Category: ठाणे

Thane news

मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा

जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश राजीव चंदने मुरबाड : नगरपंचायतचे हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटणाऱ्या राहुल हिंदुराव या ठेकेदाराने लाखो रुपयांचा काळा पैसा मुरबाड नगरपंचायतचे तिजोरीत टाकला असल्याने नगरपंचायत प्रशासनात खळबळ माजली असुन या प्रकरणाची चौकशी  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आदेशाने उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे करीत असुन त्या चौकशी कडे तमाम मुरबाड करांचे लक्ष लागले आहे. मुरबाड शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने नगरोथ्तान योजनेतुन कोट्यवधी रुपये मुरबाड नगरपंचायतला दिले.मुरबाड नगरपंचायतने हि कामे  आपल्या मर्जीतील ठेदारांना देऊन शासनाचा निधी खर्च  केला मात्र  उघडी गटारे, रस्ते व शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वस्तीत येत असल्याने त्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली असता सदर ठिकाणी राहुल हिंदुराव या ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत परंतु ती कामे अस्तित्वात नसल्याचे उघड झाले.याबाबत शिवसेना कार्यकर्ते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुधाळे ,सागर भंडारी,दिपक दुधाळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली असता प्रसारमाध्यमांनी  हा प्रकार उजेडात आणला, त्यामुळे ठेकेदाराचे पायाखालची वाळू सरकली व त्याने मुरबाड नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नगरोथ्तान खात्यावर सुमारे आठ लाख चौतीस हजार रुपये जमा केले.याबाबत नगरपंचायतीने राहुल हिंदुराव ठेकेदाराला लेखी पत्र दिले असता त्याने समाधान कारक खुलासा केला नाही त्यामुळे नगरपंचायतने  जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला असता त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत. कोट मुरबाड नगरपंचायतीच्या नगरोत्थान खात्यावर संबंधित ठेकेदाराने अनाधिकृत पणे जमा केलेल्या रकमेची जिल्हाधिकारी स्तरावरुन चौकशी सुरू आहे.त्याचे चौकशी अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे आहेत –मनोज म्हसे.मुख्याधिकारी.मुरबाड नगरपंचायत.

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

कल्याण : पावसाळ्यापूर्वीची जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करायची असल्याने कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (ता.२ मे) सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे तांत्रिक अभियंता रमेश गोरे यांनी सांगितले. पालिकेच्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर उदंचन केंद्रातील पाणी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात सोडून ते डोंबिवली पूर्व, पश्चिम शहरांना पुरवले जाते. १०० दशलक्ष लीटर मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी कल्याण शहराच्या काही भागांना वितरित केले जाते. या जलशुध्दीकरण आणि उदंचन केंद्रांना महावितरणच्या टाटा पाॅवर कांबा येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठा केंद्राच्या कांबा येथील उपकेंद्रात दुरुस्तीचे काम गुरुवारी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेला होणारा वीज पुरवठा या दिवशी बंद राहणार आहे. नऊ तास हे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांना, ग्रामीण भागातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, अटाळी, मोहने, शहाड परिसराला होणारा पाणी पुरवठ बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने शुक्रवारी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पुरेसा साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

कल्याण लोकसभेसाठी वैशाली दरेकर-राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी डोंबिवली : कल्याण लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्या वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला. यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुभाष भोईर, संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, काँग्रेसचे नेते संतोष केणे, प्रवक्ते महेश तपासे, उपजिल्हा संघटक हर्षवर्धन पालांडे, युवा नेते वरूण सरदेसाई, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, राष्ट्रवादीचे वंडार पाटील उपस्थित होते. रखरखीत उन असूनही कार्यकर्ते हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन घामाघून होऊनही या फेरीत सहभागी झाले होते. उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी सकाळी डोंबिवलीचे ग्रामदैवत फडके रस्त्यावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्या इंदिरा चौकात उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीत दाखल झाल्या. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत वैशाली दरेकर यांच्या विजयाच्या घोषणा देत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांचा जयघोष केला जातो. राष्ट्रवादी, काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा जयघोष करत होते. त्यामुळे वातावरण घोषणांनी दुमदुमून गेले होते. ढोलताशांच्या दणदणाटाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मध्यवर्ती शिवसेना शाखेजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीला सुरूवात झाली. एका सजविलेल्या वाहनावर उमेदवार वैशाली दरेकर, युवा नेते आदित्य ठाकरे, डॉ. जितेंद्र आव्हाड, महेश तपासे, वरूण सरदेसाई, सदानंद थरवळ विराजमान झाले होते. नागरिकांना अभिवादन करत वाजतगाजत फेरी घरडा सर्कल येथील निवडणूक कार्यालयाकडे निघाली होती. यावेळी रस्तोरस्ती वाहनकोंडीचे दृश्य होते. अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा-मुंब्रा भागातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते. प्रचाराच्या रणधुमाळीत जनता आपल्या पाठीशी आहे हे ठामपणे दिसले. विकासाच्या नावाने बोंबा ठोकल्या जात असल्या तरी विकास कोणाचा झालाय हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळे या भागातील सर्व जनता उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे हे आजच्या गर्दीतून, प्रचारातून दिसून आले आहे.– वैशाली दरेकर उमेदवार, महाविकास आघाडी

कल्याण लोकसभेत महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे २ मे रोजी भरणार उमेदवारी अर्ज

अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीतून निघणार भव्य मिरवणूक डोंबिवलीः कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे २ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासप, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या महायुतीच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज भरण्यासाठी जातील. श्री गणेश मंदिरापासून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मागील १० वर्षात त्यांनी कल्याण लोकसभेत केलेल्या कामांचा स्मार्ट रूपातील कार्य अहवाल नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या १० वर्षातील कामांचे सादरीकरण करत उभारलेल्या प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. सध्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर गुरूवार, २ मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया, राष्ट्रीय समाज पक्ष, पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून डॉ. श्रीकांत शिंदे मतदारसंघात निवडणूक प्रचारार्थ विविध मान्यवर मंडळींशी भेटी, पदाधिकाऱ्यांशी संवाद यासह अनेक सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहात आहेत. तसेच विविध समाज संघटनांकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठींबा देखील जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर २ मे रोजी निघणाऱ्या मिरवणुकीला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक तसेच विविध समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. असा असेल मिरवणुकीचा मार्ग – डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात सकाळी ९ वाजता दर्शन घेऊन डॉ. श्रीकांत शिंदे अर्ज दाखल करण्यासाठी निघतील. गणेश मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक बाजीप्रभू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चार रस्ता नाका, लोकमान्य टिळक चौकामार्गे जिमखाना रस्त्यावरून संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत जाईल आणि डॉ. श्रीकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी. यावेळी महापालिकेतील कर्मचारी देखील उपस्थित होते.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी

सहा उमेदवारांचे अर्ज दाखल ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी   विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर…

मुंबई, ठाणे, कल्याण, भाईंदर महानगरपालिकांना ७ मे रोजी अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे : मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना आणि महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. सीवर डेथ प्रकरणी श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ गमध्ये   मुंबई उच्च न्यायालयाने  पुन्हा १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायदाच्या तंतोतंत अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.सीवर डेथ घडतात – संडासाच्या मैला टाक्या साफ करतांना सफाई कर्मचाऱ्यांना मरण येते  –  म्हणजे अजूनही The Prohibition of Employment as Manual Scavengers and Their Rehabilitation Act 2013 चे उल्लंघन होत आहे. सदर कायद्याच्या तरतुदीनुसार मानवी मैला सफाईच्या कामावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. परंतु वारंवार सीवर डेथच्या घटना घडत आहेत. ही अमानुष प्रथा बंद होण्यासाठी न्यायालयाने महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना आणि मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना मैला सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याचे आणि सदर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कामाचा व योजना राबविल्या असल्याचा रिपोर्ट येत्या ७ मे २०२४ रोजी सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंह, सुधा भारद्वाज आणि संज्योत शिरसाठ यांनी न्यायालयात बाजू मांडली. महाराष्ट्र शासनाने राज्य निगराणी समिती (Monitoring Committee), दक्षता समिती (Vigilance Committee), राज्य स्तरीय सर्वेक्षण समिती, जिल्हा सर्वेक्षण समिती, उपविभागीय समित्या गठीत केलेल्या आहेत का? तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत? मैला सफाई कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांनी पुनर्वसन करण्यासाठी केलेले अर्ज आणि त्यावर झालेली अंमलबजावणी बाबतीतही रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका आणि मिरा भाईंदर महानगरपालिका यांना या निकालात देण्यात आलेले आहेत. मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत वारंवार मलटाकी सफाई करतांना विषारी दुर्गंधीने गुदमरून मृत्यू कांड घडत आहेत. परंतु आजपर्यंत कुणाचेही पुनर्वसन करण्यासाठी शासनाने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला नसल्याचा आरोप ही प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा सर्वेक्षण समिती नेमून वर्ष उलटून गेले आहे परंतु समिती सदस्यांनी मागणी करूनही बैठका घेतल्या जात नाहीत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत जून २०२३ मध्ये बंद दुषित गटार सफाई करतांना २२ वर्षीय आदिवासी तरुण ऋतिक कुरकुटे मरण पावला. परंतु त्यांच्या आश्रितांनी मागणी करून ही अजून नुकसान भरपाई अदा केलेली नाही. ठाणे जिल्हा सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या कडे प्रत्यक्ष घटनेची चौकशी करण्यासाठी समिती सदस्यांनी आग्रह धरूनही पथक पाठवून सर्वेक्षण करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या अमानुषरित्या मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी आणि कायद्यानुसार त्यांचे  न्याय्य पुनर्वसन व्हावे या उद्देशाने श्रमिक जनता संघाच्या अध्यक्षा मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महासचिव जगदीश खैरालिया, म्युज फाऊंडेशनचे श्रेयस, निशांत बंगेरा, राकेश घोलप आदी कार्यकर्ते यांनी या प्रकरणी परिश्रम घेतले.

आयुक्त बदलले तरी, ठाण्यात अनधिकृत बांधकामे सुरूच !

आमदार संजय केळकर यांची संतप्त प्रतिक्रिया अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार्स, नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला. त्यावेळी आ. संजय केळकर यांनी, ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर मोहीम हाती घेतली पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेले नाही. केवळ एका सहायक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फार्स केला. याबद्दलची खंत आ. संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले. पण कारवाई शून्य ! ७२ माणसं या शहरात एका इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडली, तरी सुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. ठाणे पश्चिमेकडील उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे शेरू कुरेशी या हॉटेल मालकाने आपल्या सागर हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात राबोडीतील एका तक्रारदाराने दाखल केलेल्या रिट पीटीशनवर उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकाम रोखण्याचे बजावले. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी ढिम्म असल्याचे जावेद शेख यांनी निदर्शनास आणले आहे. ही बाबही आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. अशीच परिस्थिती बाळकुम, ढोकाळी, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट, कोपरी आदी भागात असून येथे कारवाईचा केवळ फार्स न करता प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सध्या आचारसंहिता सुरू असून आयुक्तांनी ही बांधकामे तोडण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, मात्र तरीही या प्रभागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे  आमदार संजय केळकर यांनी आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मतदारांच्या जनजागृतीसाठी 5 मे रोजी मॅरेथॉनचे आयोजन

पालघर  : 5 मे रोजी सकाळी 6 वाजता विविध वयोगटातील नागरिकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉनचे आयोजन SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत करण्यात आले आहे. भारत निवडणुक आयोगाकडुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters…

लोकलमधून पडून डोंबिवलीतील दोन जणांचा मृत्यू

डोंबिवली: छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात तुडुंब गर्दी असल्याने डब्यात शिरता न आल्याने लोकलच्या दरवाजात दाटीवाटीने उभे राहून प्रवास करणाऱ्या एका तरूणाचा, एका तरूणीचा दोन दिवसांत लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. डोंबिवली ते कोपर आणि दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या दुर्देवी घटना घडल्या आहेत. लोकलची संख्या वाढवुनही लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षात डोंबिवली ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सुमारे ४०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सुमारे ८०० हून अधिक लोकल मधून पडून जखमी झाले आहेत. रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. तरीही ही अपघातांंची मालिका संपत नाही. लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रिया श्यामजी राजगोर (२६) या तरूणीचा मृत्यू झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकात रियाने सोमवारी सकाळी मुंबईला जाणारी लोकल पकडली. डब्यातील गर्दीमुळे तिला डब्यात शिरता आले नाही. ती लोकलच्या दरवाजात उभी राहून प्रवास करत होती. डोंबिवली स्थानकानंतर लोकलने वेग घेतल्याने कोपर रेल्वे स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावली. ती ठाण्यातील एका बांंधकाम कंपनीत कामाला होती. डोंबिवलीतील अवधेश दुबे या तरुणाचा दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या खाडीत पडून मृत्यू झाला आहे. तो लोकलने मुंबईच्या दिशेेने प्रवास करत होता. डब्यात गर्दी असल्याने तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. मुंब्रा खाडीजवळ लोकलच्या दरवाजाला त्याने धरलेला हात सटकला तो खाडीत पडला असे पोलिसांंचे म्हणणे आहे. अवधेशची कार्यालयीन पिशवी गायब असल्याचे कुटु्ंबीयांनी सांगितले. यामध्ये काही घातपात असण्याचा संंशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. जाणकारांंकडून मिळालेली माहिती अशी की, कोपर ते मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकल वेगात असताना रुळांवरून डबे दोन्ही बाजुला वेगाने कलताना दिसतात. यावेळी दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशावर आतील गर्दीचा भार येतो. किंवा त्या प्रवाशाला दरवाजाच्या दांडीला हात धरून उभे राहणे मुश्किल होते. यावेळी त्याचा तोल जाऊन तो रेल्वे मार्गात पडतो. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे.