खारघर : तळोजा घोट कॅम्पमधील अरिहंत अनायिका सोसायटीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून पाणी समस्या आहे. पाणी समस्यांविषयी सिडको आणि पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सोसायटीमधील मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे पत्र सोसायटीमधील नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे.

तळोजामध्ये घोट कॅम्प अरिहंत अनायिका सोसायटीत २६ विंगमध्ये एक हजार कुटुंबे गेल्या पाच वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. अरिहंत या बांधकाम विकसकाने पाणी जोडणीसाठी सर्व पैसे भरल्याचे सांगून हात वर केले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून रहिवासी टँकर आणि बोअरवेलच्‍या पाण्यावर दिवस काढत आहेत. पाणी समस्या दूर करण्यासाठी पालिका आणि सिडकोकडे गेल्या पाच वर्षांपासून पत्रव्यवहार करीत आहे. मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यामुळे सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोसायटीमधील सदस्यांनी घेतला असून तसे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी मावळ लोकसभा मतदारसंघ, रायगड जिल्हा अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सोसायटीत पाण्याची सोय नाही. सिडको आणि पालिकेकडे पत्रव्यवहार केला. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही. टँकर आणि बोअरवेलच्या पाण्यामुळे आजार निर्माण झाले आहेत. पाणी समस्येविषयी निवडणूक विभागाकडे पत्रव्यवहार केला असता पनवेल पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सोसायटीला भेट देऊन पाहणी केली. मात्र पाणी समस्येविषयी काहीच उपाययोजना करू शकत नसल्याचे सांगितले. पाणी समस्या दूर होत नसल्यामुळे सोसायटीमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

– विकास वैरागर, रहिवासी तथा पदाधिकारी, घोट कॉलनी फोरम, तळोजा.

निवडणुकीत मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. सोसायटीमधील सर्व मतदारांनी मतदान करावे. पाणी समस्येसंदर्भात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल.

– प्रशांत रसाळ, आयुक्त, पनवेल महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *