माढ्यात ईव्हीएम पेटवले, सोलापुरात हतोड्याने फोडले
मुंबई: सर्वपक्षीय राजकारण्यांच्या आश्वासनामुळे निराश झालेला तरुण मतदार राजा भडकल्याचे आज पुन्हा पहायला मिळाले. महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान माढा लोकसभा मतदार संघात एका तरुणाने चक्क ईव्हीएमवर पेट्रोल टाकून ते जाळून टाकले तर साताऱ्यात भडकलेल्या युवकाने ईव्हीएमवर हतोडा टाकत आपला राग व्यक्त केला. दोन्ही तरुणांनी पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. यापुर्वीच्या दुसऱ्या टप्यातही नांदेडमध्ये एका युवकाने ईव्हीएमवर कुऱ्हाडीचा घाव घातला होता.
महाराष्ट्रीतील लोकसभेच्या ११ जागांसाठी आज मतदान झाले. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. तर बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय भवितव्य दावणीला बांधले आहे. शरद पवारांची मुलगी सुप्रीया सुळे विरुध्द अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार असा हा मुकाबला आहे. मतदान कमी झाल्याचा फटका कुणाला बसतो हे आता ४ जुनलाच कळेल.
निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ५३.४०% मतदान झाले आहे. तर लातूर – ५५.३८ %, सांगली – ५२.५६ %, बारामती – ४५.३८%, हातकणंगले- ६२.१८%, कोल्हापूर – ६३.७१%, माढा – ५०%, धाराशिव – ५२.७८%, रायगड – ५०.३१%, रत्नागिरी – ५३.७५%, सातारा – ५४.११ % व सोलापूर लोकसभा मतदारसंघात ४९.७०% मतदान झाले. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. तर बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.
ईव्हिएम पेटवले
सोलापूर लोकसभआ मतदार संघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडीमध्ये एका तरुणाने ईव्हीएम पेटवून आपला संताप व्यक्त केला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. ईव्हीएम पेटवण्यामागचं नेमकं कारण काय, हे अद्याप समोर आलेलं नाही. ईव्हीएमला आग लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यामध्ये लढत आहे.
दुपारी तीन वाजताची ही आग लावण्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळालं आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी पाण्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नवीन ईव्हीएम मशीन येईपर्यंत काही काळ मतदान थांबवावं लागले. या घटनेनंतर मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
इव्हीएम फोडले
माढा लोकसभा मतदारसंघात मतदान संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना करमाळा शहरात एका संतप्त तरूणाने मतदान केंद्रात हातोडा घालून ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली. संबंधित तरूणाला तात्काळ पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
करमाळा येथे राहणाऱ्या जयवंत दिलीप कांबळे याने हे कृत्य केले असून पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा विधानसभा क्षेत्रात करमाळा शहरात नगरपालिका मुलांची प्राथमिक शाळा क्र. २ च्या इमारतीत मतदान केंद्रावर दिवसभर मतदानाची प्रक्रिया शांततेने सुरू होती. सायंकाळी मतदान संपायला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना जयवंत कांबळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून मतदान केंद्रात गेला आणि त्याने ईव्हिएम फोडले.
हातोडी मारल्याचा जोराचा आवाज येताच मतदान केंद्रात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कांबळे यास तात्काळ ताब्यात घेतले. ईव्हीएम फोडली असली तरी त्यालगतच्या व्हीव्ही पॅट मशीनवर दिवसभर झालेल्या मतदानाचा विदा (डाटा) सुरक्षित आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.