रमेश औताडे
मुंबई : हातावर पोट असणाऱ्यांनी रोज कमवायचे व रोजचा उदरनिर्वाह करायचा असे असताना शिधावाटप दुकानाचा आधार होता.पोटाची खळगी भरताना सरकारने दिलेले खराब का असेना ते खाऊन तृप्तीची ढेकर देणारा मेरा भारत महान असे म्हणणारा गरीब नागरीक आनंदी असायचा. मात्र त्याचा आनंद मात्र निवडणुकीमुळे लुप्त झाला आहे. शिधावाटप अधिकारी म्हणतात की,  निवडणुकीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळेल. गुढीपाडवा तरी गोड होईल या आशेवर चार पाच चकरा शिधा दुकानावर मारून आलेले शिधा ग्राहक मात्र भर उन्हाळ्यात शिधा न मिळाल्याने नाराज झाले आहेत.
गुढीपाडवा व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा केली होती. गुढीपाडवा साजरा केला तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली मात्र शिधा काही मिळाला नाही.आता निवडणूक आहे त्यामुळे आतपण शिधा वाटप नाही. शंभर रुपयांत शिधा अशी जाहिरात करण्यासाठी सरकारने करोडो रुपये खर्च करून आपलीच पाठ थोपटली.त्यानंतर साडी वाटप सुरू केले. फाटक्या साड्या देऊन गरिबांची चेष्टा केली.अशी प्रतिक्रिया शिधापत्रिका धारक देत आहेत.
मतदार राजा हा निवडणुकीत उमेदवारांच्या मागे मोफत वडापाव व पाणी पित भिकाऱ्यासारखा फिरत आहे.त्याला किमान शिधा तरी द्या अशी मागणी होऊ लागली आहे.आज भूक लागली आहे निवडणूक झाल्यावर सोने जरी दिले तरी त्याने भूक शमणार आहे का ? असा संतप्त सवाल गरीब जनता करत आहे. त्यामुळे आनंदाचा शिधा मिळत नसल्याने मतदार राजा आनंदी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *