Category: ठाणे

Thane news

कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून महिला उमेदवार रिंगणात

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. उमेदवारीच्या चर्चेत ठाकरे गटाकडून दरेकर यांचे…

कपिल पाटील यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

भिवंडी : ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक श्री. सुमित पाटील, श्री. राम माळी आदींची उपस्थिती होती.

दिव्यांग व्यक्तीला कमी समजू नका,  त्यांनाही समान संधी द्या – पूर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : सत्यम हा आमच्या विभागातला असून तो खूप हुशार आहे. दिव्यांग असल्यामुळे त्याला नोकरीसाठी अडचणी येत होत्या. त्याला नोकरी लावून देण्याचे आश्वासन मी दिले होते व ते पूर्णही केले. आज त्याचा पहिला पगार झाला असून त्याच्या यशामुळे तो आणि त्याचे कुटुंब खुश आहेत. त्याला भविष्यात तलाठी बनायचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठीही मी त्याला मदत करणार  आहे. दिव्यांग व्यक्तीला कमी समजू नका त्याला समान संधी द्या असे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. ठाणे विभागात राहणारा सत्यम लिंगाळे याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून दिव्यांग असल्यामुळे नोकरीसाठी त्याला अडचणी येत होत्या. त्याची समस्या युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांना कळताच त्यांनी त्याला नोकरी मिळवून दिली होती. सत्यमला नोकरीत एक महिना पूर्ण झाला असून त्याने आज पूर्वेश सरनाईक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. युवा महाराष्ट्र मेळावा २४ फेब्रुवारीला पार पडला होता. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यमला नियुक्ती पत्र देण्यात आले होते. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सत्यमला नोकरी लावून देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केले. आज सत्यम आणि त्याची आई पूर्वेश यांना भेटायला आले होते. त्याचा पहिल्या महिन्याचा पगार झाला. तो त्याने पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते स्विकारत त्यांचे मनापासून आभार मानले. आज मला माझा पहिला पगार  मिळाला. हे सर्व पूर्वेश सरनाईक यांच्यामुळे शक्य झाले आहे. त्यांनी मला काही महिन्यापूर्वी  नोकरीचा शब्द दिला होता व तो पूर्णही केला असल्याचे सत्यम याने सांगितले. माझा मुलगा ही सर्वसामान्य लोकांप्रमाणे कामाला जात असून मला खूप आनंद होत आहे की, आज त्याच्या नोकरीला एक महिना पूर्ण झाला. पालक म्हणून आम्हाला खूप आनंद असल्याचे सत्यमच्या आईने सांगितले.

सावधान ! सुर्यदेव कोपणार

मुंबई : हवामान बदलामुळे जगभरात तापमानाची वाढ नोंदविली जात असतानाच आता महाराष्ट्रातही येत्या तीन महिन्यातील तब्बल २० दिवस उन्हाचा जबरदस्त तडाका बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सुर्यदेव कोपणार असून नागरिकांना…

आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृह

ठाणे : ऑनरकिलिंगच्या घटनांबाबत राज्य सरकार गंभीर झाले आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण आणि सुरक्षित घर पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस अधीक्षक/ पोलिस आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी या तिघांचा स्पेशल सेल तयार केला आहे. ठाण्यातही हा सेल तयार झाला असून ऑनरकिलिंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. ऑनरकिलिंग ही देशातील मोठी गंभीर समस्या आहे. जात अन् धर्माच्या बाहेर जाऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांचा अतोनात छळ केला जातो. अनेकदा आप्तस्वकीय आणि जाती- धर्माच्या ठेकेदाराकडून त्यांची निर्घृण हत्या केली जाते. अशी अनेक प्रकरणे केवळ उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यातच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्रातदेखील घडलेल्या आहेत. संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असताना विवाह करणाऱ्या अशा जोडप्यांसोबत ऑनरकिलिंग होणे, त्यात सरकार, प्रशासन कमी पडणे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत देशातील प्रत्येक राज्यांना स्पेशल सेल निर्माण करून या घटना रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी नियोजन करण्यास बजावले आहे. त्या आदेशानुसार राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. देशातील ऑनरकिलिंग थोपविण्यात सरकार कमी पडत आहे. त्यामुळे देशात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. शक्ती वाहिनी संस्थेकडून जनहित याचिका ऑनरकिलिंगच्या घटना थांबवून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, ही सरकारची जबाबदारी आहे, तसे आदेश सरकारला द्यावेत, यासाठी शक्ती वाहिनीनामक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश पारित केले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली आता महाराष्ट्र सरकारकडून सुरू झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यालाही या आदेशाची अंमलबजावणी करायची आहे. त्यासाठी शासनाकडून परिपत्रक काढले असून त्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील संबंधित अधिकारी कामाला लागले आहेत. विशेष कक्षात यांचा समावेश पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या तिघांचा समावेश असलेला विशेष कक्ष (स्पेशल सेल) सुरू करण्याला सुरुवात केली आहे. पोलिस आयुक्त/अधीक्षक या सेलचे अध्यक्ष असून जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत. या समस्येवर काम करण्यासाठी जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी, संबंधित जिल्ह्यातील महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षक/ पोलिस आयुक्त, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी यांची समिती तयार केली आहे. एक वर्षापर्यंत सुविधा समितीमार्फत आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आवश्यकतेप्रमाणे सुरक्षागृहाची मदत पुरवण्याचे दक्षता घेणार आहे. ज्या ठिकाणी या जोडप्यांना पोलिस संरक्षण देता येईल, अशा ठिकाणी…

पाणी टंचाईबाबतच्या नियोजनासाठी आतापासूनच तयारीला लागा

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे  कठोर निर्देश ठाणे : येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठा विषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा, असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावासंबंधी  बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप,  शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,  ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड तसेच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता, उप अभियंता, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्चपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91 गाव-पाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्य:स्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्यानुषंगाने आवश्यक उपाययोजना आतापासूनच सुरू करण्यास निक्षून सांगितले. ते म्हणाले, ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. शहापूर येथील भाऊली धरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की, त्यांनी रोजच्या रोज धरणाचे काम किती झाले याबाबत प्रगती अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना रोजच्या रोज सादर करावा. या धरणाचे काम उत्कृष्ट प्रतीचे आणि वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी  तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असे एकही गाव नसावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पाणीटंचाईबाबत काटेकोर नियोजन करावे, गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. पाण्याचे टँकर व इतर आवश्यक उपाययोजनांचे आतापासूनच व्यवस्थित नियोजन करावे,  असेही ते शेवटी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे.‌ कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतरचे व उचलण्याआधीचे असे फोटो काढून फोटो संकलन करावे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्या संबंधितावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शिसोदे यांनी जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांना आश्वस्त केले की, ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी, पाणी टंचाईविषयी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा यंत्रणा काटेकोरपणे नियोजन करेल. ००००

ठाणे स्थानकात प्रवाशांची घुसमट थांबणार!

ठाणे : मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. या स्थानकावर लाखोंच्या संख्येने प्रवासी उतरतात. त्यांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेने सहा पुलांची निर्मिती केली आहे. आता या संख्येत आणखी एका पुलाची भर पडली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांच्या वापरासाठी खुलाही केला जाणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हा पूल बांधला आहे. या पुलामुळे प्रवाशांची घुसमट कमी होणार आहे. दादरच्या मागोमाग गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाचा क्रमांक येतो. दर दिवशी या स्थानकावरून मुख्य आणि उपनगरीय रेल्वेने सुमारे ८० लाख प्रवासी ये- जा करतात. कर्जतपासून अगदी नवी मुंबई, पनवेलपर्यंत आणि कसारा, खोपोलीपासून मुंबईपर्यंत जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करतात. हे स्थानक रेल्वेला मोठा आर्थिक हातभार लावणारे आहे. त्यामुळे या स्थानकातील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा मिळायला हव्यात, असा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न असतो. त्याचाच भाग म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने या स्थानकावर आणखी एक नवा प्रवासी पूल बांधला आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असून तो या प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना थेट सॅटीसच्या पुलावर नेऊन सोडणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सॅटीस पुलावर जाऊन ठाणे, घोडबंदर, काशिमीरा, भाईंदर, बोरिवली आदी ठिकाणी जाण्यासाठी बस पकडणे सोपे जाणार आहे. हा पूल प्लॅटफॉर्म क्रमांक १० कडून मुख्य पुलावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगाचा ठरणार आहे. हा नवा पूल मुख्य पुलाला जोडला आहे. त्यामुळे मुख्य पुलावरून ठाणे पश्चिमेकडे जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा वापर करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुलाचे बांधकाम सुरू होते. आता ते पूर्णत्वास आले आहे. आता त्यावर काँक्रीट टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना स्थानकात ये-जा करण्यासाठी जाण्यासाठी एकूण सहा पुलांचा वापर सुरू आहे. आता त्यात सातव्या पुलाची भर पडली आहे. पैकी सहाही पूल थेट सॅटीस पुलाशी जोडले गेले आहेत. स्थानकावर एकूण दहा प्लॅटफॉर्म असून हे सहाही पूल त्यांच्याशी जोडले जाणार आहेत. तर एक पूल सार्वजनिक आहे. त्यामुळे एकाच वेळी स्थानकावर अनेक गाड्या उभ्या राहिल्या तरी त्यातून उतरणाऱ्या गर्दीला या पुलाच्या माध्यमांतून स्थानकाबाहेर पडणे सुलभ होते. शिड्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. आता काँक्रीटीकरण केलेल्या शिड्या आणि पुलावरील फ्लोअरवर मार्बल ग्रॅनाईटच्या लाद्या बसवण्याचे काम सुरू होणार आहे. येत्या आठ- दहा दिवसांत हा पूल प्रवाशांना वापरण्यायोग्य होईल.

सर्वत्र सुरु असलेल्या कामांमुळे ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नवी मुंबईचे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचले आहे. त्‍यातच सर्वात जास्त वाहतुकीची वर्दळ असलेल्या ठाणे- बेलापूर मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्‍यामुळे ऐन उकाड्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांसह प्रवाशांना करावा लागत आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या मार्गावरून बेलापूरहून ठाण्याकडे जाताना नेरूळ पार केल्‍यानंतर शिरवण्यात गावाकडे जाणाऱ्या आणि पुलावर चढणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यापासून दुरवस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तिथून पुढे सानपाडाजवळ वाशीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, त्याच्याच बाजूला एक नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुलावरून वाशीकडे जाता येते. मात्र, तुर्भे रेल्वे स्थानकाच्या समोरील रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे. येथे पूल उभारण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे तुर्भे रेल्वे स्थानकासमोर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाशी मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेल्वे स्थानकाच्या आतील रस्त्याचा पर्यायही खुला करून देण्यात आलेला आहे. शिवाय वाहतूक पोलिसही भर उन्हात उभे असतात. मात्र, तरीदेखील येथील मार्गावरील वाहतूक कोंडी काही कमी होत नसल्‍याचे चित्र आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानक पार केल्यावर पुढे असलेल्या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. येथील मार्गावरील महापे जंक्शनवरही मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे अर्धा मार्ग रस्त्याच्या कामामध्ये बंद आहे. महापे जंक्शनवरून अनेकांना शिळफाटा गाठायचे असते. मात्र, येथील वाहतूक कोंडीमुळे जंक्शनवर बराच वेळ वाया जात आहे. एकीकडे आग ओकणाऱ्या सूर्याच्या गर्मीमुळे अंगाची लाही लाही होत असताना ठाणे- बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा जीव नकोसा होत आहे.

डोंबिवलीत गोदामे, बेकायदा चाळी भुईसपाट

डोंबिवली : गोदामांचे आगर म्हणून ओळखले जाणाऱ्या, तसेच जिन्सच्या बेकायदा कारखान्यांसाठी प्रसिध्द असलेल्या गोळवली, भाल, वसार भागातील बेकायदा चाळी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. या बेकायदा चाळी निवास, काही चाळी भंगार गोदामांसाठी भूमाफियांनी सरकारी, खासगी जमिनींवर बांधल्या होत्या. गोळवली भागात मोठ्या प्रमाणात भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. पावसाळ्यात भंगार ठेवण्यासाठी भंगार विक्रेते निवासी चाळींचा भाग वापरतात. तर काही भागात भूमाफिया गोदामे उभारून ते भाड्याने भंगार विक्रेत्यांना देतात. भंगार विक्रेत्यांना भाड्याने चाळीतील खोली, गोदाम बांधून दिले की दरमहा आठ ते दहा हजार रूपये भाडे भूमाफियाला मिळते. गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत माळरानांवर गोदामे, चाळी उभारण्यात येत आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यावेळी आठहून अधिक बेकायदा चाळी, भंगारांसाठी गोदामे उभारली जात असल्याचे मुंबरकर यांच्या निदर्शनास आले. या बेकायदा चाळी चौबे नावाचा भूमाफिया बांधत असल्याचे स्थानिकांंनी मुंबरकर यांना सांगितले. चौबे हे कारवाईच्यावेळी प्रत्यक्ष हजर राहिले नाहीत. विहित प्रक्रियेचा अवलंंब करून लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेत आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथक घेऊन गोळवली, वसार, भाल गाव हद्दीत चौेबे भूमाफियाने उभारलेल्या सर्व बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. गोळवली परिसरात गोदाम किंवा निवासासाठी कोणीही बेकायदा बांधकाम करीत असेल तर त्या जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. या भागातील भंगार विक्रेत्यांची बांधकामे, त्याची अधिकृतता तपासून या भागात तळ ठोकून असलेल्या भंगार विक्रेत्यांवर लवकरच आचारसंहितेचा भंग होणार नाही या चौकटीतून कारवाई केली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी सांंगितले. आय प्रभागात बेकायदा इमारती,चाळी तोडण्याची मोहीम सतत सुरू असल्याने या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

रविवारी कळव्यात रंगणार शिमगोत्सव आणि पालखी नृत्यस्पर्धा

ठाणे : गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही  त्यांच्यासाठी  ‘संघर्ष’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने कळवा येथेच शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ७ एप्रिल  दुपारी ४.०० वाजता  कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपारिक प्रकारे साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेवून आणण्यात येणार आहे.  या पालखी उत्सवानिमित्त   पालखी नृत्य स्पर्धेचेही आयोजन केले असून, रत्नागिरी व रायगड  या जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत. या निमित्ताने कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपारिक पालखी नृत्य हे ठाणे-मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक; द्वितीय विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक; तृतीय विजेत्या संघाला एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक तर सर्व सहभागी संघाना  प्रत्येकी 25 हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी अरविंद मोरे यांच्याशी +91 98190 95047; अरूण नागवेकर (वांद्री,ता. संगमेश्वर)  ९४०५०८००८५; प्रमोद चोचे ९१५२०९१७८०, ९८२०७६९९५९  या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.