भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रेंना उमेदवारी
स्वाती घोसाळकर
मुंबई: काँग्रेसचा विरोध मोडून शरद पवारांनी आज पॉवरफुल चाल करीत भिवंडीवर दावा तर सांगितलाच पण राज्यात दोन तगडे उमेदवारही उभे केले आहेत. शरद पवारांनी आज दुसरी यादी जाहिर केली. भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना भाजपाच्या पंकजा मुंडेच्या विरोधात उभे केले आहे. या मतदार संघात मेटेयांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार उमेदवारी देणार अशी चर्चा होती. पण आज सोनावणे यांना उमेदवारी जाहिर होताच त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.
याआधी पहिल्या उमेदवार यादीत शरद पवार गटाने 5 उमेदवार जाहीर केले होते. आता नव्याने दोन उमेदवारांची दुसरी यादी शरद पवार गटाने जाहीर केली आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवार गटापैकी कोणाच्या वाट्याला येणार, यावरुन वाद सुरु होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भिवंडीतून काँग्रेसच्या उमेदवाराला चांगली मतं पडली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष भिवंडी मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नव्हता. मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाकडे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा शरद पवार गटाचा आग्रह होता. भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना कडवी टक्कर देण्यासाठी बाळ्यामामा योग्य उमेदवार असल्याची अनेकांची भावना आहे. त्यामुळेच शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यातील लढाईत कोण बाजी मारणार, हे आता पाहावे लागेल.
बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. मात्र, बजरंग सोनावणे यांनी गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनावणे पंकजाला चांगली लढत देऊ शकतात हा निकष लक्षात घेता शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना बीडमधून उमेदवारी देऊ केली आहे. बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत रंगेल.
