संस्थेसाठी मदतीच्या घेतल्या आणाभाका
मुंबई : समाज माध्यमांची किमया घडली आणि १९७५-७६ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी चक्क पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. या आता सत्तरी गाठलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मग संस्थेला संपूर्ण मदत करण्याच्या परस्पर कौटुंबिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आणाभाका घेतल्या. आजकाल वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सर्वच जण व्यस्त असतात. हे समाज माध्यम म्हणजे दुधारी शस्त्र आहे. याचा वापर विधायक कार्यासाठी केला तर फार मोठा प्रभाव पडतो. दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील १९७५-१९७६ साली नवीन शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी सुमारे पन्नास वर्षांनंतर एकत्र आले आणि त्यांनी मैत्री सभेचे आयोजन केले. बोरिवली येथे माजी विद्यार्थ्यांसाठी ‘मैत्री सभा : शाळेतील आठवणींचा मेळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या समारंभात शाळेतील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभात विविध क्षेत्रात उच्च पदस्थ झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा आणि सध्या विविध सेवा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना एकत्र बांधून परस्पर कौटुंबिक संबंध जोपासणे, व्यवसाय नेटवर्क लिंक्सद्वारे एकमेकांना जोडणे, लहान-मोठी कामे करणाऱ्या आपल्या बंधू-भगिनींना वेगवेगळ्या उंचीवर नेणे, समाजसेवेचे काम एकत्र करणे आणि शाळेतील माजी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे या उदात्त उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मित्र डॉ. भरत वसानी, डॉ. प्रवीण पुरेचा भाटिया आणि उपेंद्र गोगरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
००००
