Month: April 2024

रंगीबेरंगी गुढ्यांनी बाजारपेठा सजल्या

डोंबिवली : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला नवउपक्रम, संकल्पांनी सुरुवात केली जाते. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. डोंबिवलीतील बाजार गुढीपाडव्याचे साहित्य आणि वस्तूंनी भरून गेला आहे. गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी-तलम, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठीची खरेदी सुरू झाली आहे. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. तसेच रेडिमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे. लाल, पिवळा, नारंगी आणि पांढऱ्या रंगांच्या तसेच ड्रायफ्रुट असलेल्या साखरगाठींनी दुकाने सजली आहेत. गुढीपाडव्याला अवघे काही दिवस उरल्याने साखरगाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शोभायात्रांचीही जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्याची परंपरा असल्याने शहरातील अनेक मंडळे तयारीत व्यस्त आहेत. डोंबिवलीतील दुकाने साहित्यांनी सजली असून नऊ इंचाची रेडिमेड गुढी १०० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एक फुटाची रेडिमेड गुढी १५० रुपयांपासून मिळत आहे. दीड फुटाच्या गुढीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. सजवलेल्या गुढी दर्जा व आकारानुसार ९०० ते १,२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी, गुलाबी रंगाच्या साखरगाठी २० रुपये ते १०० रुपयांपर्यंत मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त वाहन, घर, दागिने, मोबाईल इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे नागरिक आकर्षित करण्यासाठी शोरूम व ऑनलाईन खरेदीवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवल्या आहेत. पूजेसाठी अन् लहान आकारातील तयार गुढ्या, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा बॉक्स, गुढी उभारणीसाठी लागणारे विविध रंगांतील वस्त्र, अशा विविध प्रकाराच्या साहित्यांची खरेदी होत आहे. यंदा लहान आकारातील तयार गुढ्यांना सर्वाधिक मागणी आहे, आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार गुढ्यांची खरेदी होत आहे. मोठ्या आकारातील तयार गुढ्याही बाजारात उपलब्ध आहेत. त्याचीही खरेदी होत असून, अगरबत्तीपासून ते हळदी-कुंकू, असे गुढी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बॉक्सलाही पसंती आहे. गृहखरेदीसाठी सवलती साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील आकर्षक जाहिराती केल्या आहेत. रेडिमेड साडीला पसंती गुढपाडव्यासाठी रेडिमेड गुढीचे वस्त्र बाजारात उपलब्ध झाले आहेत. रेडिमेड गुढीच्या वस्त्रांना महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैठणी, जरीकाठ, रेशन काठ, खाण-काठाची रेडिमेड साडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. १०० ते ८०० रुपयांपर्यंतच्या गुढी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रेडिमेड गुढी विदेशात विक्रीसाठी पाठवल्या आहेत. – रोहित प्रसाद, डोंबिवली गुढ्या तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यंदा गुढीच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. – सुमित कदम, डोंबिवली

आता भाजपचा मनमानी कारभार उघडा पाडणार

रमेश औताडे मुंबई : राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामिनावर सोडले कारण इडी कडे संजय सिंग यांच्या विरोधात काहीच पुरावे नव्हते. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही असेच घडणार आहे. भाजपचा मनमानी कारभार आता उघडा पाडणार आहे. अशी माहिती आम आदमी पार्टीचे पदाधिकारी धनराज वंजारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भारताची लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. भाजपाचे प्राण हे ईव्हीएम मशीन मध्ये आहे परंतु त्याचा आत्मा आता जनतेकडे असेल. त्यामुळे भाजपाचा ४०० पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे. न्यायालयाने आता इलेक्ट्रॉल बाँड ची तपासणी करणे गरजेचे आहे कारण एक्सटॉर्शन चे रॅकेट हे भाजपाच्या माध्यमातून ईडी चालवत आहे.  खंडणीच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी भाजपाने विविध कंपन्यांना धमकावून जमा केला आहे असा आरोप धनराज वंजारी यांनी केला आहे. भाजपाने आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून पक्षातील इतर आमदार व खासदारांना धमकावून भाजपाकडे खेचण्याचे षड्यंत्र केले होते. परंतु आम आदमी पक्षात सर्व देशभक्त व क्रांतिकारी लोक आहेत आम्ही सर्व भगतसिंगाचे चेले आहोत. देशहितासाठी जेल काय फाशी घेण्यास सुद्धा तयार आहोत. आणि त्यामुळेच भाजपाचा डाव फसला आहे .आज देशात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला घाबरत असतील तर फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांना  घाबरतात हे आता स्पष्ट झाले आहे. असे धनराज वंजारी यांनी सांगितले. आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झाला आहे आणि सर्व भ्रष्टाचारीना सोबत घेऊन नरेंद्र मोदी आमच्या पार्टी विरुद्ध कारवाई करत आहेत हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.  तसेच या लोकसभेच्या निवडणुकीत ४००  पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे असे ऍड.संदीप कटके यांनी यावेळी सांगितले. संजय सिंग यांना सहा महिने जेलमध्ये फक्त यामुळेच ठेवण्यात आले की त्यांनी त्यांचा आवाज लोकांमध्ये भाजपाच्या विरुद्ध उचलला. भाजपा हा आमच्या पार्टीच्या नेत्यांना किती घाबरते हे आज सिद्ध झाले आहे. आम आदमी पार्टीचे बाकीचे नेतेही पुढच्या काळामध्ये निर्दोष बाहेर येतील यामध्ये कुठलीही शंका नाही. असे यावेळी ऍड संदीप कटके यांनी सांगितले.

ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाचे के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा.रुपेश यशवंत महाडीक यांना कोकण ग्राम विकास संस्थेतर्फे “आदर्श अध्यापक पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले. मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गप्पागोष्टीकार जयंत ओक यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ.महेश बेडेकर विश्वासाने तसेच प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी अभिनंदन केले. प्राध्यापक रुपेश महाडीक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण,सोबतच सेट, नेट आणि एलएलबीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विद्यार्थीप्रिय पण त्याचसोबत शिस्तप्रिय असणारे प्रा.रुपेश महाडीक हे मागील १४ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच अनेक स्पर्धा उपक्रमांमध्ये आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य,नाटक,पथनाट्य,वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमधून त्यांनी उत्तम यश प्राप्त केले.मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ या कार्यक्रमात महाडीक सरांनी लेखन ,दिग्दर्शिन आणि अभिनय केलेल्या स्किटला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते.अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्याचसोबत नावाजलेल्या विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तम मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे नाते नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण,संकट असो,त्यांना हमखास मार्गदर्शन मिळेल या विश्वासाने अनेक विद्यार्थ्यांनी सरांकडे धाव घ्यावी आणि अगदी गोवर्धन करंगळीवर लीलया उचलावा तसे विद्यार्थ्यांना संकटातून,समस्येतून मार्ग सहज दाखवावा अशा प्रकारचे भावबंध त्यांचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा,कुटुंब-समाज यांचा समतोल राखत उत्तुंग यश प्राप्त करावे,आत्मविश्वासाने,संयमाने परिस्थितीवर मात करत माणूस म्हणून चांगले आयुष्य जगावे,त्याचसोबत मैत्रीचे जीवनातील महत्त्व, अशा अनेक गोष्टींचे सिंचन विद्यार्थ्यानमध्ये करत आदर्श संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य सर अव्याहतपणे गेली अनेक वर्ष करत आहेत.

आधुनिक अनाजी पंतांनी आमचं घर फोडलं- रोहित पवार

बुलढाणा : संतांच्या आणि छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज यांच्या काळात ही अनाजी पंत सक्रिय होते आणि आजही आहे. आधुनिक अनाजी पंतांनी आमचंही घर फोडलं, तीनचार पवार तिकडे गेले. मात्र,त्यांनी लक्षात ठेवावे की, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार…

४८ वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा

ठाणे महापालिकेने विजेतेपद राखले ठाणे : ठाणे महापालीकेने डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेत ब गटाचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम राखले. प्रतिस्पर्धी संघाला ८० धावांत गुंडाळल्यावर ठाणे महापालिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ८१ धावांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात झालेल्या निर्णायक लढतीत ठाणे महापालिकेच्या चतुरस्त्र माऱ्यासमोर डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे फलंदाज  खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. अतिश गावंडने १२ धावांत तीन,शशिकांत कदम, नंदन कामत आणि सौद मंसूरीने प्रत्येकी दोन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांना शतकी धावसंख्येच्या आत रोखले. अनुराग यादवने २६, केतन खरातने नाबाद १६ आणि प्रदीप शर्माने १५ धावांचे योगदान दिले.  विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ठाणे महापालिकेची खराब सुरुवात झाली. संघाचे धावांचे खाते उघडलेले नसताना आशुतोष घांग्रेने अनुभवी  जयदीप परदेशीच्या दांड्या गुल करत गतविजेत्याना धक्का दिला. पण या धक्क्यातून लगेचच सावरून घेत विकी पाटीलने सौरभ आंब्रेने दुसऱ्या गड्यासाठी ६८धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  विकी पाटीलने नाबाद ३७ आणि सौरभ आंब्रेने ३६ धावांची खेळी केली. या डावात आशुतोष घांग्रे आणि चिन्मय कदमने प्रत्येकी एक गाडी बाद केला. संक्षिप्त धावफलक : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस : २८.५ षटकात सर्वबाद ८० (अनुराग यादव २६, केतन खरात नाबाद १६ , प्रदीप शर्मा १५, अतिश गावंड ४- १ – १२ -३, नंदन कामत ६-२-१२-२,  शशिकांत कामत ७-२-१३-२, सौद मंसूरी २.५ – ०-१५-२) पराभूत विरुद्ध ठाणे महापालिका : १६;४ षटकात २ बाद ८१ ( विकी पाटील नाबाद ३७, सौरभ आंब्रे ३६, आशुतोष घांग्रे २-२५-१, चिन्मय कदम १.४ -१०-१ ).

राहुल गांधी, प्रियंकाच्या विदर्भात जाहीर सभा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि चंद्रपूर येथे प्रचारसभा होत आहे. राहुल गांधी साकोली येथे १३ एप्रिलला आणि प्रियंका गांधी यांची चंद्रपूला १५ एप्रिलला…

मुंबईतील नाल्यांचा गाळ रात्रंदिवस काढणार

मुंबई : यंदा नालेसफाई उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही नालेसफाई करून शहर व उपनगरांतील लहान -मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १० लाख २१ हजार ७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढला जाणार आहे. मात्र नालेसफाईचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे. आतापर्यंत आतापर्यंत १६.५१ टक्के नालेसफाई झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने यंदा पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. नालेसफाई उशिरा सुरू केल्यामुळे नालेसफाईची कामे यंदा रात्रंदिवस केली जाणार आहेत. महापालिकेने मुंबईतील मिठी नदी, लहान – मोठे नाले, हायवे लगतचे नाले यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे काम ३१ कंत्राटदारांवर सोपवले आहे. गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. मात्र यंदा १८ मार्चपासून नालेसफाई कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाई कामे उशिराने सुरू झाली आहेत. नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात आणि पावसानंतर अशा तीन टप्प्यात करण्यात येणार आहेत. मिठी नदी, लहान व मोठे नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून १ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १५ दिवसांत मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे. शहर व उपनगरांतील लहान – मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य आहे. कामावर सीसीटीव्हीची नजर मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत मुंबईत एका दिवसात तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता. तसेच, त्याचवेळी समुद्राला मोठी भरतीही होती. त्यामुळे मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ मोठी हानी झाली. त्यानंतर मीठी नदीची सफाई केली जाते. नदीच्या रुंदीकरण, खोलीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील छोट्या, मोठ्या नालेसफाईची कामेही हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मिठी नदी व नालेसफाईवर पालिकेकडून सीसीटिव्हीची नजर ठेवली जाणार आहे. दीड लाख मेट्रीक टन गाळ काढला शहर व उपनगरे येथील लहान-मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून त्यापैकी १,६८,६७४.७७ मेट्रिक टन म्हणजे १६.५१ टक्के इतका गाळ काढण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. – १८ मार्च ते १ एप्रिल या १५ दिवसांत कंत्राटदारांनी १,६८,६८४.७७ मे. टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. – शहर भागात नालेसफाई कामाच्या अंतर्गत ३०,९३९.९४ मे.टन. इतका गाळ काढणे अपेक्षित असून गेल्या १५ दिवसांत त्यापैकी १,७५०.१४ मे.टन (५.६३ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. – पूर्व उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत १,२३,५५३.०५ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १५,७९०.७८ मे.टन (१२.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. – पश्चिम उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत २,३५,०२०.९४ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी ३०,४२९.१२ मे.टन (१२.९४ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.

दिलेली जबाबदारी एकमेकांच्या समन्वयाने पार पाडा-एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : अशोक गायकवाड काय करायचे आणि काय करायचे नाही, याबाबत सर्वांनी दक्ष रहावे, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतील दिलेली जबाबदारी एकमेकांच्या समन्वयाने पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली. राजापूर येथील आबासाहेब मराठे ऑर्टस ॲण्ड न्यू कॉमर्स, सायन्स कॉलेज मधील इनडोअर स्पोर्ट स्टेडियममध्ये सिंधुदूर्गमधील विधानसभा मतदार संघनिहाय क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी काल आढावा बैठक घेतली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदूर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, सिंधुदूर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे आदी उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कार्य व जबाबदाऱ्या यात विशेषत: मतदान पूर्व आणि मतदान दिवशीची जबाबदारी यांचा समावेश होता. मतदान केंद्रावर योग्य निवडणूक व्यवस्थापन असल्याची सुनिश्चिती, त्याचबरोबर अश्वासित सुविधांची खात्री करणे, रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, योग्य प्रकाश व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रसाधनगृहे, मतदान पूर्व संध्येची जबाबदारी आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, मतदारांना ‘व्होटर इन्फॉरमेशन स्लीप’ अर्थात मतदार चिट्टीचे वाटप बिएलओमार्फत पूर्ण करावे. याचे वाटप झाले की नाही, याबाबतही खातरजमा करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.

भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही-एकनाथ शिंदे

यवतमाळ : राजकारणातील समीकरणे सतत बदलत असतात. त्यामुळे अनेकदा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र, आपण कोणावर अन्याय होवू देणार नाही आणि भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यवतमाळ येथे…

कामगार, शेतकरी  व देश विरोधी सरकारला पराभूत करा !

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राजकीय संमेलनातील ठराव मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, शेतकरी,जनता व देश विरोधी  सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा गांधी सभागृहात नुकताच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे‌ राज्य स्तरीय राजकीय सम्मेलन पार पडले. त्या संमेलनात उपस्थित कामगार प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. इंटक,आयटक, एसएमएस,सिटू, एआयसीसीटीयू, बीकेएस एम, राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा संघटना महासंघ, श्रमिक एकता मंच आणि तळागाळातील कामगारांचे‌ नेतृत्व करणाऱ्या संघटना या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सहभागी झाल्या होत्या. व्यासपीठावर कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. उदय भट, गोविंदराव मोहिते, डॉ.कैलास कदम, डॉ. डी. एल. कराड, कॉ. उदय चौधरी,  निवृत्ती धुमाळ आदी कामगार नेते उपस्थित होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, आमदार सचिन अहिर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ठरावात पुढे म्हटले आहे,सध्या सत्तेवर असणारे केंद्र व राज्य सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून मालक व भांडवलदाराचे हित जोपासत आहे. भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनांनी १३० वर्षांपासून लढून मिळवीलेले ४४ कामगार कायदे रद्द करून, त्या जागी ४ श्रम संहिता आणल्या आहेत. हे सरकार परत सत्तेवर आल्यास या देशातील कामगार चळवळ संपुष्टात येऊन कामगारांना वेठबिगारीचे जीवन वाट्याला येणार!अशी ठरावात काळजी व्यक्त करण्यात आली आहे. कामगार कर्मचारी कृती समितीचे प्रमुख सिटुचे डॉ.डी . एल. कराड  ठरावावर भाषण करताना म्हणाले की, आपल्या सर्व संघटनांचे सदस्य राज्यात सुमारे ३५ लाख असून, त्याचे कुटुंबिय मिळून कोटी-सव्वा कोटीचे मताधिक्य या निवडणुकीत चांगलाच प्रभाव पाडू शकतो.कामगार विरोधीl सरकारला सत्तेवरुन खाली खेचू शकेल, असे डॉ. कराड यांनी  आपल्या भाषणात सांगितले. महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कैलास कदम  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले, येणारा १ मे कामगार दिन केंद्र सरकार विरोधी कामगार निषेध दिन पाळतील! सरचिटणीस गोविंदराव मोहिते ठरावाला पाठिंबा देतांना म्हणाले, अंगणवाडी, आशा कामगार पासून  गिरणी कामगारांपर्यंत कामगार वर्गाला नामोहरम करणा-या केंद्र  सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच खरी वेळ आहे. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एनटीआयचे कॉ. मिलिंद रानडे, कॉ.उदय भट, कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. कॉ.उदय चौधरी, साथी निवृत्ती धुमाळ आदींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेताना, महाराष्ट्रात केंद्र सरकारला  महाविकास आघाडीच खरा पर्याय ठरू शकेल, असा इंटकने विश्वास व्यक्त केला आहे. बजरंग चव्हाण, दादासाहेब डोगरे आदींनी ठरावाला पाठिंबा देऊन  कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.