्साहाने फुलुन गेला होता. डिजेच्या तालावर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. पारंपारिक पोशाखात तरूण, तरूणी मासुंदा तलाव परिसरात छायाचित्र काढत दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे चित्र दिसून आले. तसेच अनेक गायकांनी, ब्रास बँड पथकांच्या गाण्यांनी आजची दिवाळी पहाट रंगली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले. थोड्यावेळाने तरूण तरूणींचे समूह मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात दाखल होण्यास सुरूवात झाली. तरूण- तरुणी पारंपारिक साडी, कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमास उपस्थित होते. अनेकजण मित्रमैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते. डिजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. चिंतामणी चौकात राॅकस्टार क्विन पल्लवी दाभोळकर, गायक स्वप्निल गोडबोले, तसेच राम मारूती रोड परिसरात बाळकुम येथील राष्ट्रीय ब्रास बॅंडची पथकांचे वादन आयोजित केले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटसाठी कपड्यांमध्ये वैविध्य दिसून आले. यंदा महिलांमध्ये घरारा ड्रेस, भरजरी ओढण्यांचा ड्रेस तसेच दक्षिण भारतीय पद्धतीच्या घागरा साडीचा प्रकाराला महिलांची सर्वाधिक पसंती होती. यंदाच्या दिवाळी पहाटला पुरुष विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये दिसून आले. डिजेवर महाराष्ट्र माझा, जय श्रीराम अशी गाणी वाजत होती. तसेच अनेक ठिकाणी राजकीय  गामी देखिल वाजत असल्याचे चित्र ठाण्यात दिसून आले. या गाण्यांवर तरूणाईने ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली. रतन टाटांना श्रद्धांजली भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्याकरिता सतत कार्यरत असणारे, या क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले होते.

स्थानिक संस्था कर कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम

ठाणे : 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच स्थानिक संस्था कर कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा, असे आवाहान स्वीप टीम कडून करण्यात आले. या वेळी स्थानिक संस्था कार्यालयात 50 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते.या कर्मचारी वर्गाला लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे व मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना “मी मतदान करणारंच… आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा” या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान 20 नोव्हेंबर 2024 असे दर्शविणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता 20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहान सर्व कर्मचारी वर्गाला करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाची सामूहिक शपथ घेऊन मतदान जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाची सांगता केली.

 नवमतदारांनी व नागरिकांनी मतदानाचा केला संकल्प

 ठाण्यातील “दिवाळी पहाट” कार्यक्रमात ठाणे : दिवाळीत जसे प्रत्येक घरात दीपप्रज्वलन केले जाते, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा दीप लोकशाहीच्या निवडणूकरुपी उत्सवात लावावा. त्यातून देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल, पारदर्शक आणि न्याय होईल, असा संदेश देत तलावपाळी येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात मतदारांनी मतदान करण्याचा संकल्प केला आणि शपथ घेतली. तलावपाळी परिसर येथे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. भारतीय राज्यघटनेने मला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा कोणत्याही परिस्थिती वापर करेन. मतदान करून उमेदवार निवडणे माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. देशहिताकरिता जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांना, परिचितांना मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहीत करीन. कोणतीही भीती वा लालसोपोटी मतदान करणार नाही, असा संकल्प उपस्थित सर्व मतदारांनी केला. युवा वर्गाने वेशभूषाच्या माध्यमातून “राष्ट्राच्या हितासाठी करायचं मतदान.., एकतेने एकजुटीने गाजवूया मैदान.., लोकशाहीचा करूया सन्मान.., 100 टक्के करायचं मतदान…” अशी आगळीवेगळी वेशभूषा मतदार जागृती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. नवमतदार तरुणाईला, मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून मतदार जागृती केली जात होती. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. याचा वापर योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी प्रत्येक मतदाराची आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य उमेदवारास मत देऊन आपले शहर, राज्य आणि देशाच्या विकासात हातभार लावावा आणि दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन स्वीप टीमकडून मतदारांना केले जात आहे. 00000

 सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींचे जलदगतीने निराकरण

306 तक्रारींचे निराकरण शंभर मिनिटांच्या आत   ठाणे : निवडणुकीच्या दरम्यान काही अनियमितता किँवा आचारसंहिता भंगाविषयी काही बाबी आढळून आल्यास नागरिकांना “सी व्हिजिल” या ॲप्लिकेशनच्या माध्मातून संदेश, फोटो, व्हिडिओ व्दारे ऑनलाईन तक्रार  दाखल करू शकतात. या ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत तक्रारीचे निवारण केले जाते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात दि.31 ऑक्टोबर 2024 दुपारी 3:30 वाजेपर्यंत 348 तक्रारी प्राप्त झाल्या. या 348 तक्रारींमध्ये एकूण 324 तक्रारी दखलपात्र असून उर्वरित 24 तक्रारी अदखलपात्र आहेत. या 324 दखलपात्र तक्रारींमधून 306 तक्रारींचे 100 मिनिटाच्या आत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचेही निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सी-व्हिजिल कक्षाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी श्री.विजयसिंह देशमुख व सहाय्यक समन्वय अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे यांनी दिली आहे. 00000