ठाणे : ठाणे लोकसभेच्या उमेदवारी वरून महायुतीत खलबत्ते सुरु आहेत. त्यात हि जागा कोणाकडे जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप कडून या जागेवर दावे प्रतिदावे करण्यात येत आहे.

अशातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नुकतेच पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत, पुन्हा एकदा ठाणे लोकसभेवर दावा केला आहे. तर, कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील, असा विश्वास देखील केळकर यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण अशी चर्चा रंगू लागली असून शिवसेना शिंदे गट आणि भाजप दोघांकडून हि या जागेवर दावे करण्यात येत आहे.

त्यात नुकत्याच भाजपच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाणे हे भाजपसाठी महत्वाचे असल्याचे सूचक विधान त्यांनी केले. त्यात पुन्हा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील पक्षाने तिकीट दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्यचे सांगितले.

ठाणे लोकसभा हा पारंपारिक भाजपचा मतदार संघ आहे. या मतदार संघावर रामभाऊ कापसे हे भाजपचे खासदार होते. त्यावेळी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी नगरसेवक अधिक असल्याचे गणित मांडले. त्यावेळी शिवसेनेला ही उमेदवारी देण्यात आली आणि प्रकाश परांजपे हे तीनदा खासदार झाले.

परंतु आता गणित मांडायचे झाले तर ठाण्यात भाजपचे आमदार आणि नगरसेवकांची संख्या अधिक आहे. असे असले तरी सर्वच गणितावर अवलंबून नसते. पक्षाचे वरिष्ठ नेते अनेक बाबींचा विचार करून निर्णय घेतात. त्यामुळे ही जागा भाजपला मिळाली तर कार्यकर्ता सुखावेल, असेही आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *