राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक चारोळी टाकली आहे ती चारोळी अशी आहे….
आईला मिळाली उमेदवारी
तर ताई ठेवा ना बाजूला तुतारी
थोडी तुम्हालाही विश्रांती हवी
आईसाठी घड्याळ तेच वेळ नवी..
ही चारोळी देण्यामागचा संदर्भ सुजाण वाचकांच्या एव्हाना लक्षात आला असेलच. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. त्यातील एक शरद पवारांचे, तर दुसरे अजितदादा पवार यांचे. शरद पवार हे महाआघाडी सोबत आहेत, तर अजितदादा महायुती सोबत आहेत.
यावेळी महायुतीतील नेत्यांना म्हणजे अगदी वरच्या स्तरावरील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनादेखील कसेही करून शरद पवारांना पराभूत करायचे आहे. शरद पवारांना पराभूत करायचे म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघातून पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पराभूत करायचे हे ओघानेच आले. कारण बारामती हा पवारांचा बालेकिल्ला, तिथून ते आधी विधानसभेत नंतर लोकसभेत विजयी झाले. २००९ मध्ये त्यांनी आता आपण लोकसभा लढवणार नाही असे जाहीर करून त्या जागी आपली कन्या सुप्रिया हिची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत.
आधी आधी नमूद केल्याप्रमाणे यावेळी महायुतीतील नेत्यांना शरद पवार म्हणजेच सुप्रिया सुळे यांना कसेही करून पराभूत करायचे आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार ४० आमदारांसह बाहेर निघाले आणि त्यांनी भाजप शिवसेना युतीशी संधान बांधत सत्तेत भागीदारी घेतली २०२४ च्या निवडणुकाही ते या महायुती सोबतच लढवणार हे नक्की झाले.. महायुतीतील नेत्यांना सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध लढण्यासाठी खंदा उमेदवार हवाच होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या वहिनी म्हणजेच अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवण्याच्या चर्चा सुरू झाल्या.
ही चर्चा सुरू होताच शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे पिता-पुत्री चांगलेच अस्वस्थ झाले. त्यांनी कुटुंबातील इतर नातेवाईकांनाही कधी नव्हे ते प्रचारात उतरवले. मग शरद पवारांची भगिनी, अजित पवारांचे मोठे बंधू आणि मोठी वहिनी, अजित पवारांच्या भगिनी अशा सर्वांना सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभे करत अजित पवार कसे चुकत आहेत हे सांगण्याचा प्रयत्नही झाला. स्वतः शरद पवार ठीक ठिकाणी मेळावे घेत सुप्रिया सुळे यांनाच यावेळीही विजयी करा असे आवाहन करत फिरत आहेत. अर्थात यावेळी अजून तरी ते पावसात भिजलेले नाहीत.
नुकतीच अशीच एक प्रचार सभा पार पडली. त्या प्रचार सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर आपले घर फोडण्याचा आरोप केला. वहिनी ही आईसारखी असते. मलाही माझी वहिनी आईसारखीच आहे. मात्र त्या माऊलीला माझ्याविरुद्ध उभे करण्याचा कट भाजपने केला आहे, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला.
ज्यावेळी सुप्रिया सुळे यांचे हे भाषण झाले, तोपर्यंत सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपले उमेदवार जाहीर केले. त्यात सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे आता भावजय आणि आनंद यांच्यात संघर्ष होणार हे नक्की झाले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्विटर अकाउंट वर ही चारोळी टाकली आहे. तुमच्या मातेसमान असलेल्या वहिनीला जर उमेदवारी मिळाली आहे तर आता यावेळी तुम्ही तुमची तुतारी बाजूला ठेवा आणि थोडी विश्रांती घ्या असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटरच्या संदेशात सुप्रिया सुळे यांना सुचवले आहे. त्यांची ही ट्विटर पोस्ट राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी उमेदवारी मागे घ्यावी आणि मातेसमान वहिनीला अविरोध निवडून द्यावे असे आवाहन फक्त अमोल मिटकरी यांनीच केले आहे असे नाही, तर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी देखील सुप्रिया सुळे यांना अशा प्रकारची विनंती केली आहे. वहिनी तुम्हाला आई समान असेल तर वहिनीला अविरोध विजयाचे गिफ्ट द्या असेही त्यांनी सुचवले आहे.
वस्तुतः सुप्रिया सुळे यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवायला काहीच हरकत नाही. सुप्रिया सुळे या २००९ पासून तीनदा खासदार म्हणून लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. आणि त्यांनी लोकसभा त्यांच्या परीने गाजवलीही आहे. त्यापूर्वी काही काळ त्या राज्यसभेतही होत्या. त्यामुळे आपल्या वहिनीला एक संधी द्यायला त्यांनी काहीच हरकत नाही. सुनेत्रा पवार या आजवर जरी राजकारणात सक्रिय नव्हत्या, तरी एका कुशल राजकारण्याची अर्धांगिनी म्हणून त्या सक्रिय आहेतच. त्याशिवाय सामाजिक जीवनातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी त्यांना संधी द्यायला हवी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. त्या तसा निर्णय घेऊ शकतात.( अर्थात इच्छा असेल तरच) या निमित्ताने सुप्रिया सुळे भारतीय जनता पक्षावर आरोप करत आहेत की त्यांनी आमचे घर फोडले. मात्र महाराष्ट्रात अशी राजकीय घरफोडी करण्यात कोण माहीर आहे हे सुप्रिया सुळे यांनाही माहित आहे. सुप्रिया सुळे यांचे तीर्थरूप शरद पवार यांनी आपल्या राजकारणासाठी अनेक घरे फोडली. काही वर्षांपूर्वी त्यांचे राजकीय शत्रू असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याला म्हणजेच धनंजय मुंडे यांना भाजपतून बाहेर काढून आमदारकीचा राजीनामाही पवारांनी द्यायला लावला होता. त्याचे पर्यावासान शेवटी गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनीच पराभव करण्यात झाले .त्या शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर आपले घर फोडण्याचा आरोप करावा हा मोठा विनोदच होईल. सुप्रिया सुळे या भाजप नेत्यांवर विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवारांचे घर फोडल्याचा आरोप करतात. मात्र त्यावेळी त्या एक विसरतात की आपल्या सख्या पुतण्याला आपले वडील प्रेमाने आणि विश्वास देऊन बांधून ठेवू शकलेले नाहीत. हे आपल्या वडिलांचे अपयश आहे. जर शरद पवारांनी अजित पवार यांच्यावर पुरेसा विश्वास टाकत त्यांना संधी दिली असती आणि आपली कन्या सुप्रिया हिला राजकारणात पुढे आणायचे म्हणून अजित पवारांवर अन्याय केला नसता तर अजित पवारांना बंड करण्याची गरजच पडली नसती. आपल्या वडिलांच्या अपयशासाठी आपण भारतीय जनता पक्षाला कसे जबाबदार धरता सुप्रिया सुळे? याचे उत्तरही आपल्याला द्यावे लागणार आहे.
अर्थात सुप्रिया सुळे या आपल्या आईसमान वहिनीला लोकसभेत पाठवण्याचे गिफ्ट कोणत्याही परिस्थितीत देणार नाहीत याची फक्त आम्हालाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला खात्री आहे. त्यांना आपल्या राजकीय स्वार्थापुढे आई समान असलेल्या वहिनीचे प्रेम हे दुय्यम आहे. वहिनीचा त्यांनी माऊली म्हणून केलेला उल्लेख हा देखील फक्त सभेत बोलण्यापुरताच आहे. बाकी त्यांना नातेसंबंधांपेक्षाही आपले राजकारण महत्त्वाचे आहे हेच या प्रकारातून सिद्ध होणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात नणंद भावजयीचा सामना अटळ होणार हे नक्की झाले आहे.
