पनवेल : लोकसभेच्या निवडणुका, तसेच सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल शहर पोलिसांच्या वतीने शिस्तबद्ध रुट मार्च काढण्यात आला. तसेच आचारसंहिता कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती रुट मार्चदरम्यान पोलिसांनी दिली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत आहे. परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारांमध्ये विश्‍वासार्हता वाढीस लागावी याकरिता सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये रुट मार्च काढण्यात येत आहे. परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे व पनवेलचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिसांकडून पनवेल शहरातून करंजाडे वसाहतीत रुट मार्च काढण्यात आला. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते. करंजाडे वसाहतीतील सेक्टर-१ ते ६ पर्यंत पनवेल शहर पोलिसांनी संचलन केले. रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सवानिमित्त पनवेल शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी रुट मार्च काढण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *