अजूनही वेळ गेलेली नाहीकिती जागा पाहिजे ते सांगा

अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. “प्रकाश आंबेडकरजी अजून रस्ते बंद झाली नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे ते सांगा., पण भाजपला पराभूत करण्यासाठी समोर या. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. मग पुढची लढाई सुरू होईल. मैदान सुरू झालं तर खुप मुद्दे आहेत, आयुध आहेत”, अशी ऑफर पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे. ते अकोला येथे बोलत होते.

मत विभाजनाचे षडयंत्र भाजपने रचले

नाना पटोले म्हणाले, तुम्ही म्हणता नाना पटोलेला अधिकार नाहीत. मी स्वत:च्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेन. प्रकाश आंबेडकरजी अद्याप वेळ गेलेली नाही.  2014 आणि 2019 या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचं मोठं विभाजन झालं होतं. फुले-शाहू-आ़बेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपने नेहमीच रचलं, असेही पटोले यांनी नमूद केले.

मी मोदींना समोरासमोर विरोध केला

कोश्यारींनी सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. एका मंत्र्यांच्या तोंडावर शाई फेकल्यावर पोलिसांना निलंबित केलं गेलं. हे लोक असेच करू शकतात. मी खासदार असताना मी मोदींना समोरासमोर विरोध केला. अकोल्याचे भाजप खासदार सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. हे लोक त्यांचं व्हेंटीलेटर कधी काढणार हे सांगता येत नाही. कदाचित निवडणुकीतच काढतील, असंही नाना पटोले म्हणाले.

माझ्या पोटनिवडणुकीत आंबेडकरांनी उमेदवार दिला. मी भाजप सोडलं तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करणं सुरू केलं. आंबेडकरांनी मुंबईतील संविधान बचाव रॅलीत माझा अपमान केला. आंबेडकर खर्गेंना कधीच भेटले नाहीत. आंबेडकरांनी माझ्या नावाने चुकीचे आरोप केलेत. आंबेडकरांनी माझा अपमान केला. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. माझे सर्वच पक्षात मित्र, देवेंद्र फडणवीसही माझे मित्र आहेत, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.  जातीनिहाय जनगणना या माझ्या आग्रहाचा काँग्रेसच्या गँरंटीत समावेश आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

मी पण वंचित आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे

नाना पटोलेच्या रक्तात मॅच फिक्सिंग नाही. डॉ. अभय पाटलांची उमेदवारी मागे घेणार आहेत,अशी अकोल्यात हवा उडवण्यात आली. पण मी सांगतो की असं होणार नाही. 400 पार नाही 420 करायची आहे. आंबेडकरांनी शिरूरमध्ये दिलेल्या उमेदवाराचे आडनाव चुकीचे आहे.  मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबासाहेबांनी एका मिनिटात राजीनामा दिला होता. मी पण दिला. मग बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण? असा सवालही नाना पटोले यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *