Category: ठाणे

Thane news

मुख्य रस्त्यांसह नियमितपणे अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता होईल यादृष्टीने सफाई करावी : आयुक्त सौरभ राव

तलावपाळी परिसरातील नागरिकांशी साधला संवाद ठाणे : नौपाडा परिसरात आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६.३० वाजल्यापासून सर्वंकष स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. श्रीकौपिनेश्वर मंदिर, भाजी मंडई परिसर, जांभळीनाका परिसर, स्टेशन रोड तसेच तलावपाळी परिसरातील साफसफाई करुन परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला. भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपूरे, नौपाडा परिमंडळचे उपायुक्त् शंकर पाटोळे, उपायुक्त अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केस्वावानी, सहायक आयुक्त सोपान भाईक, वैदकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मोहिमेत त्यांनी स्वत: हातात झाडू घेवून अंतर्गत रस्त्यांची, गल्ल्यांची साफसफाई केली. यावेळी कौपिनेश्वर मंदिर ते मराठी ग्रंथ संग्रहालय परिसराची पाहणी केली. या परिसरातील दुकानांच्या पाठी असलेल्या छोटया गल्ल्यांची सफाई केली. तसेच मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत गल्ल्यांही नियमित स्वच्छ करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच तलावपाळी येथील सॅटिस पुलाच्या खाली असलेले राडारोडा त्वरीत उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. नागरिकांशी साधला संवाद तलावपाळी परिसरात सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नियमितपणे फूटपाथची सफाई होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, तलावपाळी परिसरात काही नागरिक हे कबुतरांना दाणे खायला घालतात, त्यामुळे परिसर अस्वच्छ होतोच, परंतु कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. त्याचप्रमाणे रस्त्यांवर पाळीव प्राणी घेवून येणारे नागरिक हे प्राण्यांची विष्ठा उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे केल्या. यावर आयुक्तांनी याबाबत निश्चितच उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी कबुतरांना दाणे घातले जातात त्या परिसरात फलक लावण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ॲम्फीथिएटरची केली पाहणी तलावपाळी परिसरात सेंट जॉन शाळेच्यासमोरील भागात महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ॲम्फीथिएटरची पाहणी केली. यावेळी येथील नागरिकांशी नियमित स्वच्छता होते का याबाबत विचारणा करीत आयुक्त सौरभ राव यांनी त्यांच्याशी संवाद साधला. स्वच्छतेबाबत नागरिकांनी महापालिकेचे कौतुक केले. परंतु रस्त्यावर फेरीवाले व त्यांचे कुटुंबीय झोपत असून सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असल्याचे सांगत यावर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. या बाबीची दखल घेवून रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांना निवारा शेडमध्ये पाठविता येईल का याबाबतची चाचपणी करुन फूटपाथ नागरिकांसाठी मोकळे राहतील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबधितांना दिल्या.

कल्याणमधून उभे राहण्याची वल्गना करणारे गेले कुठे? : डॉ. श्रीकांत शिंदे

अंबरनाथ : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी उभे राहण्याची वल्गना करणारे नेते गेले कुठे? असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना विचारलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी शनिवारी अंबरनाथच्या खेर विभागातील हेरंब मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिराचे अध्यक्ष अभय सोमण यांनी त्यांचे स्वागत केले. कल्याण मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे निवडणुकीला उभे राहण्याची कुणाची हिम्मत झाली नाही, मतदारसंघातील नागरिक विकासकामे आणि महायुतीच्या पाठीशी उभे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वजण काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सोबतच कल्याण मतदारसंघात महायुतीमध्ये चांगले वातावरण आहे. वातावरण बिघडविण्याचे काम कुणी करत नाही आणि करत असल्यास वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांसारख्यांची नावे कल्याणमधून चर्चेत होती, मग ही नावे गेली कुठे, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, परशुराम उगले, निखिल चौधरी, विजय पाटील, मंदिराचे पदाधिकारी रत्नाकर चांदस्कर, नीलेश पाताडे उपस्थित होते.

आव्हाडांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबत्ते

ठाणे : एकीकडे भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची उमेदवार व नेत्यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाणे आणि कल्याण लोकसभेबाबत चर्चा केली. त्यानंतर श्रीकांत शिंदेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामुळे ते कोणत्या चिन्हावर लढणार असा सवाल यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला. तसेच पुढील प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बहुचर्चित अशा कल्याण लोकसभेसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर शनिवारी दुपारी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे, कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर, युवसेना सचिव वरून सरदेसाई, केदार दिघे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेल्या चर्चेत ठाणे आणि कल्याण लोकसभेची रणनिती ठरविण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच कल्याणचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाण्याचा उमेदवार कोण असेल त्याला कसे सामोरे जायचे, महायुतीमधून इच्छुक असलेल्यांपैकी कोणीही आला तरी त्यासाठी कशी रणनिती आखली जाउ  शकते यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे, मला असे वाटते की मुख्यमंत्र्यांनीच टाळले असेल की, माझ्या मुलाची उमेदवारी मी का जाहीर करावी म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असेल. भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, त्याचे परिणाम आजच्या घडीला सांगू शकत नाही, ४४ दिवस अजून बाकी आहेत, ४४ दिवसानंतरच भविष्य सांगणे हे कोणत्या भविष्यकारालाही जमणार नसल्याचे देखील आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी घेतला विकास कामांचा आढावा

कल्याण : विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३६० कोटी रुपयांची रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाची कामे प्रगती पथावर आहेत. यात एमएमआरडीए मार्फत २४ रस्त्यांची व महापालिकेमार्फत ७ रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. याच बरोबर रिंगरोडचे पुढील सेगमेंट ३ चे काम हाती घेण्यात येत आहे. सदर कामात भेडसावणा-या विविध अडचणीचा आढावा घेऊन पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी नुकतीच सर्व सबंधितांची आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत या कामातील बाधित बांधकामांच्या निष्कासनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित उप आयुक्त व प्रभागाचे सहा. आयुक्त यांना तसेच भूसंपादन, जागेच्या अडचणीसंदर्भात नगररचना विभागाच्या सहा. संचालक दिशा सावंत यांना देण्यात आले. डोंबिवली येथे महानगर गॅस मार्फत करण्यात येणा-या खोदाईबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित सर्व कामे पुढील आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी महानगर गॅसच्या प्रतिनिधीना दिले. तसेच या कामात असलेले विद्युत टान्सफॉर्मर,जल/मलवाहिन्या यांच्या अडचणी संदर्भात एकमेकांच्या सहकार्याने मार्ग काढण्याच्या व सदर काम कालबध्द पध्दतीने करण्याबाबत सूचना संबधित अभियंत्याना देवून पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले. सदर बैठकीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता कोरगावकर, अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, कार्यकारी अभियंता देवरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहा. संचालक नगररचना दिशा सावंत, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, मनोज सांगळे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, परिमंडळ उप आयुक्त प्रसाद बोरकर व रमेश मिसाळ, संबधित प्रभाग  क्षेत्र अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी व इतर अधिकारी उपस्थित होते.

सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा

भिवंडी:भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या आर के लॉजी वर्ल्ड या गोदाम संकुलावर एम एम आर डी ए कडून कोणतीही नोटीस न बजावता कारवाई करण्याचा घाट घालण्यात आला. सुरेश म्हात्रे यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून येवई येथे आर के लॉजी पार्क नावाने गोदाम संकुल उभारले आहे .या बांधकामावर गुरुवारी सायंकाळी कोणतीही नोटीस न बजावता सिल करण्याच्या कारवाईसाठी  एम एम आर डी ए चे अधिकारी पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले.यावेळी सुरेश म्हात्रे यांच्या भागीदार सहकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतली असल्याची माहिती दिली त्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेले एमएमआरडीएचे अधिकारी रित्या हाती माघी परतले. मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील यांनीच घातली आहे, असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.एम एम आर डी ए राजकीय दबावातून कारवाई करीत असून जिनके घर शिसेके होते है ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते अशा शब्दात सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला असून निवडणूक लढतांना समोरासमोर येऊन लढा अशा कारवाया करून पाठीत खंजीर खुपसल्यासारखे नका करू असा इशारा म्हात्रे यांनी कपिल पाटलांना दिला आहे.

नितीन बानुगडे-पाटील यांची मुलुख मैदानी तोफ नालासोपाऱ्यात धडाडणार!

महाविकास आघाडीचा आज कार्यकर्ता मेळावा विरार : ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ‘महामेळावा आज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नालासोपारा (पश्चिम) येथील तानिया बँक्वेट हॉलमध्ये होणाऱ्या या महामेळाव्याला शिवव्याख्याते तथा शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील संबोधित करणार आहेत, अशी माहिती शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘संघर्षकन्या` भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी भारती कामडी यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. दरम्यान; भारती कामडी यांचा पालघर लोकसभा ‘गावभेट दौरा सुद्धा आज सकाळी ९ वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाकरता प्रथमच आश्वासक महिला उमेदवार घोषित केला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेने या मतदार संघात आघाडी घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा होणारा हा ‘महामेळावा` सामान्य नागरिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकरता प्रेरणादायी व ऊर्जा देणारा असेल. तसेच परिवर्तनाची नांदी देणारा ठरणार आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

१३ एप्रिलपासून ठाण्यात समता संस्कार शिबिर

ठाणे : दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा १३ एप्रिल पासून १६ एप्रिल पर्यंत समता विचार प्रसारक संस्थेतर्फे येऊर येथे समता संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० वी च्या परीक्षेला बसलेल्या आणि कॉलेज मध्ये जाणाऱ्या १८ ते २५ वयाच्या युवक युवतींसाठी असलेल्या या निवासी शिबिरात शरीर विज्ञान, माध्यमांचा प्रभाव, मोबाईल चा विवेकी वापर, आकाश दर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर रंजकपणे, खेळांच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. डॉ. संजय मंगला गोपाळ, वंदना शिंदे, प्रशांत केळकर, राजू बहाळकर, हर्षदा बोरकर या सारखे मान्यवर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच बरोबर शॉर्ट फिल्म दाखवून त्यावर चर्चा करण्यास सुप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक संतोष पाठारे येणार आहेत. मुलांना शिस्तीचे धडे देत व्यक्तिमत्व विकास होण्याबरोबर त्यांच्या सामाजिक जाणिवा जागृत व्हाव्या हा मुख्य उद्देश हे शिबिर भरवण्यामागे आहे. येऊर येथील निसर्गरम्य वातावरणात संपन्न होणार्‍या या शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येंने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी सचिव अजय भोसले (८१०८९४९१०२) यांना संपर्क करावा. जागा मर्यादित आहेत.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

ठाणे, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद आष्टे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या यशासाठी पंचायत समिती शहापूरचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी शिवानी पवार यांची प्रेरणा व केंद्रप्रमुख डॉ. विलास वेखंडे यांचे केंद्रातील दरमहा परीक्षा नियोजन व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने भारत सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आली आहेत. या विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सी. बी. एस. सी. ई पॅटर्न च्या धर्तीवर बारावी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. या परीक्षेत शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टे, केंद्र ठुणे या शाळेने घवघवीत यश संपादन करत यशाचा चौकार लगावला आहे. शाळेचे तब्बल चार विद्यार्थी कु. हरिचंद्र रवि वाख, कु. प्राची लक्ष्मण विशे, कु. साई वाळकू झुगरे आणि कु.वैभव गुरूनाथ विशे या गुणी विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत निवड झाली आहे. शैक्षणिक वर्षे २०२३ – २०२४ या वर्षाची नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षा २० जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाली होती. या परीक्षेचा निकाल दि.३१ मार्च रोजी जाहीर झाला आहे. दुर्गम भागातील एक छोटी शाळा असूनही नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे सर्व यशस्वी विद्यार्थी व आष्टे शाळा तसेच शिक्षकवृंद आष्टे यावर संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यामध्ये मार्गदर्शक शिक्षक भगवान वरकुटे व राजाराम वेखंडे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेच्या या घवघवीत यशात शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ मंडळ आष्टे यांचे तसेच आदिवासी उन्नती मंडळ मुंबई, नॉलेज अकॅडमी शहापूर, जाणीव प्रतिष्ठान शहापूर, शिक्षक नेते स्व. काशिनाथ भोईरसर प्रतिष्ठान, दीपस्तंभ प्रतिष्ठान शहापूर या सर्वांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

‘श्रीकांत शिंदेंच्या विरुद्ध नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ’

शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होते. त्या खासदारांच्या लोकसभेसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द करण्यात आल्या. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत असेल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल, अशी टिपणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी शुक्रवारी येथे केली. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा केली. यावेळी उमेदवार दरेकर यांना शुभेच्छा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युवा नेते सरदेसाई यांनी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी सरदेसाई यांनी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले. खासदार डाॅ. शिंदे यांची उमेदवारी घोषित का केली जात नाही हे त्यांच्या पक्षाला विचारावे. पण एकंदर परिस्थिती पाहता शिंदे गटातील खासदारांची उमेदवारीसाठी नावे जाहीर होऊनही नंतर ती उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. अशा खासदारांच्या बाबतीत मतदारसंघात जे नकारात्मक वातावरण आहे. त्याचे हे परिणाम आहेत. अशीच परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वेक्षणातून पुढे आली असेल, त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यास माघार घेतली जात असेल. असे होऊ नये, असे वाटते, अशी सूचक टिपणी सरदेसाई यांनी केली. नियतीचा खेळ योग्यवेळी बदला घेतोच, असे सांगून सरदेसाई म्हणाले, शिवसेनेतील फुटीनंतर तेरा खासदार शिंदे गटा सोबत गेले. त्यांच्यामुळे सत्ता गेली. पक्षात फूट पडली. त्या तेरापैकी पाच खासदारांची उमेदवारी भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कापली आहे. आता या खासदारांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आठवण येत असेल. खासदारांच्या उमेदवारी जाहीर झाली की त्यांना सन्मानाने मातोश्रीवर बोलवले जायाचे. २०१४, २०१९ मध्ये या खासदारांनी त्याचा अनुभव घेतला आहे. या उमेदवार खासदारांचे ठाकरे कुटुंबियांकडून साग्रसंगीत स्वागत केले जात होते. रश्मी ठाकरे या खासदारांना विजयासाठी औक्षण करून त्यांना आशीर्वाद द्यायच्या. मग सन्मानाने निश्चित उमेदवारांंना एबी अर्ज दिले जायाचे. आता याच खासदारांना परिस्थिती बदलल्याने शिंदे यांच्या समोर उमेदवारीसाठी दहा दहा तास प्रतीक्षा करावी लागते. आपली उमेदवारी जाहीर होते की नाही याची धाकधूक या खासदारांना आहे. मातोश्रीवरचा मान आणि शिंदे यांच्या समोरील स्थान याची अनुभती आता हे इच्छुक खासदार घेत असतील. शिवसेना आम्ही जोमाने पुढे नेणार असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारीसाठी दोन आकडी उमेदवारीसाठी जागा मिळवता येत नाहीत. उमेदवारांची घोषणा करताना, जागा मिळविताना त्यांची होणारी तगमग आता जनता पाहत आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोणताही विचार न करता २१ उमेदवारांची घोषणा केली आहे, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपशहर संघटक हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव, शरद पाटील, विवेक खामकर उपस्थित होते.