मोदींचा कर्नाटकात काँग्रेसवर हल्लाबोल
कर्नाटक : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेस पोहचला आहे. भाजपाने यंदा दक्षिणेकडील राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जोरदार प्रचार करत आहेत. कर्नाटकमधिल सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जबरदस्त हल्लाबोल केला.
कर्नाटकातील बेळगावमधये मोदींनी राज्यातील काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, काँग्रेस सरकार केवळ तुष्टीकरणाला प्राधान्य देते, त्यांच्यासाठी नेहासारख्या मुलींच्या जीवाची काहीही किंमत नाही. काँग्रेसला फक्त आपल्या व्होट बँकेची चिंता आहे. बंगळुरुतील कॅफेमध्ये झालेला बॉम्बस्फोटदेखील काँग्रेसने गांभीर्याने घेतला नाही. काँग्रेसची विचारसरणी मुघलांची, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत, असा आरोप मोदींनी यावेळी केला.
‘काँग्रेसने मतांसाठी पीएफआय या दहशतवादी संघटेचा वापर केला. पण, आम्ही या संस्थेवर बंदी घातली. वायनाडची जागा जिंकता यावी यासाठी काँग्रेस त्या संघटनेचा बचाव करत आहे. काँग्रेस केवळ एका जागेसाठी पीएफआयला संरक्षण देत आहे. काँग्रेसच्या राजपुत्राला आमच्या राजे आणि सम्राटांचे योगदान आठवत नाही. व्होटबँकेच्या राजकारणासाठी हे लोक राजे-सम्राटांच्या विरोधात बोलतात पण नवाब, बादशाह, सुलतान यांच्या विरोधात एक शब्दही काढण्याचे धाडस त्यांच्यात नाही. राजपुत्र म्हणतो की, भारताचे राजा महाराज गरिबांची जमीन बळकवायचे. पम, आमची शेकडो मंदिरे पाडणाऱ्या औरंगजेबाचे अत्याचार काँग्रेसला आठवत नाहीत.’
‘काँग्रेस फक्त घराण्याच्या हितात अडकली’
‘काँग्रेसने लोकशाही नष्ट करण्याचे काम केले आहे. ईव्हीएमच्या बहाण्याने काँग्रेस देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत आहे. काँग्रेसचे लोक मानसिकदृष्ट्या इंग्रजीच्या गुलामगिरीत जगत आहेत. काँग्रेस देशहितापासून दूर गेली असून, फक्त घराण्याच्या हिताच्या विळख्यात अडकली आहे’, अशी जोरदार टीका पंतप्रधान मोदींनी यावेळे केली.