अनिल ठाणेकर
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांचे टेन्शन वाढवणारी घटना घडली आहे. गुढीपाव्यानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार डाॅ. श्रीकांत शिंदें यांचे कट्टर विरोधक असलेले आणि कल्याण पुर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांची भेट घेतली आणि उघडपणे चर्चा केली, फोटोही काडले. यामुळे ही भेट खासदार डाॅ श्रीकांत शिंदे यांचे टेन्शन वाढणार असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभेचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांना होणारा भारतीय जनता पक्षाकडून विरोध. कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड गट डाॅ श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व कितीही म्हणत असले तरी प्रत्यक्षात ग्राऊंडवरील परिस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते.गुढीपाडव्यानिमित्त कल्याण शोभा यात्रेतील सुलभा गायकवाड-वैशाली दरेकर भेट नवे काही घडणार तर नाही ना असे चित्र दिसत आहे. कल्याण पूर्व येथील गुढीपाडवा स्वागत यात्रेत कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी कथीत पोलिस स्टेशन गोळीबार प्रकरणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड याही या ठीकाणी उपस्थित होत्या. यावेळी दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या, उघडपणे चर्चाही केली आणि हसत हसत एकमेकांसोबत फोटोही काढले. यामुळे याचे पडसाद कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळतील अशी चर्चा होत आहे. या भेटीने डाॅ श्रीकांत शिंदे यांचे टेन्शन वाढविले आहे, असेही बोलले जात आहे.
