Month: April 2024

ईडीच्या अतिरेकावरून महायुतीत धुसफूस

स्वाती घोसाळकर ‘ ४०० पार कशाला हवेतर संसदेचा ताबा घ्या पण विरोधकांना सन्मान द्या, जनतेचा मोदींना पाठींबा असताना ईडीचा उपद्रव टाळला पाहिजे’ – गजानन कीर्तिकर ‘किर्तिकरांचे शरीर एकनाथ शिंदेसोबत तर आत्मा ठाकरेंसोबत…

सांडपाणी वाहिन्या फुटल्याने सगळीकडे दुर्गंधी

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर डोंबिवली : एमआयडीसी निवासी मधील सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स जागोजागी फुटल्याने त्यातील लाखो लिटर सांडपाणी रोज उघड्या नाल्यात आणि पावसाळी गटारात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छता, रोगराई, डासांचे वाढते प्रमाण हे या सांडपाणी उघड्यावर वाहण्याचे दुष्परिणाम होत असून एमआयडीसी आणि केडीएमसी यातून काहीच बोध घेतला नसल्याची टीका रहिवासी करत आहेत. एमआयडीसी निवासी मधील या सांडपाणी वाहिन्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्याने त्या बदलण्याचे काम एमआयडीसी कडून आता काँक्रिट रस्ते झाल्यावर उशिरा सुरू झाले आहे. परंतु हेही काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. सदर या जुन्या वाहिन्या फुटल्यावर सद्या एमआयडीसी कडून कोणतीही दुरुस्ती केली जात नाही. कारण सांगितले जात आहे की आता नवीन सांडपाणी वाहिन्यांचे काम चालू असल्याने त्या जुन्या वाहिन्या काही दिवसातच बाद होणार आहेत. पण हे काम पूर्ण होण्यास कमीतकमी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत येथील नागरिकांनी या उघड्यावर बाहेर पडणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे दुष्परिणाम भोगायचे का ? असा सवाल दक्ष नागरिक, रहिवासी संघटनेचे सचिव राजू नलावडे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मनपाकडून कीटकनाशक फवारणी आणि धूरिकरण हेही कित्येक दिवसात केले गेले नाही. निवासी मधील सोमेश्वर पार्क सोसायटी जवळ ( आरएक्स १/१), कावेरी चौक परिसर आणि मिलापनगर तलाव रोडवर इत्यादी अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटून ते सांडपाणी उघड्या गटारात वाहत असल्याच्या तक्रारी एमआयडीसी कडे करूनही त्याची दखल घेतली जात नाही आहे. त्यात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी हे सद्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात मश्गूल असल्याने त्यांना हा महत्त्वाचा प्रश्न दिसत नाही आहे असे वाटते. मतदार जनताही चुपचाप हे सहन करीत आहे. येथील जनतेकडून करोडो रुपयांचा मालमत्ता कर घेणाऱ्या केडीएमसीने तरी यात लक्ष घालून ह्या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अशी मागणी नलावडे यांनी केली.

ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला

मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत ठाणे- औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. याचदरम्यान पाठी मागून येणारी कार त्या ट्रक धडकली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी, मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर चांगला परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळाले. या मार्गावर सुमारे एक तास वाहतुक धीम्या गतीने सुरू होती. तसेच ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये ते झाड पडले. या अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून तेथून पलायन केल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. नागपूर येथून मुंबई घाटकोपर येथे दहा टन औषध घेऊन ट्रक चालक जगदीश गौतम (40) हा निघाला होता. सकाळी साडेसहाच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉप समोर आल्यावर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला. आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावरती जाऊन जोरात आदळला. तसेच तो तेथील रस्त्यावरती उलटला. या धडकेत ते झाड ही पडले होते. तसेच त्या अपघातग्रस्त ट्रकच्या मागून येणारे कार ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. सुदैवाने या अपघातात कारमधील चालकासह 5 जणांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस, नौपाडा पोलीस हे ०१-हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सुमारे ०१-तासापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने धीम्या गतीने सुरू होती. तर अपघातामुळे रस्त्यावरती पडलेले झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी कापून बाजूला केले. तसेच अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पोलीस कर्मचाऱ्यांनी ०१-हायड्रो मशीनच्या सहाय्याने रस्त्याच्या एका बाजूला करून तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

माढा लोकसभा मतदार संघातील ‘मसल पॉवर, मनी पॉवर’ संजय हाके संपवणार – प्रकाश शेंडगे

रमेश औताडे  मुंबई : माढा लोकसभा मतदार संघात प्रस्थापितांची असलेली मसल पॉवर मनी पॉवर आमचा ओबीसी उमेदवार संपवणार असल्याचा इशारा ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी शुक्रवारी मुंबई…

अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम १५ एप्रिलपासून पुन्हा सुरू

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश ठाणे : धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले.  तसेच, नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून १५ एप्रिलपासून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याच्या सूचनाही श्री. राव यांनी दिल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव हे प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाला भेट देवून तेथील कार्यपद्धती जाणून घेत आहेत. या उपक्रमात, शुक्रवारी आयुक्त राव यांनी मुंब्रा आणि दिवा या दोन प्रभाग समितीची माहिती घेतली. मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, परिमंडळ एकचे उपायुक्त मनीष जोशी, सहायक आयुक्त (मुंब्रा) बाळू पिचड, सहायक आयुक्त (दिवा) अक्षय गुडदे, तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते. गेल्या १५ महिन्यात, मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामाची संख्या ४० होती. त्यापैकी ०८ इमारती पाडण्यात आल्या. १४ इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू आहे. तर, १८ इमारतीमध्ये कुटुंबे राहत आहेत. मुंब्रा येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. त्यात, अती धोकादायक ०६ इमारती आहेत. त्यापैकी, ०४ इमारती रिकाम्या असून ०२ अजूनही व्याप्त आहेत. १०० धोकादायक इमारती असून त्यातील ०८ इमारतींची दुरुस्ती झाली आहे. २३ इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल आले असून त्या दुरुस्त करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. ५७ इमारतींचे दुरुस्ती काम संथ गतीने सुरू आहे. तर, ०९ ठिकाणी काम सुरू झालेले नाही. ०३ इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. तसेच, ३५० इमारतींची त्या व्याप्त असतानाच दुरुस्ती करायची आहे. तर, ८८४ इमारतींची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे. मुंब्रा येथील एकूण ६६ धोकादायक इमारतीबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या इमारतींची सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमने तातडीने पाहणी करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी बैठकीत दिले. ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल परस्पर विरोधी आले आहेत. त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चर ऑडिटर आणि महापालिकेने नियुक्त केलेले त्रयस्थ ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा. येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. जे स्ट्रक्चर ऑडिटर दिशाभुल करणारा अहवाल देतील, त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येता पावसाळा हा नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचा असण्याची शक्यता आहे. कमी काळात मोठा पाऊस असे त्याचे स्वरूप असू शकेल. त्यांची वारंवारताही अधिक असेल. हे लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे, विशेष करून मुंब्रा भागात पर्यायी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यांचे तपशीलवार नियोजन करावे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा, स्वयंसेवी संस्थांचे नेटवर्क, खाजगी बांधकाम व्यवसायिकांची यंत्र सामुग्री यांची माहिती घ्यावी. काळजी घेणे आणि तत्काळ प्रतिसाद देणे हे आपल्या हाती आहे. ते आपण काटेकोरपणे करावे, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. गेल्या १५ महिन्यात, दिवा येथील २७३ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. त्यात, १८७ इमारती अजूनही व्याप्त आहेत. ३२ इमारती पाडण्यात आल्या आहेत. तर, ५४ अव्याप्त इमारती निष्कासन करण्याची कार्यवाही सुरू आहे. अती धोकादायक किंवा धोकादायक स्थितीत एकही इमारत दिवा येथे नाही. ६७ इमारतींना मोठ्या तर ५८५ इमारतींना किरकोळ दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती यांची प्रस्तावित नवीन कार्यालये, देसाई खाडी पूल, त्यांचे पोहचमार्ग, दिवा रेल्वे उड्डाणपूल, दिवा येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय, नाल्याची कामे, जलकुंभ आदी कामाची आयुक्त राव यांनी विस्तृत माहिती घेतली. बैठकीनंतर, आयुक्त राव यांनी कौसा येथील स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान रुग्णालयाची पाहणी केली. तेथे सध्या सुरू असलेल्या ओपीडी सेवांची पाहणी केली. तसेच, नियोजनबद्ध काम करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या.

ठाणे येणाऱ्या १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कोर्ट नाका येथे बाजारात बाबासाहेबांच्या फोटो,मेसेज, सहीचे टीशर्ट आणि पेन आले असून अनुयायां मध्ये आकर्षण आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. (फोटो-प्रफुल गांगुर्डे)

कर्जत मध्ये नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन

कर्जत : भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. कर्जत उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात बुधवार, (दि.१० एप्रिल २०२४) रोजी भूमापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला आहे. मोजणी साहित्य पूजन करणेत आले व यामध्ये प्लेन टेबल, ईटीएस मशीन, आत्याधुनिक रोवर मशीन इ. साहित्य पूजन करणेत आले. लोकांना, व शेतकरी यांना मोजणी साहित्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. भूमापन दिनानिमित्ताने भूमि अभिलेख विभाग, कर्जत उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांच्या हस्ते मोजणी साहित्य पूजन करणेत आले. याप्रसंगी मुख्यालय सहाय्यक श्रीमती उज्वला अहिरे, शिरस्तेदार शैलेश जाधव, निमतानदार नंदकिशोर कोळी, छाननि लिपिक निलेश हराळ, भूकरमापक दत्तात्रय पाटील, कृष्णा गायकवाड, ऋषिकेश नाईक, यश जाधव, अण्णासाहेब सोमवशी, संजय गायकवाड, श्रीमती स्मिता भोसले , दुरुस्ती लिपिक दत्तात्रय कदम, कनिष्ठ लिपिक अश्विनी पोळ, नगर भूमापन लिपिक अपेक्षा भोईर, दप्तरबंद अविनाश पडवळ व इतर कर्मचारी तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. भूमि अभिलेख विभागाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. १० एप्रिल १८०२ रोजी त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात ब्रिटिश काळात झालेली होती. कारण तेव्हापासून १० एप्रिल भूमापन दिन म्हणून ओळखला जातो. शासनाने कर्जत कार्यालयास पहिल्या ३ व आता ५ रोवर मशीन पुरविले असून आता सर्व मोजणी कामकाज रोवर मशीनद्वारे होणार असून अत्यंत अचूक व गतीमान कामकाज होणार आहे. तसेच लवकरच कर्जत कार्यालयात ई मोजनी व्हर्जन-२ प्रणाली लागू होणार आहे. त्यात जनतेला आपला मोजणी अर्ज आपल्या घरून मोबाईलवरुन सुद्धा मोजणी अर्ज दाखल करता येणार असून ‘क’ प्रत सुद्धा अर्जदार यांना ई-मेलवर मिळणार आहे. याबाबत उपसंचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई जयंत निकम यांनी व्हर्जन-२ बाबत सतत आढावा घेवून तात्काळ ते जनतेला वापरासाठी उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सचिन इंगळी यांनी मार्गदर्शन केले आहे. उप अधीक्षक भूमि अभिलेख, कर्जत नितीन आटाळे यांनीही मार्गदर्शन करीत शंकांचे निरसन केले.

आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशील-किशन जावळे

अलिबाग : आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किशन जावळे बोलत होते. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जन जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बु.येथे या मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करीत आहेत. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बु. येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र मतदार दूत नेमण्यात येणार आहे. या दुता मार्फत गावातील प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वाना भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीड पणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी केले. आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये जात असतील तरी तेथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. सर्व आदिवासी मतदारांना भर पगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. या पथनाट्याचे लेखन /दिग्दर्शक राजू लहू बांगारे यांनी केले आहे. तसेच गीतकार दामोदर शिद, वादक सतिश खाणेकर आहेत. या पथनाट्यात राजू बांगारे, दामोदर शिद, ज्ञानेश्वर शिद, गणपत पारधी, साई बांगारे, श्रेयश वारगुडे, वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले. जिल्ह्यातील ११ तालुक्यातील वाडया, वस्ती, गावामध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी माहिती दिली.

उमेदवारांच्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर लक्ष ठेवा-एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती माध्यम कक्षाला ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भेट देऊन कामकाजाबाबत…

नवी मुंबईतील बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद

एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय नवी मुंबई : एनएमएमटीने बस थांब्यावर लावलेले डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत. त्यामुळे बस संबंधित बस थांब्यांवर नेमके कधी येईल हे प्रवाशांना कळत नाही. असा प्रकार वारंवार होत आहे. त्यामुळे जोशात सुरू करण्यात आलेला चांगल्या उपक्रमात सातत्य राखण्यातील दुर्लक्षामुळे अपयश येत असल्याचा आरोप केला जात आहे. एनएमएमटी प्रशासनाने २०१८ मध्ये आयटीएमएस या प्रणालीद्वारा शहरातील १०० बस थांब्यांवर डिजिटल फलक लावण्यात आले होते. ज्यामुळे त्या बस थांब्यांवरून जाणाऱ्या सर्व एनएमएमटी बस कुठल्या मार्ग क्रमांकाची आणि किती वाजेपर्यंत येईल हे सहज समजत होते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होत होता. विशेष म्हणजे एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या बसने जाण्याचे टाळत होते. याच कारणाने प्रवासी संख्याही वाढत होती. दोन-अडीच वर्षे हा उपक्रम व्यवस्थित सुरू होता. मात्र त्यानंतर हळूहळू करीत एक-एक डिजिटल फलक बंद पडत गेले. याबाबत २०२२ डिसेंबरमध्ये ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त आल्यावर त्याची दखल घेत एनएमएमटी प्रशासनाने ते पुन्हा सुरू केले. मात्र गेल्या काही आठवड्यापांसून अनेक बस थांब्यांवरील डिजिटल फलक पुन्हा बंद पडले आहेत. २०१८ मध्ये ९ कोटींचा खर्च करून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र २०२२-२३ मध्ये हे फलक बंद पडले त्यावेळी नव्याने घेतलेल्या बसगाड्यांमध्ये फोर जी स्पेक्ट्रम प्रणाली होती आणि डिजिटल फलकासाठी वापरण्यात येणारी प्रणाली ही टू जी स्पेक्ट्रमची होती. त्यामुळे फोरजी प्रणाली टूजी प्रणालीला सहाय्यकारी ठरत नव्हती. मात्र त्यात तांत्रिक दुरुस्ती वा अद्यायावत केले जात नव्हते. याबाबत अनेक तक्रारी आल्यावर प्रणाली अद्यायावत करण्यात आली. मात्र आता पुन्हा हे फलक बंद पडले आहेत. याबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने आता काही सांगू शकत नाही, असे सांगण्यात आले. तर व्यवस्थापक याच्याशी संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.