Category: ठाणे

Thane news

२३ वर्षांच्या पाणी टंचाईच्या संघर्षाला ठाण्यातील गृहसंस्थेने दिली मात

पाण्याच्या साठवणूकीचे केले यशस्वी नियोजन ठाणे : गेली अनेक वर्ष लोकमान्य नगर येथील लक्ष्मी पार्क गृहसंकुलातील फेज एक मधील सप्रेम या इमारतीतील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. पाण्याच्या समस्येमुळे रहिवाशी हैराण झाले होते. अखेर गृहसंस्थेतील सभासद आणि सदस्यांनी एक बैठक घेतली आणि उपाययोजना करण्यासाठी विविध कल्पना सूचविल्या. पावसाच्या पाण्याची आणि वातानूकुलीत (एसी) यंत्रांतून निघणारे पाणी साठवून या रहिवाशांनी गृहसंस्थांना वेगळा आदर्श घालून दिला आहे. लोकमान्य नगर येथे लक्ष्मी पार्क गृहनिर्माण संस्था आहे. या गृहसंस्थेत फेज एक मध्ये सप्रेम को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी ही सात मजली इमारत आहे. इमारतीमध्ये ६४ सदनिका आहेत. १९९७ मध्ये या इमारतीची नोंदणी झाली आहे. ठाणे महापालिके मार्फत या इमारतीला पाणी पुरवठा होतो. परंतु पाण्याच्या वेळा ठराविक असल्याने रहिवाशी हैराण झाले होते. अनेकदा एक – दोन दिवस पाणी आले नाही, तर नागरिकांचे हाल होत असे. उन्हाळ्यात दररोज दोन टँकर मागविण्याची वेळ रहिवाशांवर येत होती. त्यामुळे पाण्याचे देयकही वाढत होते. २०१९ मध्ये गृहसंकुलातील सदस्यांनी येथील स्थानिक माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या मदतीने बोअरवेल खणली. येथे ३५० फूट खोलावर पाणी लागले. परंतु हे पाणी किती दिवस टिकणार हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे इमारतीतील संस्थेचे पदाधिकारी अविनाश शालीग्राम, किशोर नायर, सुरेश कदम, अरुण देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत पावसाचे पाणी साठविण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारतीच्या गच्चीवर शेड बांधण्यात आले होते. पावसाचे पाणी शेडमधून गटारात जात होते. त्यामुळे हे पाणी त्यांनी एका जल वाहिनीच्या मदतीने बोअरिंग टाकीमध्ये टाकले. त्यामुळे दोन वर्षांत पावसाच्या पाण्याची मोठ्याप्रमाणात साठवणूक झाली आहे. हे पाणी आता वापरासाठी २४ तास उपलब्ध होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सभासदांनी दोन महिन्यांपूर्वी आणखी एक प्रयोग केला. इमारतीतील अनेक रहिवाशांकडे वातानुकूलीत यंत्रणा आहे. वातानुकूलीत यंत्रामधून पाणी बाहेर फेकले जाते. त्यामुळे या यंत्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर व्हावा यासाठी सर्व वातानुकूलीत यंत्रांचे पाणी वाहून नेणारी एक वाहिनी जोडण्यात आली. या पाण्याचा वापर वाहने धुणे, रोपांना पाणी घालणे यासाठी केला जात आहे. पिण्याचा पाण्याचा सर्वाधिक वापर स्वच्छतागृहात होत होता. महापालिकेकडून येणारे पाणी ठराविक वेळेत येत होते. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. आम्ही सर्व सभासद आणि सदस्यांनी पाण्याची साठवणूक कशी करता येईल याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. आता २४ तास पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.

कल्याण-सीएसएमटी सकाळची १५ डबा लोकल तीन महिन्यांपासून गायब

कल्याण: सकाळी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळच्या वेळेत कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १५ डब्यांची लोकल गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे. अशा प्रकारच्या दोन लोकल आहेत. यामधील एक लोकल गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याने रेल्वे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना धक्के खाण्यापेक्षा सुखाने प्रवास करता येत होता. या लोकलला महिलांंसाठी दोन स्वतंत्र डबे, प्रथम श्रेणीचे वाढीव डबे होते. त्यामुळे नियमित लोकलवर येणारा भार या लोकलमुळे कमी होत होता. या लोकलला महिलांसाठी वाढीव डबे असल्याने महिला प्रवाशांना धक्केबुक्के न खाता लोकलमध्ये शिरता येत होते. या १५ डब्यांच्या लोकलमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे दरम्यानच्या फलाटांवरील प्रवाशांंना नऊ आणि १२ डब्याच्या लोकलपेक्षा दिलासा मिळत होता. अशाप्रकारच्या दोन लोकल सकाळच्या दरम्यान होत्या. यामधील कल्याणहून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी लोकल गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. प्रवाशांसाठी महत्वाची असणारी ही लोकल का बंद आहे याचे कोणतेही कारण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिले जात नाही. ही लोकल सुरू करावी म्हणून रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत, त्यांना कोणी दाद देत नाही. कल्याण ते ठाणे दरम्यान रेल्वे प्रवाशांचे गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून अधिकाधिक प्रवाशांच्या सोयीच्या लोकल सोडणे आवश्यक असताना रेल्वे प्रशासन उलट महत्वाच्या लोकल बंद ठेऊन प्रवाशांची गैरसोय करत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अशा लोकलची आता गरज आहे, असे प्रवासी सांगतात. उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी यासंदर्भात मध्य रेल्वेच्या विभागीय परिचलन अधिकाऱ्यांना संपर्क साधला, त्यांनी १५ डब्याच्या लोकलची दोन वर्षातून एकदा देखभाल, दुरुस्ती करावी लागते. या कामासाठी कमीतकमी ४० दिवस लागतात. त्यामुळे अशा लोकल प्रवासी सेवेत येण्यास उशीर होतो. यावर अरगडे यांनी अलीकडे लोकल देखभाल, दुरुस्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना एवढे दिवस देखभालीसाठी लावून रेल्वे प्रशासन नक्की काय साध्य करते, असे प्रश्न अरगडे यांनी अधिकाऱ्यांंसमोर उपस्थित केले. डोंबिवली ते मुंब्रा दरम्यानचे बहुतांशी रेल्वे प्रवासी मृत्यू हे गर्दीमुळे होत आहेत. याची जाणीव ठेऊन रेल्वे प्रशासनाने १५ डबा लोकल लवकर सुरू करावी, अशी मागणी अध्यक्षा अरगडे यांनी केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई !

आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करत आहेत, माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली. ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, जवाहरबाग, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर, लोकमान्य डेपो, राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

श्रम घेतले तर कमी खर्चात ही यश मिळू शकते –  डॉ. प्रणिता पगारे

अनिल ठाणेकर ठाणे : पदवीनंतर स्टाफ सिलेक्शन सारख्या अनेक सरकारी परीक्षा आहेत. बैंकांच्या आँनलाईन परीक्षा आहेत. मोबाईलचा योग्य उपयोग करून अभ्यास केला तर श्रम घेतले तर कमी खर्चात ही यश मिळवू शकता, असा सल्ला फादर एग्लेल प्रशिक्षण संस्थेच्या सेंटर मैनेजर डॉ.प्रणिता पगारे यांनी दहावी नंतर काय? या विषयावर बोलताना दिला. राबोडी फ्रैंड्स सर्कल संचालित शाळेत समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने एकलव्य सक्षमीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी सईद शेख होते. फादर एग्नेल टेक्निकल इंस्ट्यूट मार्फत सुरू असलेले विविध टेक्निकल कोर्सेस ची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व कोर्सेस मोफत शिकवले जातात. शिवाय नोकरी मिळवून देण्यासाठी सुध्दा संस्था मदत करते. पुढे त्यांनी सांगितले की, आपले स्वप्न साकार करण्यासाठी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचे टाईम टेबल तयार करून मेहनतीने अभ्यास करावा. टेक्सटाइल टेक्नॉलॉजीस्ट व करिअर मार्गदर्शक शैलेश मोहिले यांनी दहावी नंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील विविध विषयांची माहिती देत पदवीनंतर रोजगाराभिमुख शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विदेशी भाषांमध्ये पदवीनंतर रोजगार मिळवू शकता. त्यांनी दहावीचा निकाल लागण्या आगोदर आपल्याला पुढे काय करायचं ते  आत्मविश्वासाने ठरवा. असा सल्ला ही त्यांनी दिला. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ नसिब मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना आपलं व्हिजन ठरविण्याचे या वेळी सुचविले. सक्षमीकरण योजनेच्या संयोजिका लतिका सुप्रभा मोतीराम यांनी आपल्या कुवतीनुसार कौशल्य प्रशिक्षण घ्यावे असे सूचविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या इंग्रजी शिक्षिका हुसना शेख यांनी केले तर  कार्यक्रमात समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, फादर एग्नेल टेक्निकल इंस्ट्यूटच्या फैशन डिझाईन शिक्षिका अश्विनी पाटील आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना शेख आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे ६० विद्यार्थी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी झाले होते.

उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाचा डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा!

लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी दिल्या शुभेच्छा! डोंबिवली : उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाने कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. लेवा पाटीदार एकता संघाच्या सदस्यांनी आज डोंबिवली येथे डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत हा जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी खासदार शिंदे यांनी त्यांचे आभार मानत आगामी काळात समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मागील १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख निर्माण झाली असून त्यामुळेच विविध संस्था, संघटना यांच्याकडून सातत्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला जात आहे. आता उल्हासनगरमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्याला असलेल्या लेवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघानेही खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे सदस्य उपस्थित होते.

सकल मराठा समाजाच्या वतीने कुठलाही पाठिंबा राजकीय पक्षांना नाही

समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही -रामदास शेवाळे पनवेल : समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.  सकल मराठा समाजाच्या वतीने कुठलाही पाठिंबा राजकीय पक्षांना देण्यात आला नाही. समाजात कोणतीही दुफळी होऊ नये, त्यामुळे हा निर्णय आहे मात्र काही लोकं स्वार्थापोटी असे करत असेल तर ती चुकीचं आहे, त्यामुळे सकल मराठा समाज म्हणून दिलेला पाठिंबा मान्य नाही, असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मराठा समाजाच्यावतीने व्यक्त केले. यावेळी मराठा समाजाचे बाळासाहेब पाटील, चंद्रकांत सावंत, दिपक पाटील, केदार भगत, समीर कदम, हर्षवर्धन पाटील, डाॅ.प्रशांत कदम, सुभाष कदम, शिवाजी थोरवे, सचिन भगत, राजेंद्र भगत, विकास वारदे, प्रदीप देशमुख, तेजस जाधव, सोनल कदम, स्नेहल बागल, स्वरूपा सुर्वे, अॅड.प्रशांत भिलारे, कुमार भगत, सुमित दसवते, नितेश भगत, सत्यजित भगत, भावेश शिंदे,भरत जाधव, किरण नागरगोजे, अवधूत साळुंखे, रावसाहेब आभाळे, रघुनाथ काळे, अशोक जाधव, निलेश दिसले,गोरख नाईकआदींसह शेकडो मराठा बांधव उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी खोपोली येथे काही मोजक्याच मराठा समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी परस्पर कोणालाही विचारात न घेता सकल मराठा समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.या निर्णयाला मराठा समाजातीलच बांधवांनी विरोध केला आहे. यावेळी बोलताना रामदास शेवाळे यांनी, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना सुध्दा विश्वासात न घेता काही नेते कोणताही निर्णय घेत असतील तर तो निर्णय समाज बांधवांसाठी घातक ठरण्याची जास्त शक्यता आहे. आणि हजारो मराठा बांधवांनी या निर्णयाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. काही मोजक्या समन्वयकांनी घेतलेला निर्णय समस्त मराठा समाजाला न पटणारा आहे. निर्णय घेण्याआधी संपूर्ण मराठा समाजाची बैठक घेणे गरजेचे होते. महायुतीने जे काम मराठा आरक्षणासाठी केले आहे ते आधी कोणीच केले नाही. वाशी येथे झालेल्या विजयोत्सवात तसे स्पष्ट दिसत होते. तर बाळासाहेब पाटील यांनी बोलताना, महायुती ने मराठा समाजासाठी जे काम केले आहे ते महाविकास आघाडीकडून तसूभरही झाले नाही. १० टक्के आरक्षण महायुतीकडून देण्यात आले.कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे काम देखील फक्त महायुतीकडून झाले.त्यामुळे लाखो समाज बांधवांना याचा लाभ होणार आहे. सगेसोयरे हा विषय लवकरच सोडवला जाईल अशी आशा असून कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे मराठा समाजाने संभ्रमात न राहता देशासाठी आपल्याला मतदान करायचे आहे असे समजून मतदान करावे. तर मराठा आरक्षण समन्वय समिती सरचिटणीस चंद्रकांत सावंत यांनी, सकल मराठा समाजात ४०० समन्वयक आहेत.त्यातील काही जण मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत फोटो काढून स्वतःच जरांगे-पाटील असल्याचे भासवत आहेत.त्यामुळे अशांची भूमिका ही सकल मराठा समाजाची भूमिका आहे असे कोणी समजू नये असे सांगत मराठा समाज कोणाच्या बाजूने आहे ते ०४ जूनला समजेल असे ते शेवटी म्हणाले.

शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज-मकरंद अनासपुरे

अनिल ठाणेकर ठाणे : शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास प्रसिध्द अभिनेते व नाम फाऊडेंशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ ते १२ मे दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांशी यानिमित्ताने संवाद होतो, त्यांच्या समस्या जाणून घेता येतात, यासाठी गेली १२ वर्षे मी या महोत्सवाला भेट देत असल्याचे मकरंद अनासपुरे म्हणाले. गेल्या ५ वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने शेतकर्यांना सुलतानी नाही तर अस्मानी संकटाचाही सामना करावा लागतो आहे, गेल्या २- ३ कोकणात आलेल्या मोठ्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला आहे, मात्र अशा अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाहीत, ते पुन्हा उभे रहातात, आणि जोमाने कामाला लागतात, त्यामुळे मला कोकणच्या शेतकऱ्यांचे कौतुक वाटते असे मकरंद अनासपुरे यांनी केले. संस्कार संस्थेचे अध्यक्ष व आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्याना शहरात बाजारपेठ मिळावी, यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली कित्येक वर्ष भरवत आहे, नाम फाऊडेंशनची सुरवात होती, तेव्हा मराठवाड्याच्या शेतकर्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत, अशी मागणी आमदार केळकर यांच्याकडे केली होती, त्यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातल्या शेतकर्यांचे १५ स्टॉल लावले होते, १० दिवसात २५ टन धान्यांची विक्री झाल्याची आठवण अनासपुरे यांनी सांगितली.    शेतकर्यांना, भूमिपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी आमदार केळकर यांची धडपड सुरू असते, या महोत्सवात विक्रीसाठी येणारा आंबा हा नैसर्गिक, सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला दर्जेदार असतो. या महोत्सवाच्या माध्यमातून , इंडिया विरूध्द भारत यांच्यातील पुल सांधण्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहे, असे मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. मी स्वतः ग्रामीण भागातून शहरात आलो आहे, त्यामुळे मला माझ्या गावकडचे धान्य,नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले फळे मला शहरात मिळावीत, याचा शोध मी घेत असतो, त्यामुळे नैसर्गिक, सेंद्रिय पध्दतीने पिकवलेल्या या शेतमालासाठी एकत्रित असे व्यासपीठ, बाजारपेठ असावी, ती बाजारपेठ आमदार केळकर ठाणेकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. कोकणातील राजापूर, चिपळूण मध्ये आलेल्या महापूराने खूप नुकसान झाले होते, त्यावेळी नाम फाऊडेंशनने केवळ मदतच पोहचवली नाही तर जगबुडी, वशिष्ठी,गोदवली यासारख्या नद्यातील गाळ नाम फाऊडेंशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या मार्गदर्शनखाली काढण्याचे खूप मोठे काम नाम फाऊडेंशनने केले, त्यामुळे आता तिथे परिस्थिती सुधारत असल्याचे अनासपुरे यांनी नमूद केले. सजग नागरिकांनी या महोत्सवाला भेट देवून शेतकर्यांच्या या चळवळीला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. या महोत्सवातील आंबा हा सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला आहे, या महोत्सवातील आंबा हा थेट शेतकऱ्यांच्या शेतातला,अढीतला आहे, त्यामुळे दर्जेदार आंबा आहे, १२ मे पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला आवर्जून भेट देवून शेतकर्यांच्या चळवळीला पाठिंबा द्यावा. असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, सुनील लोखंडे उपस्थित होते.

महायुतीच्या घोषणांनी शहापूर तालुका दुमदुमला

कपिल पाटील यांच्या रॅलीला शहापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या रॅलीला शहापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहापूर शहरात काढलेल्या भव्य रॅलीने शहापूर शहर…

किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न

अनिल ठाणेकर ठाणे : मुरबाड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी, ५ मे ला श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला. स्थानिक आमदार .किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आणि अविरत प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक,सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संगमेश्वर येथील भगवान शंकर मंदिराचा जिर्णोद्धार आणि मंदिर परीसराचे सुशोभिकरण कामाचे भुमीपुजन काही काळापुर्वी संपन्न झाले होते. मंदिर जिर्णोद्धारावेळी विविध धार्मिक विधी करण्यात येतात,त्यापैकीच एक विधी म्हणजे संकोच विधी होय. सोमवारी, ५ मे २०२४ रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला. याप्रसंगी आमदार किसन कथोरे आवर्जुन उपस्थित राहिले आणि त्यांनी भगवान महादेवांचे मनोभावे दर्शन घेतले.

ठाणे जिल्ह्यात १३ रणरागिणी निवडणुकीच्या रिंगणात

ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावू पाहत आहेत. त्यात अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात ७९…